पुतळे उभारुनी काय केले ते सांगा
या एवढ्या समोर नाकर्त्यांच्या रांगा
कसे कोण ठेवील या तुमच्या ढोंगा
मनामधे!
शिवजन्म आज सारे म्हणवुनी घेतो
दिमाखात समाजास सुट्टी ही देतो
खरंच विचार त्यांचे पुढे नेतो?
स्वतःलाच विचारा!
अर्थ-
पुतळे उभारुनी काय केले ते सांगा, या एवढ्या समोर नाकर्त्यांच्या रांगा, कसे कोण ठेवील या तुमच्या ढोंगा, मनामधे!
(एखाद्या व्यक्तीचे पुतळे नुसते जागोजागी उभारले म्हणजे त्यांना आपलंसं केलं असं होतं नाही. दिखावेपण आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय, त्यामुळे नुसते पुतळ्यांना हार घालून, त्यासमोर घोषणा देऊन आणि त्यानावे गर्दी जमा करून काही होत नाही. या असल्या क्षणिक कांगाव्या समोर जनता आता बधणार नाही तर तुम्हाला त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.)
शिवजन्म आज सारे म्हणवुनी घेतो, दिमाखात समाजास सुट्टी ही देतो, खरंच विचार त्यांचे पुढे नेतो?, स्वतःलाच विचारा!
(शककर्ते शिवराय यांचा आज जन्मदिवस, त्यासाठी सुट्टी अर्पण करून त्याचा गवगवा आणि नुसते नाटकी चेहरे करून काय उपयोग? खरंच आपला समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जातोय का? आपण स्वतः त्यांच्या विचारांना आपलंसं करून जगतोय का? केवळ नामस्मरण करून त्यातून भक्ती साध्य होत नाही तर त्या नामस्मरणाच्या डोहात मनसोक्त पोहावं लागतं तर त्या नामाशी आपण एकरूप होऊन त्या विचारांवर चालणे सोप्पे होते. नाहीतर तोंडी जय भवानी जय शिवाजी म्हणायचे आणि रात्री त्याच शिवजयंती उत्सवाच्या स्टेज मागे बाटल्या फोडायच्या, अहो रायगडावर छत्रपतींच्या मेघडबरी समोर बसून लोकांना दारू पिताना पकडले म्हणजे पहा! इतका समाज त्यांना क्षणिक मानतो अजून आत्मचिंतनाची गरज नक्की कोणाला आहे हे स्वतःला विचारा.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply