बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता…….!!! माळवदाची घडणावळ असलेल्या त्या वाड्यात जवळ जवळ बारा ते चौदा तरी खोल्या असतीलचं.एवढ्या मोठ्या वाड्यात राधाकाकीचा एकल कारभार व्हता.राधाकाकी रांडवबाई व्हती.राधाकाकीलं तिन पोर्हं व्हते.मोठा राघवं,मंधवा भैरवं त लहाण्याचं नावं कान्हु व्हतं.पैकी राघवचं लग्न झालेलं व्हतं,कान्हुचं लग्न व्हवुन सहा महिने व्हत नाहीत तं त्याची बायको मंजुळा फासी घेऊन मेली व्हती तं भैरव मुंजाच व्हता.राघवची बायको व्हती आहिल्या…..! नाका डोळ्यानं निट असलेली अहिल्या गारस्या डोळ्याची व्हती.अहिल्याचे गारसे डोळे पाहुन लय भेव वाटायचं.तस पाह्यलं तं अहिल्या आपल्याचं सुगलात असायची.बाहीरच्या जगासंग तिचा काहीच संबंध नवता.राघव अन आहिल्यालं दोन बुटके अन कृष पोरं तं एक सुंदर मुलगी होती.असं हे कुटुंब श्रावणाचा महिणा सोडला तं तसं लोकायपसुन दुरचं असायचं…..एकदम गुढरीत्या…सुमडीतच…!!!
श्रावण महिन्यात राधा काकिच्या घरी जुण्या काळापसुनच्या परंपरेनं चालत आल्यानुसार पोथ्या,पुरानं,हरीपाठ,बाया-बापड्यायचे भजनं आसे कार्यक्रम चालायचे.मलं त्या वाड्यात जायालं टर्रऽऽ भेव वाटायचं.गावात लोकं दबक्या आवाजातं मनायचे कि राधाकाकीलं जादु-टोना येते मनुनं….! एकदा मी मह्या मायसंग श्रावणात राधाकाकीच्या घरी गेलतो..खुज्या झालेल्या बुरजाल टशन देणार्या त्या वाड्याचा दरवाजाबी भलामोठा अक्राळविक्राळ व्हता.त्या दरूज्यावर फडी काढलेल्या नागाचं चित्र व्हतं.दरूज्याच्या आत गेल्या गेल्या माळवदाच्या कडीलं पाच दहा भावल्या एका लाल-काळ्या दोर्यानं बांधुन लटकवलेल्या व्हत्या.त्या भावल्या जणु काय आपल्याकडचं टक्कं लावून पाहातात आस वाटायचं. त्या वाड्यातल्या दहा बारा खोल्या नेहमी उघड्या आसतं,पण शेवटच्या तीन खोल्या मातर नेहमीचं बंद आसायच्या.त्या खोल्यायच्या कुलपालं लाल-काळा धागा बांधलेला असायचा आनं काळ्या कपड्यात शिवलेल्या आन ईचकटल्या केसायच्या भावल्या पण त्या कुलपावर बांधलेल्या आसायच्या.कुलपाआडं दरूज्यावर फडी काढलेल्या नागाची आकृती कोरलेली व्हती.राधाकाकीनं भुतायलं वश केलेलं असुन ती आपल्या घरचे आन शेतातले असे सगळे कामं त्या भुतायकुनं करून घेते आसं लोकं दबक्या आवाजातं मनायचे.गावातले लोकं श्रावण महिन्यापूरतं परंपरेनुसार त्या घरी जायचे परंतु श्रावण संपला की कोणीही त्या घराकडे साधं फिरकायचपण नाही.राधा काकी पण बाकी दहा आकरा महिने कठोर तपस्या करते असं सगळीकडं पसरलेलं व्हतं.राधा काकी सहसा कोणालं दिसायची नाही.कठोर तपस्या करून ती दिवसेंदिवस तंत्रविद्येने आपली अघोरी ताकद वाढवायची म्हणं….! राधा काकीच्या वाड्यातुन दर आवसं पुणवलं किंकाळ्या तं कव्हा कव्हा चित्रविचित्र भयानक आवाज ऐकू यायचे.
एकदा असचं आवसची रातं व्हती.राधाकाकीच्या वाड्यातं हालचालं वाढली व्हती.बाहेरगावावुन दोन काळे कपडे घातलेले जटाधारी मसनजोगी पण आपल्या ढणऽऽ ढणंऽऽ वाजणार्या भल्या अवजड लोखंडी घंटा घेऊन दिस माळवताचं राधाकाकीच्या वाड्यावरं आलते.का पण माहीत नाही.त्यादिशी सगळ्या गावावरं भितीची एक वेगळीचं कळा पसरली व्हती.त्यादिशी गावबी लवकरच सामसुम झालतं.ईकडं राधाकाकीच्या वाड्यावरं वेगवेगळ्या मंत्र तंत्राच्या आवाजाबरोबरच हासन्या खिदळण्याचेबी आवाज ऐकू येतं व्हते.आजुबाजुच्या घरातले लोकं काळरातच्या भयानं गुपचुप झोपले आस्तांनी बरोबर मध्यरात्री वाड्याच्या चौकात एका अक्राळविक्राळ व कुरूप मुर्तीच्या पुढ्यात आग पेटवुन हवन चाललं व्हतं.ती मुर्ती नुसती अक्राळविक्राळच नवती तं प्रचंड दिन,उदास, भेसुर,मुजोर,माजेल,मग्रुर,मदांध आशा नानाविध छटा चेहऱ्यावर आसलेली व्हती.काळ्या कपड्यातले ते मसनजोगी आपल्या भसाड्या आवाजात पिशाच योनीलं जागवायचा प्रयत्न करत व्हते.त्या मुर्तीच्या पायावर एक बोकुडाचं मुंडक वाह्यलं व्हतं.त्या मुंडक्यातं आंजुकबी जीव व्हता.ते मुंडकं बेऐऽऽ आसं वरडतं व्हतं.राधाकाकीणं अंगावरचे सगळे कपडे काढून भोंगळं व्हवुन सगळ्या आंगालं चिताभस्म लावला व्हता. राधाकाकीनं तिच्या चेहर्यावर लाल,काळया व ढवळ्या रंगानं नक्षी काढली व्हती.तिच्या पांढरट-तांबडट बटा त्या हवणात पेटलेल्या ईखारापुढं लालचटक दिसत व्हत्या.साठ पासटिच्या वयातबी राधाकाकी त्या हवनाच्या भवताल एखांद्या सोळा वरसाच्या पोरीलं लाजवलं आसं त्वेषानं नाचतं व्हती.
अचानक गलका उठला.आरध्या रातचं आख्खी गल्ली राधाकाकीच्या दरूज्यावर जमली व्हती. त्यालं कारणबी तसंच व्हतं.राधा काकीचं मंधवं पोरगं भैरव जोरजोरात गगणभेदी किंकाळ्या फोडत व्हतं. त्याच्या त्या किंकाळ्या ऐकून अख्ख गाव थरारलं व्हतं.तरी पण एकानी-दुकानी करत एकमेकालं आधार देत लोकं राधा काकीच्या घराजवळ जमले.तिथं त्यांनी पाह्यलं तं राधा काकीचं पोरगं भैरव जोर जोरात वाचवा वाचवा मनुन दरवाज्यावर लाथा मारत व्हतं.कसं तरी दरूज्यालं उघडुनं ते बाहेर आलं आणि जोत्यावर बसून मोठमोठ्यानं धापा टाकु लागलं.एवढं व्हवुनबी राधाकाकी घराबाहीर आली नवती.ती निर्विकार चेहर्यानं शुन्यात पाहात घराच्या चौकात बसली व्हती.गल्लीतले लोकं भैरवभवती गोळा झालते.गर्दीतून एक जणांनं त्यालं तांब्याभर पाणी देलं.तांब्यातलं पाणी त्यानं घटाघट एका दमात पिऊन टाकलं.लोक त्यालं ईचारू लागले की,“काय रे बाबा भैरवा,काय झालं आसं ? तु कशामुळे वरडू लागला?” तसं भैरवनं सांगायलं सुरुवात केली की,“आमच्या घरात अचानक लय मोठ्या डुकरायचा कळप घुसलायं.ते डुकरं मह्या अंगावर येऊ लागले,मणून मंग मी पळत पळत जिव वाचवत बाहेर आलो.”असं म्हणत त्यानं त्याचे हात पाय दाखवले आन म्हणु लागला की,“हे पाहा ईथं डुकरं चावलेतं,ईथं डुकरायनं बोचकारलयं”. त्याच्या हाता पायावर तसली कायबी निशाणी नवती.लोकं समजुन चुकले की तो क्रॅक झालामुन.तरीबी त्यालं भ्रम झाला आसल असं म्हणून लोकांनी त्याची समजूत काढली आणि आपापल्या घरी गेले.दुसऱ्या दिवशी पहाटं गावातल्या तळ्यावर लोकांची भली मोठी गर्दी जमली व्हती. पोलीसासंग पव्हणारे पाच सहा गोताखोरबी तळ्याच्या भवती गोळा झालते.गावातले लोक गर्दी करू लागले मनुनं मंग पोलीसायन दोन चार काठ्या मारून त्याना तळ्यापसून दूर केलं व्हतं.रातच्या त्या प्रकारानंतर भैरव वापस घरात गेला नवता तसचं तेव कोणालं दिसलाबी नवता.त्याचे कपडे तळ्याकाठच्या लिंबाच्या झाडाखाली आढळले व्हते म्हणून पोलिस तळ्यात धुंडत व्हते.अखेर पोहणाऱ्या लोकांच्या हाताला एक डेड बॉडी लागली.डेड बॉडीच्या अंगावर चिंधीभरबी कपडा नव्हता.त्याचे बुब्बुळं बाहीर आलते.खेकड्यांनी त्याचे कानं,व्हटं तोडले व्हते.अंगावर ठीक ठिकाणी दातांनी चावलेल्या चाव्यांचा आणि नखांनी वरबडल्याच्या खुणा दिसत व्हत्या.लोक दबक्या आवाजात म्हणत होते की राधा काकीनच भुताच्या हाताने त्यालं मारलं म्हणून…! कावुन की तो राधा काकीच्या तपस्येत बाधा आणायचा प्रयत्न करत होता मनं…..असो तं राधा काकीचा मंधवा मुलगा भैरव मुंजा मरण पावला व्हता.मुंज्यालं जाळत नसतं तं त्याचं दफन करायचे.मुंज्या भैरवलं तळ्याच्या बाजूलच पूरलं व्हतं.पुढ चालुन त्याच्यावर एक भल मोठ्ठं कडूलिंबाचे झाड उगवलं होतं.
कालांतराने भैरवला लोकं विसरूनही गेले. पण त्या घटनेनंतर राधा काकीच्या वाड्याला जणू उतरती कळाच लागली होती. राधा काकीचा लहान मुलगा कान्हु त्यालबी आधुन मधून येडाचे झटके येयाचे.दररोज पहाट उठुन शेतावर जाऊन कान्हु करडुचे गोंडे गोळा करून आनायचा.रस्त्यानं चालतानी कान्हु आपल्या बाजुलच कोणालंतरी बोलायचा.त्याच्यासंग कोण आसायच हे कोणालच दिसायच नाही.कोणी त्यालं गोंडे कशालं आनले,किंवा कोणालं बोलतुस आसं ईचारलं तं त्यो चवताळुन समोरच्यावर वड्डायचा आन,“तुम्हाल काय कळतयं …हे आमृत हे….मही बायको मंजुळा सांगते…..ह्यो स्वर्गाचा रस्ता हे..देवायलं लय आवडतात करडुचे गोंडे…….म्या देवासाठी करडु गोळा करतोय……हिंग काय हि मही बायको मंजुळा आलीय मलं नेयालं….जराक्शे आंजुक गोंडे गोळा झाले की मी ईच्यासंग जाणार हे देवाकडं……!” कान्हुचबी लगन झालेलं व्हतं.पण सहा मह्यण्यातच त्याची बायको मंजुळा घराच्या मुख्य दरूज्यालं फाशी घेतलेल्या आवस्थेत आढळली व्हती.पहाटं पहाटं गुरव बेल वाह्यालं आला आन त्यानं ते तोंडावर मोकळे केस सोडलेलं,तोंडातुन जीभ बाहिर आलेलं मंजुळेच रूपडं पाह्यलं आन आक्रीतऽऽऽ आक्रीतऽऽऽ आसा वड्डतच गावातुन पळाला.त्या घटनेनंतर त्यो गुरव विमनस्क आवस्थेत रानावनात फिरायचा मनं.त्यादिशी तिथ़ समद गाव गोळा झालतं.लोकं मंजुळाच्या मृतदेहाचे डोळे बंद करत व्हते पण ते काय बंद व्हत नवते.कोणाकडतरी रागाणं सुडभावनेनं पाह्यल्यासारके एकटक पाहातं व्हते…असो तं आसचं एका आवसलं कान्हु गेल्याची खबर आली.त्याच्या खोलीत करडूचे गोंडेच गोंडे भरलेले व्हते.गावातील लोकायत कुजबुज सुरु झाली व्हती कि,“ राधाकाकीनचं दोन पोर्हायचा अन सुनचा बळी दिलाय”, तं कुणी म्हणू लागले की एक ताकदवान भुतं काकीच्या तावडीतून सुटून त्यानं काकीचे पोर्ह वं सुनलं मारलं आसल…!” गावातले लोकं हळहळले पण राधाकाकिलं त्याचं कायबी वाटलं नाही.ती निर्विकारपणे आपली अघोरी ताकद वाढवत राहिली.
तसं पाहिलं तं राधा काकीच्या घरचे सगळेच रहस्यमय रित्या अन तेही आवसलचं मरण पावले…..राघव हा सर्वात मोठा मुलगा एकादिशी कुऱ्हाड घेऊन गावातल्या लोकांच्या माघं मारायला धावून जात व्हता…. नंतर त्यालं गावातल्या लोकायनं पकडुन झाडालं बांधुन टाकलं व्हतं….पुढं काहि दिसांनी राघवनं गांव सोडलं…लेकराबाळायसंग त्यो दुसऱ्या गावात राहायलं गेला.त्यानं राधाकाकीलापण सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण राधाकाकी आपलं साम्राज्य व अघोरी विद्या सोडुन राघवसोबत जायलं तयार झाली नाही.राघवनं गाव बदललं व्हतं.ईथं तरी शांतीनं राहता येईल असा त्याचा अंदाज व्हता पण राधाकाकिणं गुलाम बनवलेल्या भुतायनं दुसऱ्या गावातही त्यांचा पिछा सोडला नव्हता……राघव येडा होऊन एक दिवस त्यानं विहरीत उडी मारून जीव देला…त्याची बायको आहिल्याबी येडीच होऊन हायवेवर ट्रकखाली येऊनं मरनं पावली….राघवचे दोन्ही पोरबी येडे झालते.तेह्यनंबी एख एक आमावश्या पाहुन जिव देले……. फक्त त्या घरची मुलगी तेवढी वाचली बाकी सर्व मेले….ईकडं गावाकडं राधाकाकीचीबी मौत झालती.कव्हा झाली कोणालच कळलं नाही.घरातुन लय वास येऊ लागला मनुन गाव पुढार्यायनं दरवाजा तोडुन घरातं पाह्यलं तं घरातल्या चौकात राधाकाकीचा मृतदेह पडलेला व्हता.त्यालं किडे मुंग्यायन जवळ जवळ फस्तचं केलतं.निसते हाडकं तेव्हडे शिल्लकं राह्यले व्हते.
आता राधा काकीचा वाडा भुतबंगला मनुन वळखल्या जात व्हता…कोणी वारस तिथं राहात नसल्यानं वाडा भनंग झालता.राधा काकीच्या नातीनं वाडा विकण्यासाठी गावात येउन प्रयत्न केला….तिनं दोघा तिघांसोबत सौदे पण केले….पण ज्यानं ज्यानं त्यो वाडा ईकत घ्यायचा प्रयत्न केला तो तो व्यक्ती वाड्याचा सौदा झाल्यानंतर आठ पंधरा दिवसाच्या आत मरण पावला.त्यानंतर मात्र गावात कुणीही तो वाडा ईकत घेण्याची हिंमत केली नाही. आजही पडक्या भनंगावस्थेत तो वाडा गिर्हाईक शोधतोय !!!
© गोडाती बबनराव काळे
हाताळा,हिंगोली
9405807079
Leave a Reply