धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान – सारनाथ
गौतम बुध्दाच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे स्थान म्हणजे सारनाथ.वाराणसीहून ९ किमी.अंतरावर आहे. हिंदु आणि बुध्द असे दोन महान धर्म 2500 वर्षापासून एकत्रीतपणे या परिसरात रूजले गेले आणि गुण्यागोविंदात त्यांची वाटचाल पुढे चालत राहिली. नेपाळच्या सीमेवरील लुंबीवन हे जन्मस्थान. बिहार मधील पाटलीपुत्र जवळील जागा ही त्याला झालेल्या साक्षात्काराची. मुख्य धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान सारनाथ कुसीनारा हे गोरखपूर जवळील स्थान जेथे जीवनयात्रा संपली.
बुध्दानी आपल्या पाच शिष्याना एकत्र पहिले प्रवचन दिले ती जागा सारनाथ. सारनाथ अथवा सारंगनाथ हरणांच्या वास्तव्याची जागा त्या काळात या भागात जंगलात हरणांचे कळप असत व बुध्दाला हरणांबद्यल फार प्रेम होते. बुध्दाच्या स्मर्णार्थ श्रीलंकेच्या धर्ममालीनी या शिष्यानी मुलगंध कृती विहार बांधला. पुढे याच देशाचे बुध्द धर्म प्रसारक डॉ.संपूर्णानंद यानी अथक परिश्रम करून या विहाराचे नंदनवनच केले त्यामुळे याला जगनमान्यता मिळाली. विहाराचे देवळासारखे कळस चारी बाजूनी सुरेख उद्यान गाभाऱ्यात सोन्याचा फुलांच्या माळानी श्रृंगारीत धीर गंभीर उदात्त चेहऱ्याचा बुध्दाचा पुतळा मंत्र जप पठण नाही की उदबत्ती धूपाचा धूर नाही शांत धीरगंभीर वातावरण उल्लेखनिय आहे.
मुख्य विहाराच्या बाजूनी अनेक देशानी बांधलेले विहार त्यातले चीन जपान व ब्रम्हदेशचे प्रेक्षणिय आहेत. बुध्दगया येथिल प्रसिध्द बोधीवृक्षाची फांदी या उद्यानात आणून लावली त्याचा झालेला प्रचंड मोठा डेरेदार वृक्ष व त्याच्या असंख्य फांद्याा लक्ष वेधून घेतात. राजा अशोकाने धर्मप्रसाराकरता चार भव्य स्तुप बांधले त्यातील एकच शिल्लक आहे. स्तुपाची उंचीच 150 ते 200 फूट व त्याचा परिघ डोळयात न मावणारा त्यावरील नक्षीकाम बनारसी साडीवर जसे असते तसे व कोपऱ्या कोपऱ्यांवर डोके टेकवणारे चीनी जपानी प्रवासी .
अशोकस्तंभ ज्या जागी उत्खननात मिळाला त्याचे अवशेष त्याच जागी जाळीच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले आहेत. त्याच्यासमोर जैन मंदिर असून तेथे अशोकस्तंभाची 11 मीटर उंचीच्या मार्बलच्या दगडाची प्रतिकृती आहे गुळगुळीतपणा इतका की आपले प्रतिबिंब पडते. सारनाथ वस्तूसंग्रहालय हे वर्ल्ड हेरीटेज बोर्ड मान्यता दिलेले स्तुपापासून 1 किमी. अंतरावर असून परिसर इतका सुंदर व स्वच्छ व भव्यता याने आपण भारावूनच जातो. मुख्य प्रवेश दालनात अशोकस्तंभ विराजमान झालेला त्यावरील चक्रांचे नक्षीकाम हत्ती घोडा व वृषभ अगदी खरेच उभे आहेत असा भास होतो. आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता अतिशय योग्य शिल्पास मिळालेली आहे याची बालंबाल खात्री पटते. पुढे अनेक दालने बुध्दाच्या विविध मुर्ती देवदेवता नक्षीकाम व कोरीव काम केलेल्या कमानी दरवाजे अशा हजारो वस्तुंचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले हया सर्व गोष्टींचा अभ्यास करणारे अनेक परदेशी पर्यटक दालनात ठाण मांडून बसलेले पाहिल्यावर वाराणसीच्या प्रेमात भारत व जगातील लोक का पडतात हे उमजते. रामनगर हे छोटे गाव वाराणसी पासून 35 किमी.अंतरावर गंगेच्या पलीकडील तीरावर वाराणसीचे राजा नरेष यांचे वास्तव्य रामनगर किल्ल्यात असे.गंगेवर मोटार व रेल्वेचे दोन भव्य पुल पाहिल्यावर गंगेच्या पात्राच्या भव्यतेची कल्पना येते. गावात सायकल व रिक्षा जाणारा पिंपानी केलेला पुल व त्यावरचा रस्ता एक अनोखा अनुभव आहे. तो केंव्हां व कसा बांधला त्याची निगराणी कशी करतात याबद्यल कुतहुलता होती पण बरोबर माहिती मिळण्याचे भाग्य नव्हते. किल्ला तीराला लागून चांगला 1 किमी लांब बुरूज 200 ते 300 फूट उंच आत अनेक दालने व वस्तुसंग्रहालय 17 व्या शतकातील तलवारी बंदुका राजघराण्यातील वापरले जाणारे उंची बनारसी सिल्कचे भरजरी कपडे भांडी कुंडी व्यवस्थित ठेवलेली त्याला साजेसा झुंबरांचा महाल आजकाल फिल्म शूटींगसाठी दिला जातो. एका भुयारी रस्त्याने तळघरात उतरलो तेथून 20 ते 30 उंच पायऱ्या चढून एका देवळापाशी आलो.लागूनच एक गच्ची होती समरा संथ वाहाणारे गंगचे पात्र मध्यात डुलणारा पिंप पूल पात्रातून डुलत चाललेल्या छोटया होडया खडया शिपायांसारखे ताठ उभे असलेले बुरूज वातावरणातील नीरव शांतता मनमुराद आनंदात बुडून गेलो. दसऱ्याला फुलांची सजावट व दिव्यांच्या रोषणाईत किल्ला उजळून निघतो. रामनगर ते वाराणसी प्रवास टॅक्सीने करत होतो इतका बेजबाबदार व अक्कलशुन्य ड्रायव्हर ज्या सुसाट वेगाने गाडी चालवत होता ते पाहून तो आम्हाला थेट मनकर्णिका घाटाचा र्स्वगाचा रस्ता दाखविणार असे वाटू लागले होते.
अशा बहुढंगी शहरात विविध उद्योग चालतात. पक्षांची निर्यात व पैदास करण्याचे मोठे केंद्र विविध लोणची विविध खाण्याच्या पानांची उत्पादन केंद्रे माती व धातूची नक्षिकामाची भांडी याबरोबर कथ्थक नृत्यकेंद्रे शास्त्रिय संगिताची घराणी हे सगळे अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक शहराला भेट देत असतात ताजमहाल खालोखाल सर्वात ज्यास्त परदेशी पर्यटक वाराणसीत येतात. काही जण महिनेचे महिने अनेक कला शिकतात पुस्तके लिहीतात.
रांड सांड सिरी सन्यासी इनसे बचे तो सैवे कासी अशा बहुढंगी शहरात बिस्मीलॅांखाँचे वास्तव्य होते तानसेन ते तुलसीदास कबिर या सर्वांचे हे माहेरघर नवरात्रीची रामलीला नौटंकी रात्र रात्र जागविणाऱ्या नाचगाण्याच्या मैफीली वेश्याव्यवसायातील दर्जा जोपासणाऱ्या कलावंतिणी अशा बहुढंगी कलांचा साज गंगेला लाभलेला आहे. सकाळच्या कोवळया सुर्यकिरणात चमचमणारे घाट मोहून टाकतात व हजारो या्रत्री गंगास्नानानी पापमुक्त होतात आणि जिवंतपणी स्वर्गमुक्तीचा मार्ग दिसल्याची प्रचिती येते. अशी आहे पुण्यनगरी काशी.
डॉ अविनाश वैद्य
Leave a Reply