नवीन लेखन...

रॅगदॉल

“काका आपल्या खाद्य विशेषांकाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. अजूनही तुम्ही त्या मॅडम बुदिमाला रॅगदे यांची मुलाखत घेतली नाही? कधी घेणार आहात?’ सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख मुलाखत विशारद काका सरधोपट यांना विचारीत होते.”

“साहेब, त्या अमेरिकेला गेल्या आहेत. उद्या येतील. मी उद्याचीच वेळ घेतली आहे. उद्या मुलाखत घेतो आणि परवा आपल्या हातात ठेवतो.”

ठरवल्याप्रमाणे काका मॅडम बुदिमाला रॅगदे यांच्या घरी गेले. त्या मुंबईच्या प्रख्यात लोखंडवाला कॉम्प्लेक्स या अतिउच्चभ्रू वसाहतीत एका पॉश इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर, पेंट हाऊसमध्ये राहत होत्या. प्रथम कॉम्प्लेक्सच्या चौकीतून रखवालदाराने मॅडमशी संपर्क साधून खात्री केली आणि मगच काकांना आत सोडले. स्वत: बुदिमालाबाईंनीच त्यांचे स्वागत केले. त्यांचा एकंदर अवतार गंगूबाई नॉनमॅट्रिक छाप गोलमटोल, गुबगुबीत होता पण वेष मात्र अगदी अप टू डेट होता.

“या, या काका सरधोपट, बसा. काय घेणार? थंड का गरम? हे घ्या मेनूकार्ड, यात शंभर खास पेयांची यादी आहे. त्यातले तुम्हाला काय हवे ते सांगा.” त्या अत्यंत अगत्यशील वाटल्या.

“शंभर पेयं? मॅडम आम्हाला तर चहा, कॉफी, सरबत किंवा फार फार तर कोल्ड ड्रिंक म्हणजे. कोकाकोला, पेप्सी, ऑरेंज वगैरे माहीत. हे शंभर प्रकार? ठीक आहे जे असेल ते चालेल.”

“काका, ही माझ्याकडे ताबडतोब उपलब्ध होणारी पेयं आहेत. तशी तर अशी हजार पेयं मी बनवते.”

“हजार? काय सांगता काय?”

“काका, अहो त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. माझी दहा हजार पाक क्रियांची दोन पुस्तके, ‘कशाचे काहीही’ आणि ‘वड्याचे तेल वांग्याला’ ही फार प्रसिद्ध  आहेत. त्यांच्या आजपर्यंत निरनिराळ्या भाषांतून शंभर तरी आवृत्या निघाल्या आहेत. आता लवकरच माझे दहा हजार पेयांचे ‘प्या आणि पाजा’ हे पुस्तक येत आहे.”

“बापरे! दहा हजार पेये? मॅडम आपण खाद्य पदार्थांच्या दुनियेतल्या किमयागार आहात असे म्हणतात ते काही खोटे नाही. या आपल्या यशाची यशोगाथा आमच्या ‘रोजची पहाट’ च्या वाचकांना वाचायला मिळावी म्हणूनच मी आलो आहे.” तेवढ्यात वेटर येऊन एक भला मोठा पेला काकांच्या समोर ठेऊन आदबीने सलाम करून एक गेला.

“हे काय आहे मॅडम?”

“काका, ही माझी लेटेस्ट रेसीपी आहे. ब्रिजल रॅगदा कसाटा शेक. घेऊन पहा, थंड चालेल ना?”

“हो चालेल पण हे काय आहे सांगाल का?”

“काका, आधी टेस्ट करा. आपल्या मुलाखतीच्या शेवटी मी याची रेसीपी सांगेन.’ मॅडमनी समोर ठेवलेल्या पंजाबी लस्सीच्या भल्या मोठ्या पेल्यासारख्या पेल्यातले ते पेय काकांनी घोटभर घेतले.

“व्वा! अप्रतिम! फारच छान! मॅडम आता सुरू करू का मुलाखात?”

“हो, करा की!”

“मॅडम, आपण कालच अमेरिकेच्या दौऱ्यावरून आलात. हा दौरा कौटुंबिक सहल का एखादी व्यापारी सहल, परिषद वगैरे होती?”

“काका, आमचे रॅगदॉल हे नाव तुम्ही ऐकले असेलच.”

“हो, ऐकलंय ना. मुंबईत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशातल्या मोठामोठ्या शहरात हे नाव सध्या झुणकाभाकर केंद्रासारखे गाजत आहे.”

“काका, त्याच रॅगदॉलच्या शाखा अमेरिकेत काढता येतात का याची पाहणी करण्यासाठी मी गेले होते.’

“काय सांगता? अमेरिकेत आणि रॅगदॉल?”

“होय काका. अमेरिकेत रॅगदॉल. काका, आणि रॅगदॉल आणि झुणकाभाकर याची तुलना करू नका. झुणकाभाकर, पोळीभाजी, वडापाव, पावभाजी हे प्रकार गोरगरिबांसाठी म्हणून निघाले पण ते त्या पलीकडे कधी गेले नाहीत. आपल्या लोकांकडे व्यापारी वृत्ती नाही. आता मॅकडोनॉल्डचेच पहा ना, मुळात गरीब अमेरिकन कामगारांसाठी पोटभरीचे खाणे म्हणून कोणी गोऱ्या अमेरिकनाने ते सुरू केले, आपल्या वडापावसारखे. पण आधुनिक जगात व्यापारीकरणाचे महत्व ओळखून त्याने हे अमेरिकन झुणका भाकर केंद्र अख्ख्या जगात मॅकडोनाल्ड या नावानं प्रसिद्ध केलं. आपण मात्र झुणकाभाकर एके झुणकाभाकर करत बसलो आणि शेवटी तर आपल्या सरकारनेच ते बंद केलं. काय खां की नाही?”

“होय मॅडम. एकूणच मराठी माणसाला व्यापाराची जाण नाही हे खरं. आपणही मराठी दिसत नाही. त्यामुळेच आपण ही किमया साधू शकलात नाही?”

“काका, मी मराठीच आहे. मी मराठी नाही असे तुम्हाला कुणी सांगितले?”

“मॅडम आपले हे नाव? रॅगदे? हे मराठी वाटत नाही. एखादे स्वीडिश, स्पॅनीश, इटालियन, पोतुर्गीज, रशियन वगैरे वाटते. मराठी माणसाचे रॅगदे असे नाव मी कधी ऐकले नाही.” मॅडम खूप हसल्या, म्हणाल्या, “काका, रॅगदे हे माझे खरे नांव नाही, ते ट्रेड नेम आहे. खरे नाव आहे रगडे. मी मूळची खानदेशी. फार न शिकलेली. इथं मुंबईत आले तेव्हा एक अडाणी, खेडवळ बाई होते. पदरी एक लहान पोर होतं.”

“काय सांगता?”

“होय काका. मी इथे आले तेव्हा माझा मुलगा रमाकांत जेमतेम चारपाच वर्षाचा होता; आता चाळीशीत जाईल. रॅमो रॅगदे म्हणून तोच अमेरिकेतला व्यवसाय सांभाळणार आहे.”

“रॅमो रॅगदे?”

“जसे रगडे चे रॅगदे केलं तसंच रमाकांतच रॅमो अमेरिकन पद्धतीप्रमाणे. शिवाय त्यामुळे व्यापारी जगात अडचण येत नाही. मराठी माणसाला व्यापार जमत नाही असे त्यांना वाटते. अमराठी नावामुळे काही अडचण येत नाही. शिवाय ही नावे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली चालतात. नुकतेच मी गोव्यात रॅगदॉलचे स्टॉल्स टाकले. त्याचे उद्घाटन रॅमो फर्नाडिसने केले. गोव्यात आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला.”

“वा वा मॅडम आपण अशिक्षित म्हणवता पण मोठमोठ्या शिकलेल्यांना लाजवील अशा पराक्रमी आहात. बरं पण इतक्या थोड्या अवधीत आपण हे साम्राज्य कसं उभं केलंत?”

