(जैन लोककथा)
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
तेव्हा वणिक पुत्र त्याच्या दुकानात थांबून ग्राहकांना मीठ, तूप, तेल, गुळ इ. वस्तू बांधून देवू लागला.
वाण्याने हिशोब केला तर त्या दिवशी त्याला बराच नफा झाला होता. त्याने वणिक पुत्रास जेवणासाठी निमंत्रित केले. परंतु तो म्हणाला, “माझे अजून दोन मित्र आहेत.” त्या वाण्याने त्याच्या मित्रांना देखिल बोलावून त्यांना जेवण, विडा देऊन सत्कार केला आणि त्याला पाच रूपये दिले.
दुसऱ्या दिवशी मंत्री पुत्राची पाळी होती. तो न्यायालयात गेला तेव्हा तेथे खटला सुरू होता. दोन सवतींमध्ये भांडण सुरू होते. एका सवतीला मुलगा होता परंतु ज्या सवतीस मुलगा नव्हता ती त्या मुलाचे अत्यंत प्रेमाने पालन पोषण करीत होती. त्यामुळे तो मुलगा आपल्या आईजवळ पण जात नव्हता.
एक दिवस दोघींमध्ये भांडण जुंपले. दोघी म्हणत होत्या की, “हा माझाच मुलगा आहे.” न्यायाधीश पण बुचकळ्यात पडला. तेव्हा मंत्रीपुत्राने विनंती केली की, “जर तुमची आज्ञा असेल तर मी ह्या खटल्याचा निर्णय देवू शकतो.” न्यायाधिशाने होकार देताच मंत्रीपुत्र दोन्ही सवतीना बोलावून म्हणाला, “जर तुम्ही खरं बोलला नाही तर आम्ही या मुलाचे दोन तुकडे करून दोघींना अर्धे-अर्धे वाटून देवू.” हे ऐकताच मुलाची आई रडत रडत म्हणाली, “मला मुलगा नको आहे. यास माझ्या सवतीला देवून टाका. जर हा जिवंत राहिला तर मी कमीत कमी त्याला पाहू तर शकेन.” न्यायाधिशाने ओळखले की हा मुलगा कोणाचा आहे. त्या मंत्रीपुत्राचा त्यांनी सन्मान करून त्याला एक हजार रुपयाचे बक्षीस दिले.
तिसऱ्या दिवशी राजपुत्राची पाळी होती. तो आपले भाग्य अजमवण्यासाठी निघाला. दिवसभर भटकत राहिला आणि शेवटी येवून मित्रांना म्हणाला, “मित्रांनो, मला वाटतं की माझ्या पुण्याची, माझ्या भाग्याची जागा आपले राज्यच आहे. आपण तेथेच परत जावे.”
Leave a Reply