नवीन लेखन...

पुरिया धनाश्री-संधिप्रकाश

“गाय जशी हंबरते,
तसेच व्याकूळ व्हावें
बुडतां बुडतां सांजप्रवाही;
अलगद भरून यावे.”
कवी ग्रेसच्या या अजरामर कवितेच्या ओळी वाचताना, मला नेहमी पुरिया धनाश्री रागाची आठवण येते. तसाच तो संधिप्रकाश, अंधार येत असतो पण प्रकाशाचे अस्तित्व जाणवत असतो. मनात कुठली एखादी आर्त आठवण दाटून येते आणि गळ्यात आवंढा अडकतो. आपल्याला फार एकटे, एकटे वाटत असते आणि त्या हुरहुरीला, “कोमल रिषभ” आणि “कोमल धैवत” स्वराची साथ मिळते. बघता, बघता तोच संधीप्रकाश आपल्याला आश्वस्त करायला लागतो. रागदारी संगीताचे हे अपूर्व वैभव आपल्या मनाला जाणवते.
भारतीय संगीतात, “रागसंगीत’ ही एक अपूर्व चीज आहे, ज्या स्वररचनेला जागतिक संगीतात तोड नाही. पाश्चात्य शास्त्रीय संगीतात, आपल्यासारखेच ७ स्वर असतात. पण, “सिंफनी” हीं अत्यंत बांधीव स्वर रचना असते, त्यात, वैय्यक्तिक विचारला फारसे स्थान नसते. “बीथोवन, मोझार्ट” यांच्या रचना असामान्य खऱ्या आणि सादर करणे, हे अति कौशल्याचे काम आहे. पण, आपल्या रागदारीत जसा, वैय्यक्तिक विचार, याला, जास्त प्राधान्य साते आणि ती “मिंड”, “गमक” या अलंकारांनी सजलेली असते. त्यामुळेच, आपले रागसंगीत, संपूर्णपणे, स्वरलेखनाच्या परिभाषेत ठामपणे लिहिता येत नाही. प्रत्येक कलाकाराची  प्रतिभा, त्या रागाचे तेच स्वर, अत्यंत वेगळ्या मांडणीतून सादर करीत असतो आणि आपण, ऐकणारे स्तिमित होत असतो.
पुरिया धनाश्री हा असाच अवीट गोडीचा राग. आरोही सप्तकात “रे” आणि “ध” कोमल आणि अवरोही सप्तकात तीव्र “म”  स्वराची आस घेऊन शुद्ध “म” स्वरूपात येतो. तसे बघितले तर हा संध्याकाळचा राग आहे त्यामुळे असेल पण, या रागासोबत “श्री”,”मारवा” रागाची छाया पडलेली दिसते. मला तर, नेहमीच मारवा ऐकताना, एखादी जिवंत ठसठसलेली जखम वाहत असल्याचा भास होतो. इतका, वेदनेचा उग्र अनुभव पुरिया धनाश्रीत येत नसला तरी, संध्यासमयीची आर्त हुरहूर आणि त्याचबरोबर, प्रणयोत्सुक विरहिणीची व्यथा नेमकेपणाने व्यक्त केली जाते. संध्याकाळी, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास आतुर होत असताना, आपल्याला, तसाच प्रतिसाद मिळेल न मिळेल, या विवंचनेतून आकाराला आलेली भावना, या रागिणीत फार समर्थपणे दिसून येते. पुरिया राग हा तसा या रागीणीच्या जवळ जात असला तरी, पुरिया हा जास्त करून भैरवी जवळ फार जातो, कि त्यात, “आता सारे संपत येत आहे,” अशी एकतर साफल्याची किंवा हताशतेची  भावना अधिक दृग्गोचर होते. पुरिया धनाश्रीत, इतकी विवशता आढळत नाही.  या रागातील काही स्वरसंहती फारच जीवघेण्या आहेत, जसे,”नि (को)रे ग म प”,”म ग म (को)रे ग”,”म(को) ध नि सा”.
सूर्यास्त होत असताना, गाभाऱ्यावर वस्त्र पडत जावे त्याप्रमाणे, अवकाशात तिमिराचे राज्य हळूहळू सुरु होत असताना, दूर क्षितिजावर, रंगांची उधळण होत असते. फक्त गुलाबी रंगात, निळ्या रंगाचा गडदपणा मिसळत असतो. अशा वेळेस, जाणवणारी, कालिदासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास, “पर्युत्सुक” अवस्थेत, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराची आतुरतेने वात पाहत असताना, होणारी धडधड, पुरिया धनाश्रीमध्ये फार अप्रतिमरीत्या उमटते. थोड्या, काव्यात्मक भाषेत बोलायचे झाल्यास, बालकवींच्या, “औदुंबर” कवितेतील, येणारा, “गोड काळिमा” या रागीणीशी फार जवळचे नाते दर्शवून जातो.
ज्ञानेश्वरांनी निर्मिलेला  “दु;ख कालिंदी” या जाणिवेशी अधिक तरलतेने, हीं रागिणी आपले नाते सांगते. आणि इतके लिहूनही, पाडगावकरांच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे, “शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले” हीं तर भावना  मुळाशी सतत वास करताच असते. खर तर, कुठलाही राग/रागिणी हीं नेहमीच आपल्याला कैवल्यात्मक दर्शनातून, शब्दांच्या पलीकडल्या भावनेशी आपले नाते जोडीत असते, आणि हीं गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे, पुरिया धनाश्रीमध्ये दृग्गोचर होते. इथे, या रागिणीचे स्वरलेखन करून, पांडित्याचा आव आणण्याची काहीच गरज नाही तरी देखील, “कोमल निषाद” हा, या रागिणीचा एक अलौकिक नजराणा आहे. खरतर, कुठलीही स्वरलिपी, हीं त्या कलाकृतीचा एक आराखडाच असतो. कलाकार, त्यात अंतर्भूत असलेला अनाहत नादाचे आपल्याला दर्शन घडवीत असतो. कुठलाही राग, हा मला नेहमीच आलापीमध्ये अधिक भावतो. त्याचे काय होते, एकदा लय मध्य आणि द्रुत लयीत शिरली कि मग त्याचे तालाशी गणित जुळते आणि, मग लयीचे वेगवेगळे बंध ऐकणे, इतकेच आपल्या हाती राहते. द्रुत लयीत तर, प्रत्येक स्वर, अनुभवायला वेळच मिळत नाही. संथ लयीत, तुम्ही प्रत्येक सुराचा आपल्या कुवतीप्रमाणे आनंद उपभोगू शकता. एखादा हिरा, जसा प्रत्येक कोनातून वेगवेगळी किरणे फाकीत असतो, तसा रागात प्रत्येक सूर हा वेगवेगळ्या अंदाजाने आपले अस्तित्व दर्शवित असतो.
कलापिनी गंधर्वांची अप्रतिम चीज “दिन डुबा आजरा” ही मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. मध्य लयीत इतक्या वेगवेगळ्या “जागा” घेते की ऐकताना थक्क व्हावे. आधीच कुमारांची अभ्यासू वृत्ती आणि शिकवणी बिंबवल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणून देता येईल. चीजेचे शब्द देखील, रागाच्या भावदर्शनाला सुयोग्य. चीज अप्रतिम रंगणार, यात कसली शंका.या रचनेत आपल्याला, रागातील “कोमल रिषभ” स्वरावरील आंदोलने खास ऐकण्यासारखी आहेत. संध्याकाळच्या समयीची अनामिक हुरहूर आणि विरही भावना, या स्वरातून किती अप्रतिमरीत्या निर्देशित होते. खरे तर गुरूची शिकवण तशीच्या तशी सादर करणे यात तशी सर्जनशीलता आढळत नाही परंतु शिकवलेल्या रचनेतून, नवीन सौंदर्यस्थळे शोधून, त्यांचे अत्यंत वैचारिक सादरीकरण करणे, इथे कलाकाराच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो.
या रागात तशी गाणी फार ऐकायला मिळत नाहीत. पण, जी गाणी आहेत, ती दीर्घकाळ मनात ठाण मांडून बसलेली आहेत. “बदलते रिश्ते” चित्रपटातील लताबाईंनी आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले “मेरे सांसो को महेक आ रही है” हे असेच चिरस्मरणीय गाणे.
“मेरे सांसो को महेक आ रही है
ये पहले प्यार की खुशबू
तेरी सांसो से शायद आ रही है”
अतिशय संथ लयीत सुरु होणारे गाणे, बघता, बघता अवघड लयीत आणि तार सप्तकात जाते. सुरवातीचा “हुंकार” आणि “आलाप” यातून, या रागाची ओळख पटते. “मेरे सांसो को” हे “गंधार” आणि “मध्यम” स्वरावर किंचित थांबून, पुढे गाणे इतक्या वेगळ्या वळणाने सरकते आणि त्याबरोबर लय किती अवघड होत जाते, हे नीट लक्ष दिल्यावर ध्यानात येते.
“शुरू ये सिलसिला है, उसी दिन से हुवा था, अचानक तुने जिस दिन मुझे युंही छुआ था” या ओळीत, “शुरू ये सिलसिला” इथे या रागातील, (कोमल) “रे”,”ग” आणि “म(तीव्र)” अशी स्वरयोजना किती सुंदर आहे. खरतर अशा स्वरलिपीत मांडून फारसे साध्य होत नाही, हे खरे म्हणजे बहुतेक लोकांना असे विवेचन डोक्यावरून जाते पण, असे शब्दागणिक जर का स्वर मांडले तर बहुदा, एकतर रागाची ओळख पटून, तेच गाणे वेगळ्या नजरेने ऐकता येते. तसेच, गाण्याची लज्जत अधिक वाढण्याची शक्यता असते. लताबाईंच्या आवाजाची खासियत पुढे येते. “अचानक तुने जिस दिन मुझे छुआ था” ही ओळ, अगदी खालच्या पट्टीत घेतलेली आणि, आधीची ओळ, वरच्या पट्टीतील स्वरांत गायल्यानंतर. हा सगळा सांगीतिक खेळ फार अवघड आहे. या वाक्यातील प्रणयी मुग्धता ध्यानात घेऊन, लताबाईंची गायकी अधिक मुग्ध करते.
काही वर्षापूर्वी आलेल्या, “रंगीला” चित्रपटात असेच असामान्य गाणे ऐकायला मिळाले.
“हाय रामा ये क्या हुवा, ऐसे हमें सताने लगे,
तुम इतनी प्यारी हो सामने, हम काबू में कैसे रहे;
जाओ हम को तो आती शरम है,
तेरी ऐसी अदा पे तो फिदा हम हैं.”
हे देखील लयीला अतिशय कठीण गाणे, याच रागाच्या आधाराने, बांधले आहे. या गाण्यात, रेहमान सारखा संगीतकार, एखादी सुंदर “तर्ज” हाताशी आल्यावर, त्यात किती वेगवेगळे प्रयोग करू शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे. गाण्याच्या सुरवातीलाच, हरिहरनच्या आवाजात, अनुरणात्मक हुंकार आहे आणि ते जर बारकाईने ऐकले तर त्यात “लपलेला” पुरिया धनाश्री ऐकायला मिळतो. संगीतकार फार प्रयोगशील असला की तो गाण्यात किती प्रकारे विविधता आणू शकतो, यासाठी हे गाणे अभ्यासण्यासारखे आहे. सुरवातीच्या आलापीनंतर ज्या तालात हे गाणे सुरु होते, त्याचा संबंध पाश्चात्य “शांत जाझ” संगीताशी सहज जोडता येतो.
अर्थात, या गाण्यात, रेहमानवर, दक्षिणात्य संगीताचा असलेला प्रभाव स्पष्ट दिसतो. शब्दोच्चार आणि त्यानुसार होणारे स्वरोच्चार, यातून दक्षिणात्य शैली उठून दिसते. खरेतर पुरिया धनाश्री राग हा उत्तर भारतीय संगीतातील पण, त्या रागाचे सूर हाताशी घेऊन, त्याला दक्षिणात्य संगीताची डूब देऊन, त्याचा संबंध जाझ संगीताशी जोडणी करणे, हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. या गाण्यात, सुरवातीला जो ताल आहे, त्यापाठीमागे तंबोरा वाजत आहे आणि ते सूर नीट  ऐकल्यावर तर पुरिया धनाश्री लगेच उठून दिसतो. एकतर तंबोरा हे वाद्यच असे आहे, त्यातून सूर उमटायला लागले की, मन तिथेच एकाग्र होते. या रागाचे जे प्रमुख स्वर आहेत – “पंचम” आणि “रिषभ” या स्वरांचे प्रत्यंतर या तंबोऱ्यातील गुंजणाऱ्या स्वरांतून मिळते.
रागदारी संगीत अवघड असते, असे जे रसिक मानतात, त्यांच्यासाठी हे तंबोऱ्याचे सूर खरच आनंददायी ठरू शकतात. सुगम संगीतातून, राग संगीताची ओळख आणि आवड अशाच प्रकारे अधिक परिणामकारक होऊ शकते.
असेच एक अतिशय सुंदर गाणे, “१९४७:अर्थ” या चित्रपटात, “रुत आ गयी रे, रुत छा गयी रे” हे गाणे सुखविंदर सिंग यांच्या आवाजात ऐकायला मिळते.
“रुत आ गयी रे, रुत छा गयी रे.
पीली पीली सरसो फुलें, पीले-पीले पत्ते झुमें
पीहू-पीहू पपीहा बोले, चल बाग मे”
लोकसंगीतात जसे काव्य असते त्याच धर्तीवर जावेद अख्तर यांनी इथे कविता लिहिली आहे.
याची चाल देखील ए.आर. रेहमान यांनीच बांधलेली आहे. आता इथे एक गंमत आहे, वरती देखील मी रेहमानच्या दिग्दर्शनाखाली एक गाणे दिले आहे आणि आता इथे हे गाणे. एकच रागातून दोन भिन्न रंगाच्या चाली निर्माण केल्या आहेत. सुखविंदर सिंग यांचा आवाज अतिशय दमदार तसेच लगेच तार साप्तकाची पातळी गाठणारा पण इथे रेहमान यांनी त्यांच्याकडून काहीशा द्रुत लयीत पण प्रणयी थाताचेच गाणे गाउन घेतले आहे. चाल बारकाईने ऐकली म्हणजे लगेच फरक आढळून येतो पण स्वरावली तपासली आणि चालीचे “मूळ” शाढले म्हणजे पुरिया धनाश्री रागाचे नाते कळून घेता येते. रागदारी संगीत किती भरीव, श्रीमंत आहे, याची ही दोन गाणी म्हणजे उत्तम उदाहरणे आहेत.
या रागात सुषिर वाद्यांचा प्रभाव अधिक भावतो, हे सहज समजून घेत येईल. एकतर सुषिर वाद्ये, ही श्वासाच्या गतीवर आणि दाबावर सादर केली जातात आणि त्यामुळे त्यातून, विशेषत: मंद्र सप्तकात अधिक परिणाम साधला जातो. सुषिर वाड्यातून निघणारे हलके, मंजुळ सूर, संध्याकाळची कातर वेळ आणि त्याची “सम” नेमकी साधतात.
संध्याकाळ जवळ आलेली असते आणि आणि, अशा शांत समयी, अशाच हुरहुरत्या क्षणी, आसमंतात, प्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार याच्या अप्रतिम बासरीचे सूर आसमंतात पसरतात. बासरीच्या त्या सुरांची अशी काही भूल मनावर पसरते की आपण आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसे याची जाणीवच होत नाही,. संपूर्ण वेगळ्या विश्वात आपण वावरायला लागतो आणि असे हे वावरणे, हीच तर खरी रागदारी संगीताची खरी शक्ती आहे जी पुरिया धनाश्री रागातून आपल्याला जाणवून घेता येते.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

1 Comment on पुरिया धनाश्री-संधिप्रकाश

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..