कोणत्याही कामाचं केलेलं कौतुक म्हणजे तो एक पुरस्कारच असतो. त्या कौतुकानं त्या व्यक्तीला उमेद मिळते. पाठीवर मिळणारी शाबासकी, हे देखील एक प्रकारचं कौतुकच असतं.
लहानपणापासून असंच घरातून, शाळेतून, मैदानातून केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक झाल्याने त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. मग ती कला असो वा अभ्यास, त्यामध्ये प्रगती होत जाते.
तिसरीत असताना मला रांगोळी स्पर्धेत एक गोष्टीचं पुस्तक पारितोषिक म्हणून मिळालं होतं. कदाचित त्यामुळेच मी चित्रकलेकडे वळलो.. तुम्हाला जीवनात योग्य दिशा मिळण्यासाठी शाबासकी किंवा पारितोषिकाची आवश्यकता असतेच. पुढे शालेय जीवनात मला चित्रकलेच्या स्पर्धेतून अनेक पारितोषिके व सर्टिफिकेट्स मिळाली, तरीदेखील ते पहिलं मिळालेलं ‘गोष्टीचं पुस्तक’ अनमोल आहे…
शाळेनंतर कॉलेजमध्ये देखील माझ्या चित्रकलेचं कौतुक झालं. पुढे जाहिरातींच्या व्यवसायात कामं केल्यानंतर, पंधरा वर्षांनी महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जाहिरातीचा पहिला पुरस्कार ‘पैंजण’ या चित्रपटाच्या कामाबद्दल मिळाला.
कुणाच्याही शिफारशीशिवाय मिळणाऱ्या पुरस्काराचा आनंद वेगळाच असतो. अशाच पुरस्कार सोहळ्यात एका निर्मात्याने पहिला पुरस्कार घेतल्यानंतर स्टेजवरुन त्याने ‘मी पुन्हा येणार आहे’ असे सांगितले.. आणि खरंच तो सहा वेळा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला. या पुरस्कारांचं त्यानं आधीच सेटींग केलेलं होतं. त्याला खरंच पुरस्कार मिळण्याची योग्यता होती, तर त्यानं पुन्हा चित्रपट निर्मिती का केली नाही? असंच पुन्हा एका सोहळ्यात घडलं. त्या निर्मात्याने एकाच चित्रपटासाठी, चौदा पुरस्कार घेतले. मात्र पुन्हा चित्रपट निर्मितीबद्दल ‘ब्र’ ही काढला नाही..
आम्हाला तीन चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर, आॅफिसवर आलेला आमच्याच क्षेत्रातील एक मित्र पुरस्काराची बाहुली पाहून म्हणाला, ‘ही बाहुली मिळून, ती काय उपयोगाची? त्यापेक्षा पैसे द्यावेत.’ आम्ही त्यावर काही उत्तर दिले नाही. त्याला साधी गोष्ट कळली नाही की, पैसे खर्च होऊन जातात.. स्मृतिचिन्ह रहातं.. पुढे तो असंही म्हणाला की, ‘भंगारवालेही हिला घेणार नाहीत..’ माणसांची एखाद्या वस्तूकडे पहाण्याची विचारसरणी व बुद्धीची पातळी, वेगवेगळी असू शकते..
पहिल्यांदा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद वाटला होता.. काम उत्तम होऊ लागल्याने अजून दोन वेळा बाहुली मिळाली. एकदा मनात विचार आला होता की, पुरस्कारामुळे आपल्याला अधिक चित्रपटांची कामं मिळतील. मात्र तसे काही प्रत्यक्षात घडले नाही.. जसं एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरवर अनेक पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख असेल तर तो चित्रपट पहायला कुणीही धजवत नाही.. तसंच आमच्या पुरस्काराने घडलं.. मुंबईचे निर्माते लांब आहेत, असं गृहीत धरलं तरी पुण्यातील एकही चित्रपट निर्माता आमच्याकडे जाहिरातीसाठी आला नाही..
पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत या राज्य पुरस्काराला फार महत्त्व होतं. त्यानंतर अनेक संस्था, चॅनेल चित्रपटांसाठी पुरस्कार देऊ लागल्या आणि हा राज्य सरकारचा पुरस्कार झाकोळून गेला. अलीकडे कित्येक वर्ष हा पुरस्कार सोहळा कधी संपन्न होतो याची वर्तमानपत्रात, साधी बातमीदेखील येत नाही. पुरस्काराची रक्कम ही आता पाच आकडी झालेली आहे, मात्र त्या रकमेला, ते पूर्वीचं ‘वैभव’ राहिलेलं नाही…
अलीकडच्या काळात पुरस्कार हे मुबलक प्रमाणात दिले-घेतले जातात. दोन नामवंत संस्था एकमेकांच्या जवळच्या मंडळींना, पुरस्कारांची देवाण घेवाण करतात. काहीजण संस्थेकडे ‘मला पुरस्कार द्या’, अशी मागणीही करतात. त्यासाठी त्यांची खर्च करण्याची तयारीही असते. नगरपालिकेचे पुरस्कार मध्यस्थांच्या शिफारशीने दिले जातात. पुरस्काराची रोख रक्कम जाहीर केल्याप्रमाणे मिळतेच असं होतं नाही. शासकीय मोठे पुरस्कार स्विकारतानाही त्यांच्या अटी, घेणाऱ्यांना पाळाव्या लागतात. पुरस्कारार्थी देखील परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी या अटी मान्य करतो. निवड समितीचा निर्णय आयत्यावेळी बदलला जाऊ शकतो. या झोलझालमध्ये खरा पुरस्कारार्थी दूरच राहतो.
पुण्यातील एका मान्यवर कलाकारास जागतिक स्तरावरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तशी त्याची जाहिरातही वर्तमानपत्रात येत असते.
काही पुरस्कारांसाठी उमेदवारांना स्वतःच्या कारकिर्दीची माहिती संबंधितांना द्यावी लागते. समिती त्यावर विचार करुन निर्णय घेते. अशावेळी त्या पुरस्काराला योग्य अशा व्यक्तीला, काहीच कल्पना नसेल तर ती व्यक्ती अंधारातच राहते.
अनेक नामवंत व्यक्तींना असंख्य स्मृतिचिन्ह मिळतात. ती व्यवस्थित सांभाळणे एखाद्यालाच जमते. त्यासाठी शोकेसची आवश्यकता असते. उघड्यावर असतील तर त्यावर हवामानाचा परिणाम होऊन ती स्मृतिचिन्हं खराब होतात. कित्येक नामवंत व्यक्ती गेल्यानंतर ती स्मृतिचिन्हं बेवारशी झालेली आहेत..
पुरस्कारासाठी मोठं कारण असतं, सत्कार हा छोट्या कामगिरीबद्दलही केला जातो. जसं एखादा मोठा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्या व्यक्तीला भेटून पुष्पगुच्छ देऊन वैयक्तिक किंवा संस्थेतर्फे छोटासा सत्कार केला जातो.
आमच्या आतापर्यंतच्या डिझाईनच्या कामामध्ये कधी पुस्तकाचे मुखपृष्ठ, सीडी कव्हरचे डिझाईन, स्मरणिकेचे मुखपृष्ठ केल्याबद्दल, राज्य पुरस्कार, चित्रकर्मी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झालेले आहेत. काही वेळा काम करुनही, सहभागी असूनही नावही घेतलं गेलेलं नाही.. असंही घडलेलं आहे.. त्यावेळी नाराजी झाली होती, आता मात्र काही वाटत नाही.. असं चालायचंच.. म्हणून सोडून द्यायचं.
त्यासाठी, आपण एक सर्वसामान्य आहोत, हे लक्षात ठेवायचं… चित्रपटसृष्टीतील कित्येकांना व्हीलचेअरची वेळ आल्यानंतर फाळके पुरस्काराने गौरविले जाते.. त्याआधी तो देण्याचं कुणाच्याही लक्षात येत नाही.. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सुलोचना दीदींना फाळके पुरस्कारासाठी सरकार आणखी किती वर्षे ताटकळत ठेवणार आहे हे सरकारच जाणे…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८
१९-७-२१.
Leave a Reply