काळजांचे गुंफीत धागे, प्रीत आपुली जडे,
कृष्णावर राधा भाळे,
गोकुळास किती वावडे,–!!!
सोडून मी आले ,
सारे घरदार अन् बाळे,
सोडला संसार सारा,
प्रेम केले रांगडे,–!!!
कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत,
तन मन माझे अनावृत्त,
अनयाला ही जणू सोडले,
हरीशी जेव्हा झाले अद्वैत,–!!!
मन, काळीज, अंतर, हृदय,
सारे काही त्यास दिले,
आता, नाही काही उरले,
आत्म्याने आत्म्यास वरले,–!!
*तन का म्हणू ,ही तर वस्त्रे,
शृंगारात भिडती शरीरे,
प्रणय-लीलांचे खेळ सारे ,
भासती जगास सारे*,–!!!
परमात्माच हृदयात नांदे,
मुरलीधराचे गारुड हे,
परमात्म्याची पत्नी असे,
जी माझ्या आत्मी वसे,–!!;
लग्न माझे आहे लागले,
संसारात नाही अडकणे, अलौकिकाचे हे खेळ सारे,–
संसार मोहपाशांचे खेळणे ,–!!
एकात्मतेची ओढ वेगळी,
कृष्ण राधेची दुनिया आगळी,
प्रणय – शृंगारातही नसते,
कधी कुठे बळ वासनेचे,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply