राधे, आठवाचे आसु
कागं डोळ्याशी झरती
त्या दुष्ट कान्ह्यासाठी
साऱ्या गोपिका झुरती
त्याची निराळी विरक्ती
सारी आगळीच तऱ्हा
तुझी सय का न येई
का तो गोपिकांचा सारा?
का गं राधे तो माधव
क्रूर स्मितातून हासे
तुझ्या डोळ्यात आसवं
त्याच्या विरहाचे ठसे
सांग त्याला का न येई
कधी कधी तुझी सय
का न तुझिया डोळ्यांचा
कधी तो न घेई ठाव
कधी सांग तो रडला
तु ना दिसली म्हणून
का कधी न हसला
कळी खुलली म्हणून
राधे सांग आता तरी
कसे एकरूप दोघे
एका एकाचे बोलणे
का ग सांगणे न लगे
डोळे मिटता का होई
सांग त्याचेच दर्शन
एक इथे एक तिथे
कसे दोघांचे मिलन
— विशाखा विकास कुलकर्णी