डिस्क्लेमर- मी आधीच सांगतो की किशोरदांचा जबरदस्त फॅन आहे.
पण…
रफी आपलं दैवत आहे.
कळायलं लागलं तेंव्हापासून या आवाजाने जादू केली आहे. आमच्या लहानपणी एफ एम नव्हते. पण आमची सांगली आकाशवाणी होती..आजही आहे. त्यावर सकाळी भजन सदृश्य गाणी लागायची. त्यात बऱ्याचवेळा ‘शोधीशी मानवा’ किंवा ‘प्रभु तू दयाळू’ नेहमी लागायचे. त्यांच्या त्या भारदस्त आवाजात त्या कोवळ्या मनातही ती मनावर कोरली जायची. एक दोन गाणी शुक्रवारी किंवा रविवारी वाजायची ती येशू ख्रिस्तांवर असायचं. गाणं नेमकं आठवत नाही पण रफी साब ते इतकं मनापासून गायचे की ते़ंव्हाच जाणवलं.. नावाने मोहम्मद असला तरी हा माणूस जाती धर्माच्या खूप खूप पलिकडे आहे.. बस्स तेंव्हापासून रफीसाब आपले झाले.
Cut to..2009-10
मी व आमची पूर्ण टीम तेंव्हा आमच्या बँकेच्या कँप शाखेतून ऑपरेट करायचो. इस्ट स्ट्रीटला रफीसाहेबांच्या जन्मादिनी आमच्या ब्रँच समोर जो चौक आहे तिथेच एक मंडप लागतो.
समोर चाळीस पन्नास खुर्च्या ठेवल्या जातात. पुण्यातले बरेच ऑर्केस्ट्रा मधे गाणारे किंवा गाण्याची जाण असणारे गायक लोक तिथे येतात. रफींची अनेक अजरामर गाणी तिथे सादर करतात. ती गाणी ऐकतानाचा त्या गायकांचा भाव हा मला एखाद्या मंदिरात किंवा गुरूव्दारात सेवा दिल्यासारखा पवित्र वाटायचा. रफी-प्रेमाने भारलेले हे लोक आपल्या दैवताच्या प्रेमासाठी स्वेच्छेने, वेळ काढून व कोणतीही बिदागी न घेता तिथे दरवर्षी येउन आपली गानसेवा देतात. मी कँपात बसायचो तोपर्यंत जसा वेळ मिळेल तसा तिथे जाउन थांबायचो. आपल्या या दैवताची गाणी ऐकून तृप्त व्हायचो. दोन दोन तास उभे राहूनही पाय दुखायचे नाहीत..अगदी खरं सांगतो.
आमच्या याच ब्रँचपासून थोडे पुढे जाउन जरा उजवीकडे वळून एम.जी रोडवर एक चौक पुढे गेला की चौकात एक पाटी दिसते ‘मुहम्मद रफी चौक’. पुण्यात कधी न राहिलेल्या रफीसाहेबांचे पुण्यातल्या एका चौकाला नाव देणारे पुणेकर खरे रसिकच म्हंटले पाहिजेत. कधीही त्या चौकातून कारमधून वा स्कुटर वरुन जाताना त्या पाटीकडे हमखास लक्ष जायचे माझे.
आता पुणे सोडून चार वर्षे होत आली.
पण अजूनही एक इच्छा आहे.
24 डिसेंबरला एकदा मुद्दाम पुण्यात जाउन पुन्हा एकदा सकाळी आमच्या ब्रँचसमोरच्या त्या चौकात उभे राहुन ते सांगितीक ‘लंगर’ अनुभवायचे आहे..
तो ‘रफी’ नामक दैवी प्रसाद घ्यायचा आहे.
बस्स…
— सुनील गोबुरे.
Leave a Reply