नवीन लेखन...

दर्जेदार सतारवादक पं. रविशंकर

पं. रविशंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला.

दर्जेदार सतारवादक व संगीताचे क्षितिज विस्तारित करणारे द्रष्टे संगीतकार पं. रविशंकर हे ‘भारतीय संगीताचे विश्वप्रतिनिधी’ म्हणून जगविख्यात होते. रवींद्रशंकर श्यामशंकर चौधरी म्हणजेच पं. रविशंकर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. बंगाल इलाख्यातील नडाइल जिल्ह्यातील कालिया हे तालुक्याचे गाव (सध्या बांग्लादेशात) त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील कायदेतज्ज्ञ होते व झालवाड संस्थानाच्या महाराजांकडे त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून व नंतर लंडन येथे वकील म्हणून काम केले.

श्यामशंकर व हेमांगिनी या दांपत्यास उदयशंकर, राजेंद्रशंकर, ज्ञानेंद्रशंकर व रवींद्रशंकर ही चार अपत्ये होती. हे अत्यंत सधन कुटुंब होते. वडिलांनी दुसरा विवाह केल्याने मुलांचे पालनपोषण आई हेमांगिनी यांनीच केले. घरात विद्याभ्यास, कलाप्रेम व उच्च अभिरुचीचे वातावरण होते. नवतावादी नर्तक असणारे ज्येष्ठ बंधू उदयशंकर यांच्याकडून रविशंकरांची संगीताशी तोंडओळख झाली. वयाच्या दहाव्या वर्षी, १९३० साली उदयशंकर यांच्या नृत्यगटात ते सामील झाले व फ्रान्समधील पॅरिस येथे गेले. तेथे ते नृत्यनाट्यांमध्ये एक नर्तक म्हणून काम करत, तसेच सरोद, सतार, इसराज ही वाद्येही वाजवीत असत. या दौर्याात ते युरोपमध्ये फिरले आणि त्यामुळे लहान वयातच त्यांना युरोपियन भाषा अवगत झाल्या. तेथील आचारांतील अदब व शिस्त यांसह पाश्चात्त्य संगीताचे संस्कार झाले. ते १९३४ साली भारतात परतले. याच काळात ते वाद्यवादनाबरोबरच कथक व कथकली नृत्यशैलीही शिकत होते. प्रथम वडील व मग आई यांचे १९३५-३६ साली निधन झाल्याने बंधू उदयशंकर हेच कुटुंबप्रमुख बनले. त्यांच्यासमवेत रविशंकर पुन्हा एकदा १९३५ मध्ये युरोप आणि अमेरिकेच्या दौर्याुवर गेले. मैहर घराण्याचे संस्थापक असणारे हरहुन्नरी कलाकार व गुरू उ. अल्लाउद्दीन खाँसाहेब ऊर्फ ‘बाबा’ हे १९३५ साली उदयशंकरांच्या नृत्यपथकासाठी या दौर्यालच्या वेळी ‘संगीतरचनाकार’ म्हणून आले. तेव्हा केवळ पंधरा वर्षांचे रविशंकर बाबांचे दुभाषी म्हणून त्यांना मदत करत. याच वेळी बाबांच्या सांगीतिक प्रतिभेचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर पडला. रविशंकर त्यांचे शिष्य बनले आणि नृत्यादी अन्य कला सोडून त्यांनी केवळ संगीताचाच व्यासंग चालू ठेवला. रविशंकरांना १९३८ साली गंडाबंधन करून बाबांनी मैहर येथे १९४४ सालापर्यंत अत्यंत कडक शिस्तीत आपला मुलगा अली अकबर व मुलगी अन्नपूर्णा यांच्याबरोबर खास तालीम दिली, रोजचा ८-१० तासांचा रियाझ करवून घेतला. रविशंकरांना तंतकारी शैली, शेकडो धृपदे, अनेक रागरागिण्या यांच्या तालमीसह लयतालाचेही उत्तम शिक्षण मिळाले. बाबांच्या तालमीत त्यांनी सूरबहार, रबाब, सरोद, बीन व सूरसिंगार या वाद्यांचे वादनतंत्र सतारीसाठी विकसित केल्याने त्यांचे सतारवादन अन्य कलाकारांच्या वादनापेक्षा अत्यंत निराळे झाले. बाबांचे रविशंकरांवर पुत्रवत प्रेम होते व त्याचमुळे १९४१ साली बाबांच्या कन्या व शिष्या अन्नपूर्णादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

रविशंकरांनी १९४४ साली मैहर सोडून मुंबईस स्थलांतर केले व त्यांनी ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) या संस्थेत ‘इंडिया इम्मॉर्टल’ या नृत्यनाट्यांसाठी संगीत दिग्दर्शन केले. याच काळात मुंबईमध्ये त्यांची सतारवादक म्हणूनही कारकीर्द सुरू झाली व बहरत गेली. अल्पावधीतच त्यांनी भारतीय संगीताच्या क्षेत्रात एक उत्तम सतारवादक म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी १९४५ साली ‘सारे जहाँ से अच्छा’ या अत्यंत गाजलेल्या गीतास चाल दिली, जी आजही लोकप्रिय आहे.

पं. रविशंकर १९४९ ते १९५६ या काळात दिल्ली येथे आकाशवाणीचे ‘वाद्यवृंद विभाग प्रमुख’ म्हणून कार्यरत असताना त्यांनी भारतीय व पाश्चात्त्य वाद्यांसाठी ‘संकल्पनाधारित स्वररचना’ केल्या. भारतीय वृंदवादनाला त्यामुळे निराळी चालना मिळाली. भारत सरकारने १९५४ साली रशियास पाठवलेल्या पहिल्या सांस्कृतिक मंडळात पं. रविशंकर यांचा समावेश होता.

पारंपरिक सतारवादनापेक्षा खूपच निराळी पद्धत पं. रविशंकरांनी विकसित केली व तिचा प्रभाव आजही आहे. धृपद शैलीची आलापचारी, मसीतखानी व रजाखानी गतकामासह निराळ्या धाटणीची गतकारी, अनेक आम व अनवट रागांची विविधेतर तालांतील पेशकश, लोकधुनांचे मनोरम वादन ही त्यांच्या मैफलीची वैशिष्ट्ये होती. ‘पं. रविशंकर यांची रागप्रस्तुती म्हणजे रागाचे उत्सवी स्वरूप’ असे म्हटले गेले आहे. आपल्या वेगळ्या शैलीनुसार पं. रविशंकरांनी सतारीत काही रचनात्मक बदलही केले व त्याद्वारे सतारीचा नादगुण बदलला, जो खास ‘रविशंकरांच्या सतारीचा नादगुण’ म्हणून वैशिष्ट्यपूर्ण आहे. धृपद शैलीतील आलाप-जोड-झाला वादनासाठी त्यांनी सतारीवर अतिमंद्र पंचम व अतिअतिमंद्र षड्जाची तार जोडली व द्रुत लयीतील झाला वाजवताना या तारांचा गोंगाट वाटू नये म्हणून त्यांच्यासाठी संदमक लावला.
अहिरललत, तिलकश्याम, परमेश्वरी, रंगेश्वरी, गंगेश्वरी, कामेश्वरी, सांझ कल्याण, राज्य कल्याण, मोहनकंस, जनसंमोहिनी, मनमंजरी, पलास काफी, जोगेश्वरी, चारुकंस, पूर्वी कल्याण, भवानी भैरव, बैरागी तोडी, कौशिक तोडी, शैलांगी, सुरंजनी, बंजारा, स्वर्णजयंती हे राग त्यांनी निर्माण केले व यांपैकी अनेक राग आज भारतीय रागसंगीतात प्रस्थापित आहेत. तीनताल, झपताल, धमार या तालांसह त्यांचे आडाचौताल, मत्तताल, जयताल, चारताल की सवारी, पंचम सवारी, शिखरताल, तसेच १९, २३, २९ अशा विषम मात्रांच्या तालांबरोबरच साडेपाच, साडेसहा, साडेनऊ मात्रांतील तालांत वादन त्यांच्यामुळे प्रचारात आले.

