बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे माहेरघर आहे.
जीवनात केलेली कितीही पापे वाराणसीत धुतली जातात या श्रध्देपोटी रोज 30 ते 40 हजार यात्री वाराणसी नगरीला भेट देतात. काशी म्हणजे प्रकाशाची नगरी. त्याची स्थापना काश्य राजाने केली म्हणून काशी हे नाव पडले. अनेक स्वाऱ्या झाल्याने काशी नामशेष होऊ लागले म्हणून जवळच गंगेच्या दोन उपनद्या वरूणा व आसी यांच्या संगमावर नवीन गाव उभारले ते वाराणसी.
आर्य कालापासून वाराणसीचा उल्लेख आहे. उपनिषदात वारायते अथवा वारणा म्हणजे जी नदी पापे वाहून नेते ती वाराणसी.पालीमध्ये वाराणसीचा उच्चार बराणसी होता म्हणून पुढे त्याचे नाव होत गेले बनारस. या नदीच्या काठी शंकर पार्वतीचे वास्तव्य होते. शंकर म्हणजे सृष्टीचा नाश करणारा म्हणजे रूद्र. त्याचे निवासस्थान असते महास्मशान. अर्थात प्रेते झोपण्याची जागा. येथील दोन प्रसिध्द घाट मनकर्णिका व हरिश्चंद. सतत 2500 वर्षे जळणारे स्मशानघाट म्हणून हे जगात प्रसिध्द आहेत.
पुर्वीच्या काळी काशीला पोहोचणे महादिव्यच होते म्हणून त्याला काशी यात्रा म्हणत. आज मात्र भारतीय रेल्वेच्या उत्तम जाळयामुळे भारताच्या कुठल्याही भागातून थेट वाराणसीस पोहोचता येते. मुंबईहून 27 तासाच्या प्रवास करून वाराणसी गाठले.स्टेशन अतिशय भव्य. एखाद्या देवळासारखे डोळयात भरते. गाडीतून उतरलो आणि बनारसी ठगांनी बडगा दाखविला. रिक्षातून नेतो असे सांगून चक्क एका टॅक्सीत टाकले व परत आम्हालाच खोटे पाडले की आम्हीच टॅक्सी मागितली होती. बोला! आता पैशावरून भांडाभांडी. पोलीसही त्यांना सामील. शेवटी आम्हीच नांगी टाकली आणि हॉटेलमध्ये डेरेदाखल झालो.
अनेक च्रित्रकारांनी तसेच अनेक फोटोंमध्ये उतरवलेले काशीचे घाट डोळयासमोर येत होते. नदीकाठी बांधलेले घाट, गंगेत स्नान करणारे हजारो भाविक, घाटावर उभारलेल्या छञ्या, आकाशाला भिडलेले मंदिराचे कळस, संथ गंगेच्या प्रवाहात दाटीदाटीने डोलणाऱ्या नावा हे सर्व डोळयासमोर उभे होते पण प्रत्यक्ष अनुभवण्याकरता घाटापर्यंत पोहचणे हेच एक दिव्य होते.
संध्याकाळचे 6 वाजलेले. वाराणसीतले रस्ते माणसांच्या लोंढ्यांनी तुडुंब वाहात होते. बरोबर सायकली, सायकलरिक्षा व ऑटो रिक्षा, मोटारी व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानांची व फेरीवाल्यांची रांगच रांग. हॉर्नचा कान किटणारा आवाज.रस्त्याच्या मध्यातून शांतपणे चालणारे गाई, बैल आणि त्यांचा मान राखत जोरात मार्ग आक्रमणारी आमची दिव्य सायकल रिक्षा एका अरूंद बोळात घुसली. चक्क रिक्षा एकमेकंाना घासत अगदी धक्काबुक्की करावी तशा पुढे जात होत्या. शेवटी नाइलाजास्तव उतरून चालण्यास सुरवात केली. प्रचंड गर्दीतून मार्ग कसा बसा काढत होतो आणि त्यात गाइडचा आपापले पैशाचे पाकीट जपा असा सतत ढोशा चालू होता. बोळांमागून बोळ आणि माणसांचे लोंढे कापत जात होतो. नदीचा वा घाटाचा मागमुसही नव्हता. एक अरूंद बोळ ओलांडला आणि नाटकाचा पडदा एकदम बाजूला व्हावा तसा समोर रंगीबेरंगी विजेच्या रोषणाईत नाहून गेलेला भव्य घाट व समोर संथ वाहाणारे गंगेचे पात्र. अखेर मनाला शांती देणारी जागा मिळाल्याने धन्य झालो.
काशीचा धनुष्याकृती घाट 9 ते 10 किमी.लांबीचा असून त्यावर जवळजवळ 70 ते 80 पक्के बांधलेले घाट आहेत. जवळजवळ सर्वच घाट नावानिशी प्रसिध्द आहेत. गंगेच्या काठापासून वरपर्यंत जाण्यास शेकडोंनी पायऱ्या, चौथरे व वर मंदिरे आहेत. हे सर्व घाट पश्चिम तीरावरच आहेत. पूर्व तीरावरच्या प्रदेशाला मघर म्हणतात. तो तीर पूर्वापार पापी समजला जात असल्याने सर्व जागा ओसाड आहे. ऋषिकेश पासूनची उफाळत येणारी गंगा या जागी संथ, शांत, मनाला प्रफुल्लीत करणारी. ती रामनगर गावापर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात येते. तिथे थबकते व चक्क उलट पावली ती उत्तरेकडे वळते. त्यामुळे वारााणसीला खळखळाट पूर्ण थांबतो व त्यामुळे पूर येत नाही.
दशास्वमेध हा मुख्य घाट मध्यात विराजमान झालेला आहे. ब्रम्हदेवाने आपले 10 दास म्हणजे अश्व येथे अर्पित केले असे म्हणतात. हा घाट सर्वात पुण्यवान त्यामुळे अखंड गजबजलेला. अनेक पडाव, मोटर लाँचेस नदीतील सफरीकरता सज्ज असतात.
आमचा गाईड आम्हाला एखादा शिक्षक या नात्याने सर्व माहिती रंगवून सांगत होता. मधेच थांबून तो विचारे ‘आप समझ रहे है ना’ त्यामुळे शब्दन् शब्द एैकणे भाग होते नाहीतर आम्हाला त्याने नापासच केले असते. घाटावर अतिशय शिस्तीत आरती चालू होती. झांजांबरोबर अनेक वाद्ये, पद्यरचना सुगम, अतिशय सुरेल गाणारे कलाकार, व उत्कृष्ट प्रकाश योजना. समोरच गंगेच्या प्रवाहात सोडलेल्या पणत्या. सगळे वातावरण आल्हादायक होते. नाव एकएका घाटासमोरून संथपणे जात होती. काळोखात प्रकाशनगरी काशी चमचमत होती.
डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply