तुझा व्याप खरच खुप मोठा आहे. तुझे उंच सिहासन, तुझा मोठा लोकसंग्रह, तुझे ऐश्वर्य सारं काही आश्चर्यचकित करणारं आहे. या सर्वांपलीकडे पाहता, तुझ्या सुंदर, उदार, भारावून टाकणार्या जबरदस्त आकर्षक अशा प्रभावी व्यक्तीमत्वाचे दर्शन होते. तुझी गुणग्राहक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, सर्वसमावेशक उदार प्रवृत्ती आध्यत्मिक तेज, …धार्मिक मन या सर्वांनी तुझे लोभस व्यक्तीमत्त्व एससंघ सुसूत्र होते. वरवरचा अतिशय साधा, तरल स्वभाव त्यामागे दडलेले काटेकोर, अचूक, सखोल तत्वज्ञ व्यक्तीचे विशाल मन, कुणाच्याही मनाला जादूचा स्पर्श करून जाते. तुला अत्यंत देखण्या तारुण्याचे वरदान असूनही तुझ्या वागण्या बोलण्यात एक जबाबदारपणा व पितृत्त्वाचा जिव्हाळा दिसून येतो. त्यामुळे संपर्कात येणारी व्यक्ती तुझ्यात कायमची गुंतून पडते. तुला ओझरते पाहणाराही कधी विसरू शकत नाही. रुबाबदार राजपुत्रासारखे तुझे वागणे, चालणे, चमकता, पूर्ण चंद्रासारखा चेहरा, मोठे, भावूक बोलके डोळे आणि अत्यंत सात्विक प्रेमळ वागणूक, या सगळ्या मोहपाशातून एखादी विरक्त-योग मार्गी व्यक्तीदेखील अलिप्त राहू शकणार नाही.
तुझ्या स्वभावात, तुझ्या व्यक्तीत्वात विरोधभास नाही असे मुळीच नाही; पण उन्हासोबत सावली असा रमणीय विरोधाभास कुणालाही आवडेल कधी तुझे बोलणे तलवारीसारखे धारदार, वार करणारे असते. तर कधी तुझ्या संतप्त नजरेत ज्वलंत निखारे दिसून येतात. अशावेळी ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या, अग्नीफुलांचा साज घेतलेल्या पळसासारखा दिसतोस तू।
दुसर्याच्या हळव्या दुसऱया मनावर कधी प्रेमाने तर कधी समजूतीच्या सुरात `उपचार’ करीत असतांना तुझे कधी पित्यासारखे शिस्तीचे तर कधी मोठ्या भावासारखे धाकाचे बोलणे मनाला कायमची हुरहूर लावून जाते. तुझ्या धाकातही प्रेमाचे आश्वासन असते. अशा हिरव्यागार बहारदार गुलमोहराची ही रम्य सावली सोडून कुणाला जावेसे वाटेल?
समोरच्या व्यक्तीमध्ये एकदम गुंतून गेल्यासारखे, समरस होणे तुला सहज जमते. मात्र एका
क्षणात निघून जाताना तू कधीही विचलीत होत
नाहीस. हृदयाची भाषा बोलून, दुसऱयाचे `विधीलिखीत’ लिहिण्याची कला तू कुठे शिकलास?
तुझ्या व्यक्तीमत्त्वाचे हे असंख्य पैलू उलगडण्यात माझे संपूर्ण आयुष्यही सरून जार्सल तरीही माझे मन अतृप्तच राहण्याची शक्यता आहे. तुझ्या नजरेतील उपेक्षा, तिरस्कार, अलिप्तपणा हे भाव मात्र असहनीय आहेत.
तू रागवशील, बोलशील, प्रसंगी एखादे प्रायश्चित्त सांगशील इतपत सारे ठीक आहे; पण उपेक्षा मात्र मरण याताना देतील.
तुझ्या अस्तित्वाने येते, रत्नमाणकाचे मूल्य.तुझ्या नसण्याने मनी, रित्या आकाशाचे शल्य.
तुझ्याशिवाय माझे सारे आयुष्य, माझा संघर्ष, माझे अस्तित्व, गुण-अवगुण सारे काही व्यर्थ आहे. माझ्या आयुष्यात शिशिर असला तरी तुझा उत्कर्ष पाहून मला तृप्त वाटते. माझ्या दीपपूजनात, गायत्रीमंत्रात, शिवपूजनात तुलाही …वाटा आहे. एकदा तुला ग्रहण लागले होते; पण तू त्यातून सहीसलामत, सुरक्षित निघालास आणि पुन्हा सर्वांग सुंदर बहरलास हे कळले तेव्हा मनात आलेल्या मिश्रभावना शब्दातीत आहेत. तुझे सारे दुःख, प्रारब्ध भोग मला मिळावे. व माझे आयुष्य तुला मिळावे. असेच मी प्रार्थनेत नेहमी मागीन.
पारिजात नावाच्या राजकन्येने, सूर्याच्या प्रेमविरहात देहत्याग केला होता. तेव्हा त्याचा `प्राजक्त’झाला. रात्रीच `उमलून’ हा वृक्ष पहाटेस सूर्याला पाहून अश्रूपात करतो. व `निषेध’ व्यक्त करीत सारी फुले गळून पडतात. माझेही तुझ्याशिवाय `संपून जाणे’ असेच रमणीय असावे. माझ्याही राखेतून असा बहारदार वृक्ष व्हावा व त्याच्या सुगंधाने तुला मंत्रमग्ध करावे.
मला मृत्यूपंथी नेई, स्वैर दिशाहीन वाटमाझ्या प्रेमाची पुण्याई, तुझे चिरंजीव पद।आता नको अग्नीसाक्षी, नको वेदमंत्र थोरतुझ्या दिव्य अस्तित्वात, माझे शाश्वत सौभाग्य।
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply