नवीन लेखन...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला.

मराठ्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.

राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो…” सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्याबाइंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!” प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.

मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हणजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.

अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सास-याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता…आताही फारसा नाही…परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.

१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्ध्या होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते,, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, “सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती.” अहिल्यादेवींनी शेतसारा असो कि शेतीसाठीचे पाणी वाटप…यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली. राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाविलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि “भिल्लाडी” ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला. जगातील हे पुन्हा पहिले उदाहरण आहे.

हैदराबादचा निजाम म्हणतो…””Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar.” अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. अहिल्यादेवींना आम्ही करंट्या अभिमन्यांनी “एक धार्मिक महिला” असे त्यांचे रुप रंगवले आहे. त्या नक्कीच धार्मिक होत्या. महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणा-या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली.
उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करनारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील.

अहिल्याबाई होळकर यांचे १३ ऑगस्ट १७९५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..