पं. रविशंकरांनी कर्नाटकी राग व तालपद्धतीमधील अनेक वैशिष्ट्ये आत्मसात करून ती उत्तर हिंदुस्थानी संगीतात समाविष्ट केली. तसेच किरवाणी, वाचस्पती, चारुकेशी, मलयमारुतम्, हेमावती असे कर्नाटक संगीतातील अनेक राग त्यांनी लोकप्रिय केले. अली अकबर खाँ, गजाननबुवा जोशी, श्रीधर पार्सेकर, विलायत खाँ अशा तोलामोलाच्या कलाकारांसह त्यांनी केलेले जुगलवादन खूपच गाजले.

पं. रविशंकरांनी १९५६ पासून अमेरिका व युरोपमध्ये यशस्वी दौरे व दीर्घकालीन वास्तव्य सुरू केले व ‘थ्री रागाज’ ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय एल.पी. लंडन येथे ध्वनिमुद्रित झाली. मुंबईत त्यांनी १९६२ मध्ये ‘किन्नर स्कूल ऑॅफ इंडियन म्यूझिक’ स्थापन केले. ते १९६४ पासून अमेरिकेतील कॅलिफोर्निया व लॉस एंजेलिस येथील विद्यापीठांमध्ये शिकवू लागले.
ते १९६७ पासून प्रामुख्याने अमेरिकेतच राहू लागले, तसेच त्यांनी लॉस एंजेलिस येथे ‘किन्नर स्कूल’ची स्थापना करून अमेरिकेत संगीत शिक्षणाचे केंद्र सुरू केले. त्यांना १९७० साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑॅफ आटर्स येथे भारतीय संगीत विभाग प्रमुख म्हणून निमंत्रित केले गेले. अमेरिकेतील ॲ‍ पल रेकॉडर्स या कंपनीने १९७१ साली पं. रविशंकरांच्या सांगीतिक योगदानावर ‘राग’ हा चित्रपट काढला व त्याचे न्यूयॉर्क येथे प्रथम प्रदर्शन झाले. जगातील सर्वांत मोठ्या अशा ‘सेंट जॉन डिव्हाइन कॅथेड्रल’ चर्चमध्ये त्यांना १९७५ साली मैफल पेश करण्याचा मान लाभला. भारतात १९८२ साली झालेल्या एशियाड क्रीडा महोत्सवासाठी त्यांनी रचलेले ‘अथ स्वागतम्’ हे गीत अत्यंत गाजले.

पं. रविशंकरांनी पाश्चात्त्य व अन्य संगीत संस्कृतींतील कलाकारांसह संगम संगीताचे वैविध्यपूर्ण आविष्कार केले. त्यांची १९५२ साली येहुदी मेन्युइन या प्रतिभावान पाश्चात्त्य व्हायोलिनवादकाशी ओळख झाली. मेन्युइन यांना भारतीय संगीताचा परिचय रविशंकरांनी करून दिला. त्यांनी १९५८ साली युनेस्को आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात मेन्युइन व डेव्हिड ऑॅस्ट्राख यांच्यासह वादन पेश केले, तसेच लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉल येथे सतारवादन केले. फिलिप ग्लास यांनी पं. रविशंकरांच्या हाताखाली संगीत संयोजक म्हणून काम केले व पुढे ‘पॅसेजेस’ (१९९०) या प्रकल्पांसाठी ते सहकारीही बनले. बीटल संगीताचा राजा जॉर्ज हॅरिसन तर त्यांच्या वादनाने इतका भारावला, की त्याने १९६६ साली पं. रविशंकरांचे शिष्यत्व घेतले.

‘मॉटरे पॉप फेस्टिव्हल’ या प्रख्यात उत्सवातील १९६७ सालच्या त्यांच्या प्रस्तुतीने अमेरिकेतील तरुण पिढीला जिंकले. या घटनेने अमेरिकेतील रसिकवर्ग पं. रविशंकरांचे सतारवादन आणि अर्थातच भारतीय वाद्यसंगीताकडे आकृष्ट झाला. त्यांना १९७० साली ‘लंडन सिंफनी ऑॅर्केस्ट्रा सोसायटी’ने निमंत्रित केले व असे निमंत्रण मिळणारे ते पहिलेच भारतीय कलाकार होते. या प्रकल्पात त्यांनी भारतीय रागांवर आधारित सिंफनीच्या रचना केल्या, त्यांचे संगीत नियोजक म्हणून प्रख्यात आंद्रे प्रेवीन यांनी काम केले. ‘ईस्ट ग्रीट्स ईस्ट’ या प्रकल्पात होसन यामामोटो (शाकुहाची वादक) व मुसुमी मियाशिता (क्योटो वादक) या जपानी कलाकारांसाठीही त्यांनी खास वाद्यरचना रचल्या.

त्यांनी १९८१ साली न्यूयॉर्क फिल्हार्मोनिक ऑॅर्केस्ट्रासाठी ‘रागमाला’ हा राग-सिंफनी संगमाचा विशेष प्रकल्प केला, ज्यासाठी झुबिन मेहता यांनी संगीत नियोजन केले. मेक्सिको सिंफनी सोसायटीसाठी त्यांनी ‘मेक्सिको – कॉन्चेर्टो नं.१’ ही रचना केली, तसेच ‘मेलडी ॲ‍ंण्ड रिदम’ (१९५८), ‘नव-रस-रंग’ (१९६४), ‘फेस्टिव्हल ऑॅफ इंडिया’ (१९६८), ‘डार्क हॉर्स टूर’ (१९७४), ‘उदय उत्सव’ (१९८३), ‘इन्साइड क्रेमलिन’ (रशिया, १९८८), ‘घनश्याम’ नृत्यनाट्याचे संगीत व नृत्यरचना (१९८९), इ. विशेष संगीत प्रस्तुतीही केल्या.

‘थ्री रागाज’ (१९५६), ‘इंप्रोवायझेशन्स’ (१९६२), ‘पोर्ट्रेट ऑॅफ जीनियस’ (१९६४), ‘वेस्ट मीट्स ईस्ट’ ही मालिका (१९६६-६७), ‘म्युझिक फेस्टिव्हल फ्रॉॅम इंडिया’ (१९६९), ‘शंकर फॅमिली ॲ‍िण्ड फ्रेण्ड्स’ (१९७४), ‘होमेज टू महात्मा गांधी’ (१९८१), ‘रागमाला’ (१९८२), ‘तनमन’ (१९८७), ‘इन्साइड क्रेमलिन’ (१९८८), ‘पॅसेजेस’ (१९८९), ‘इन सेलिब्रेशन’ (१९९६), ‘चॅन्ट्स ऑॅफ इंडिया’ (१९९७), ‘रागताल’ (१९९९), ‘फ्लॉवर्स ऑॅफ इंडिया’ (२००७), ‘कोलॅबोरेशन्स’ (२०१०) या पं. रविशंकरांच्या काही गाजलेल्या ध्वनिमुद्रिका आहेत.

