गणगोत, गुण गाईन आवडी ही माझी लाडकी पुस्तकं आहेत.
मी साडे चार वर्षांचा होतो, तेव्हा पहिलं पुस्तक वाचलं होतं- ‘कावळ्याला लागली तहान’, अजून डोळ्यांसमोर ते ज्योत्स्ना प्रकाशनचं पुस्तक आहे. आईनं अक्षरओळख शाळेत जाण्यापूर्वी करून दिली होती.
आजीजवळ सर्व पुराणं असायची, मी सहा सात वर्षांचा असताना सह्याद्री पुराण वाचलं होतं. मला त्यावेळेपासून जमदग्नी आणि परशुरामाचा राग येतो. बाप म्हणाला म्हणून हा आईला कसा मारू शकतो? पृथ्वी एकवीस वेळा नि:क्षत्रिय केली म्हणे, हेही मला तेव्हा पटायचं नाही. मी हा प्रश्न विचारल्यावर आई म्हणाली होती, हे चूकच आहे. कोणीही कारण नसताना दुसऱ्याचा द्वेष करू नये, असो.
आई दररोज सकाळी गीताई, दुपारी एखादं गोनीदा, रणजित देसाई, दुर्गा भागवत, पुलं, वपु अशा लोकांची मराठी पुस्तकं किंवा प्रेमचंद, भीष्मनारायण सिंह, बच्चन, निर्मल वर्मा, दुष्यंत सिंग, गुलशन नंदा यांची हिंदी पुस्तकं वाचायची (ती हिंदीची पहिली प्रोफेसर होती- संगीत शक या नावाने तिनं संशय कल्लोळ या नाटकाचा समश्लोकी अनुवाद केलेला; गंधर्व जन्मशताब्दी वर्षात विद्याधर गोखले यांनी त्याचे देशभर प्रयोग केले होते, नॅशनल नेटवर्कलाही ते दाखवलं होतं) सायंकाळी ज्ञानेश्वरीच्या निदान २०-२१ ओव्या व रात्री झोपताना गणेश पुराण वाचायची व वडील ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी मधून आणलेली इंग्रजी पुस्तकं वाचायचे. त्यात अलेक्स हॅली, आर्थर हॅली ते चेस, शेल्डन असं सारं असायचं. ते आपापल्या कामात असायचे तेव्हा, त्यांची पुस्तकं माझ्या ताब्यात असायची. आमच्या कर्जतच्या लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या वर्गणीदारांत आमच्या घरातले सहा सदस्य होते. पाच आजीव व सहावा मी. अकरा पुस्तकं रोज घेऊन यायचो. वाचून दुसऱ्या दिवशी परत करायला जायचो. बुधवारी वाचनालय बंद, त्यामुळे मंगळवारी ते बंद व्हायच्या वेळी जायचो.
अशी पुस्तकं वाचायची सवय लागली. कटरे सर, तुमचं वाचून ही सारी आठवण झाली.
दर महा मी पुस्तकं विकत घेतोच, मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही, पण पुस्तकांचं व्यसन आहे. विकत घेतलेली पुस्तकं सांभाळून ठेवतो, पण मध्यंतरी कोकणात पूर येऊन चिपळूण व महाडच्या महाविद्यालयाच्या वाचनालयाचे नुकसान झाले. प्रकाशक संघाच्या व आपल्या अशोक मुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारभर पुस्तकं पुण्याला जाऊन त्यांना दिली, माझ्या विभागास जवळपास दीड हजार पुस्तकं/ नियतकालिके दिली व मुंबई विद्यापीठाच्या आमच्या मराठी विभागाला दोनकशे दिली. तरीही तेव्हढीच पुस्तकं व नियतकालिके घरात असतील. कोविड काळात मी पहिल्यांदाच माझ्या पुस्तकांची ग्रंथालय पद्धतीने यादी केली.
मला अलीकडे चरित्रं वाचायला आवडतात, मध्यंतरी रंगनाथ पठारे सरांबरोबर बोलताना अचानक लक्षात आलं की, हालाची गाथा सप्तशती ही नव्याने वाचली पाहिजे, मागवली व वाचताना त्याचं narrative कसं वेगळं आहे हे जाणवत गेलं…
माझ्या पिढीतील किशोर कदम म्हणजे कवी सौमित्र, नीतीन रिंढे, कैलास जोशी, उदय रोटे ही मंडळी केव्हढं तरी वाचत असतात.
मला किशोर कदमचं वाचनाचं वेड थक्क करतं. त्यानं एकदा मला विल्यम डेरीलिम्पलच्या द अनार्की या पुस्तकाबद्दल सांगितलं, अर्धा तास तो त्यावर बोलत होता, जरा काही वेगळं वाचलं की तो ते शेअर करतो. त्याचं व माझं फोनवरचं संभाषण मी अनेकदा रेकॉर्ड करून ठेवतो. प्रत्येक वेळी तो इतकी नवी पुस्तकं सांगतो की माझ्या खुजेपणाची जाणीव होते. हा माणूस कवी आहे, खूप बिझी नट आहे, खूप भटकतो, ते करताना तो सुलभाची व लेकाची काळजीही घेतो आणि गावोगावच्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तकं घेत असतो. त्याच्या घरी एकदा पुस्तकांवर डल्ला मारायला जायचं आहे.
– नितीन आरेकर
Leave a Reply