‘धरती के लाल’, ‘नीचा नगर’ (१९४५), ‘अनुराधा’ (१९६०), ‘गोदान’ (१९६१), ‘काबुलीवाला’ (१९६६, यासाठी बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्व्हर बेअर’ अवॉर्ड), ‘मीरा’ या हिंदी चित्रपटांना पं. रविशंकरांचे संगीत लाभले. ‘अनुराधा’ या चित्रपटातील ‘सांवरे सांवरे’ (भैरवी), ‘जाने कैसे सपनों में’ (तिलक श्याम), ‘हाय रे वो दिन’ (मिश्र जनसंमोहिनी) ही गीते विशेष लोकप्रिय ठरली. त्यांनी काही बंगाली चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांपैकी सर्वांत गाजलेले व महत्त्वपूर्ण संगीत सत्यजीत रे यांच्या ‘अपू ट्रायॅलॉजी’ म्हणून गाजलेल्या चित्रपटाचे होते.

‘चेअरी टेल’ (१९५५), स्वीडिश चित्रपट ‘दी फ्यूट ॲ‍गण्ड दी ॲ‍ रो’ (१९५७), ‘ॲ‍(लिस इन वंडरलॅण्ड’ (१९६३), ‘चपाक्वा’ (१९६५), ‘ॲ‍ वालांश’ (१९६५), ‘चार्ली’ (१९६८), ‘ट्रांसमायग्रेशन मॅकॅब्रे – विओला’ (१९६८), ‘गांधी’ (१९८२, ऑॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन), ‘जेनेसिस’ (१९८६), ‘दी टायगर ॲ‍ण्ड दी ब्राह्मिन’ (१९९१), इ. पाश्चात्त्य चित्रपटांच्या संगीतानेही त्यांना विश्वमान्यता दिली.

पाश्चात्त्य जगतात सर्वांत जास्त मैफली करणारे, ध्वनिमुद्रित केले गेलेले पं. रविशंकर हे ज्येष्ठतम भारतीय कलाकार आहेत. त्यांनी तबला वादकाला मैफलीत एकलवादनाची संधी वारंवार दिली व त्याद्वारे मानाचे स्थान प्राप्त करून दिले, हे त्यांना एक मोठेच श्रेय आहे. पाश्चात्त्य जगात आज ‘भारतीय संगीत म्हणजे सतार आणि तबला’ असे समीकरण निर्माण झाले याचे श्रेयही पं. रविशंकर आणि उ. अल्लारखा व झाकिर हुसेन यांना जाते. अली अकबर खाँ, अल्लारखा, झाकिर हुसेन, हरिप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा, सुलतान खाँ, लक्ष्मी शंकर, जितेंद्र अभिषेकी अशा अनेक भारतीय कलाकारांचा पाश्चात्त्य जगाला परिचय करून देण्याचे श्रेयही पं. रविशंकरांनाच जाते.

‘भारताचे सांस्कृतिक राजदूत’ म्हणून जगभरातील अनेक देशांनी पाचारण केलेले पं. रविशंकर हे जगभरातील सर्वाधिक पुरस्कार व सन्मान मिळवलेले भारतीय कलाकार असावेत! ‘डॉक्टर ऑॅफ फाइन आटर्स’ (कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून, १९६८), तीन वेळा ‘ग्रॅमी’ अवॉर्ड (१९६७, १९७० व १९७३ : हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय), ‘युनिसेफ’ सन्मान (१९८०), मेरीलॅण्ड व बाल्टीमोर राज्यांचे सन्माननीय नागरिकत्व (१९८४), फ्रान्स सरकारचा कलाविषयक सर्वोच्च नागरी सन्मान (१९८५), ‘फुकोओका एशियन कल्चरल प्राइझ’ (जपान १९९१), ‘रामोन मॅग्सॅसे’ पुरस्कार (फिलिपाइन्स, १९९२), ‘महात्मा गांधी’ सन्मान (लंडन, १९९२), हार्वर्ड व न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९३), ब्रिटीश कोलंबियातील व्हिक्टोरिआ विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९४), ‘प्रीमियम इंपीरिअल’ सन्मान (जपान आर्ट असोसिएशन, १९९७), ‘पोलर म्युझिक’ अवॉर्ड (नोबेल सन्मानाची प्रतिष्ठा असणारे, १९९८), ब्रिटीश सरकारकडून ‘नाइटहूड’ हा नागरी सन्मान (२००१) असे जगभरातील अनेक सन्मान त्यांना दिले गेले. अमेरिकेतील ह्यूस्टन नगरपालिकेने १९८३ साली ४ व ५ जून हे दोन दिवस ‘रविशंकर दिन’ म्हणून साजरे केले!

भारतातही त्यांना असे खैरागड विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ व रवींद्रभारती विद्यापीठ (१९७३), बनारस हिंदू विद्यापीठ (१९८०), दिल्ली विद्यापीठ (१९८४) अशा विद्यापीठांची सन्माननीय डॉक्टरेट, ‘देशिकोत्तम’ सन्मान (१९८१), खास ‘फिल्मफेअर’ पुरस्कार (१९७९), ‘कालिदास’ सन्मान (१९८७), ‘स्पिरिट ऑॅफ फ्रीडम’ पुरस्कार (१९९०), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार व ‘रत्न’ सदस्यत्व (१९६२ व १९७५), ‘पद्मभूषण’ (१९६७), ‘पद्मविभूषण’ (१९८१) आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ (१९९९) पं. रविशंकर यांना दिला गेला. राज्यसभेचे सभासद म्हणूनही त्यांची १९८६ ते १९९२ या काळासाठी नियुक्ती झाली होती. त्यांना २०११ साली संगीत नाटक अकादमीचा विशेष ‘टागोर’ सन्मान देण्यात आला.

रुबाबदार व्यक्तित्वाच्या व कलाकार म्हणून प्रसिद्धीचे वलय मिरवणार्यान रविशंकरांचे खाजगी आयुष्य विवादास्पद ठरले. अन्नपूर्णादेवींबरोबरचा त्यांचा विवाह असफल ठरल्यानंतर पुढे त्यांना कमला चक्रवर्ती, सुई जोन्स, सुकन्या राजन यांनी वैवाहिक जीवनात साथ दिली. शुभेंद्र शंकर हा त्यांचा पुत्र तरुणपणीच निधन पावला. अनुष्का शंकर, नोरा जोन्स या कन्या त्यांचा संगीताचा वारसा चालवत आहेत.

पं. रविशंकर यांनी ‘माय म्युझिक माय लाइफ’ (१९६८), ‘राग-अनुराग’ (१९७९) व ‘रागमाला’ (१९९६) ही तीन आत्मचरित्रात्मक पुस्तके लिहिली, तसेच ‘लर्निंग इण्डियन म्युझिक — ए सिस्टिमॅटिक ॲ‍‘प्रोच’ (१९७९) हे संगीत शिक्षणपर पुस्तकही लिहिले.

लॉस एंजेलिस व मुंबई येथे ‘किन्नर स्कूल ऑॅफ म्युझिक’, वाराणसी येथे ‘हेमांगिनी गुरुकुल’, सॅनडियागो येथील गुरुकुल व नवी दिल्लीचे ‘रविशंकर सेंटर’ येथे पं. रविशंकरांनी अनेक शिष्यांना संगीत शिकवले. उमाशंकर मिश्र, जया बोस, गोपालकृष्ण, विजय राघव राव, शमीम अहमद, कार्तिककुमार, शंकर घोष, भास्कर चंदावरकर, मंजू मेहता, विश्वमोहन भट्ट, इ. भारतीय कलाकार, तसेच येहुदी मेन्युइन, जॉर्ज हॅरिसन, फिलिप ग्लास, डेव्हिड मर्फी, इ. पाश्चात्त्य कलाकार हे त्यांचे महत्त्वपूर्ण शिष्य आहेत. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवी शंकरांचे पॉप जगतातील “मेन्टर” (पालक) मानले जातात. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथे ४ नोव्हे. २०१२ रोजी त्यांची शेवटची जाहीर मैफिल झाली.

रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून रवि शंकर यांना आदरांजली.

-चैतन्य कुंटे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..