“काका, ह्याच्यामागे फक्त कष्ट, कष्ट आणि कष्टच. सुरुवातीला मी पोळीवाली, स्वयंपाकीण काकू अशी कामं केली. मग एका ठेकेदाराकडे बुंदी पाडायचे काम करू लागले. त्यावरून मला बंदीमावशी म्हणून ओळखायला लागले. याच बुंदी मावशीचे मी पुढे बुंदिमाला केले.’

“मग यातून हा व्यवसाय कसा भरभराटीला आला? आपण कोणापासून प्रेरणा घेतली?”

“काका, प्रेरणाबिरणा असे काही नाही. कष्ट करायला मात्र मी कधी मागेपुढे पाहिले नाही. मनात सतत हाच ध्यास की आपण याच धंद्यात मोठं व्हायचं. म्हणतात ना हिंमत है मर्दा तो मद् दे खुदा!”

“आपल्याला अशी मदत मिळाली का?”

“काका त्याला मदत म्हणा, नशीब म्हणा पण अशी एक संधी आली. तुम्हाला ती महाभारतातली गोष्ट माहीत आहे का अश्वत्थाम्याची?”

“हो म्हणजे त्याला लहानपणी त्याच्या आईने दूध म्हणून सातूच्या पिठात पाणी कालवून दिले ती?””

“अगदी बरोबर. आमचा रॅमो म्हणजे रमाकांत एकदा आईक्रीम खायचा हट्ट धरून बसला. आता मला त्या दिवसात आईस्क्रीम कुठले परवडायला? पण नेमकी त्याच दिवशी मी ज्यांच्याकडे काम करत होते त्या मालकीणबाईंकडे पार्टी होती. शेवटी आईस्क्रीमचा बेत होता. विपुल बॅन्डच्या कसाटा आईस्क्रीमची ऑर्डर होती. पार्टी संपल्यावर बाईंनी माझ्या मुलासाठी वाटीभर आईस्क्रीम दिलं. वाटी फारच छोटी होती. एवढसं आईस्क्रीम कसं पुरावं? मला प्रश्न पडला. घरी खानदेशातून माझ्या मावशीनं पाठवलेली भरताची वांगी पडली होती. मी एक वांगं भाजलं. त्याचा गर काढला. बिया काढून टाकल्या. त्यात आईस्क्रिम घातल. चार चमचे साखर घातली. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं. थोडी साय घातली आणि चांगले घोटले. एक छोटा डबा भरला. तो नेऊन शेजारच्या काळेबाईंच्या फ्रीजमध्ये नेऊन ठेवला. रॅमो घरी आला तेव्हा घेऊन आले. चांगला थंडगार आणि घट्ट गोळा झाला होता. रॅमोला खूप आवडले आईस्क्रीम.”

“मग मी बाजारातून विपुल आईस्क्रीमच्या कसाटा आईस्क्रीमचा एक पॅक घेऊन आले. चार वांगी उरली होती, ती भाजून त्यांच्या साली काढल्या. आतल्या पांढऱ्या गराचा, जेवढ्या काढता येतील तेवढ्या बिया काढून, मऊ लगदा केला. त्यात अर्धा किलो पिठी साखर, पाव किलो तांदळाचे पीठ, चार अंजीर (सुके) कुस्करून घातले. शेजारच्या काळेबाईंचा मिक्सर आणला आणि हे सगळे साहित्य चांगले घुसळून काढले. घुसळताना त्यात आटवलेले वाटीभर दूध घातले. दोन चपटे डबे भरले. ते काळेबाईंच्या फ्रीजमध्ये ठेवून आले. दुसऱ्या दिवशी घेऊन आले. एक डबा त्यांना दिला सँपल म्हणून. घरच्यांना फार आवडले. म्हणाल्या, “बुंदी मावशी, फारच छान होत बरंका आईस्क्रीम. किती पैसे देऊ?”

मी म्हणाले, “राहू द्या हो पैशाचे. परत लागले तर सांगा, वीस रूपये घेईन.” “काय फक्त वीस रुपये? अहो एवढे आईस्क्रीम बाजारात शंभर रुपयांपेक्षा कमी नाही मिळायचे.”

“त्यानंतर तोंडातोंडी म्हणजे माऊथ पब्लिसिटीने माझ्याकडे आईस्क्रीमच्या खूप ऑर्डर्स यायला लागल्या. मागणी वाढली तशी मी गावाबाहेर जागा घेतली भाड्याने. चार बायकांना नोकरीवर ठेवले आणि माझा व्यवसाय सुरू केला. पण नुसती आईस्क्रीम एके आईस्क्रीम करत बसले नाही. जसा वांग्याचा उपयोग करून आईस्क्रीम ही कल्पना मी राबवली तसेच इतरही पदार्थ करताना ह्याच्यात ते त्याच्यात हे असे मिक्सिंगचे प्रयोग करत राहिले आणि मग त्यातूनच ‘कशाचे काहीही’ आणि ‘वड्याचे तेल वांग्याला’ ह्या माझ्या दहा हजार पाकक्रियांच्या पुस्तकांचा जन्म झाला. एवढेच करून मी गप्प बसले नाही तर या पाकक्रियांसाठी लागणारा कच्चा माल तयार करून तो विकण्याची सोय केली आणि त्यातूनच पुढे ही रॅगदॉल च्या फूडसेंटरची साखळी निर्माण झाली.”

“हे रॅगदॉल नावही काही वेगळेच आणि रुबाबदार वाटते. हे नाव आपल्याला कसे सुचले?”

“काका तुम्हाला सांगितलेच आहे की माझे नाव रगडेचे रॅगदे कसे झाले ते. तसेच माझ्या दहा हजार पाकक्रियांमध्ये घट्टपणा येण्यासाठी जो लगदा वापरला जातो त्यावरून मला हे नाव सुचले.”

“लगदा? म्हणजे?”

“काका लगदा हा आपला गावठी शब्द. शिष्टसंमत शब्द म्हणजे ग्रेव्ही किंवा पल्प अथवा गर. आता असं पहा, निरनिराळे पदार्थ बनवताना त्यात घट्टपणा येण्यासाठी पांढरी किंवा तांबडी ग्रेव्ही वापरतात. पदार्थांची नावं वेगळी पण रस्सा एकच, तांबडा किंवा पांढरा. मी हा मुख्य घटक त्याला लगदा म्हणते. पण लगदा लोकांना आवडणार नाही म्हणून त्याला केले लॅगदो! आमच्या सर्व पदार्थांमध्ये कोणता ना कोणता लॅगदो वापरते. लोकांना वाटते हे काही तरी इटालियन, चायनीज आहे.”

“वा! फारच छान! पण त्यावरून रॅगदॉल कसे बनवलेत?”

“काका त्यात तीन शब्द एकत्र केले आहेत. ते असे-रेंगदो+लगदा+ऑल=रॅगदॉल.

माझ्या पदार्थात, सगळ्या पदार्थांत म्हणजे ऑल रेसीपीज मध्ये लॅगदो लागतोच. त्यामुळे ऑल शब्द मिसळून केला रॅगदॉल! थोडक्यात सोप्या भाषेत मिसळ!”

“वा! वा! मॅडम हे फारच गंमतीशीर वाटते.’

“काका नुसते गंमतीशीर नाही तर फार फायदेशीरही आहे. त्यात माझ्या सगळ्या पाकक्रियांचे सारच आले आहे.”

“ते कसे?”

“काका, अहो दहा हजार पाकक्रिया शोधायच्या म्हणजे काय खायचे काम आहे का? म्हणजे तसे ते खायचेच आहे पण माझ्या म्हणण्याचा अर्थ ते सोपे काम नाही. पण माझ्या या पाकक्रियांतून मी गृहिणींना एक नवी दृष्टी आणि आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.”

“तो कसा?”

“काका, आता हेच पहा. कुठलाही पदार्थ घ्या. त्यात मूळ दोन गोष्टी असतात. एक म्हणजे तो गोड तरी असतो किंवा तिखट. त्यातही दोन प्रकार येतात. एक पोटभरीचा अधेमध्ये खायचा. आता असे पहा, पदार्थात काही मूलभूत गोष्टी समान असतात. त्या म्हणजे गहू, तांदूळ, डाळी, तेल, तूप, फोडण्या, भाज्या, फळे इत्यादी. या सर्व गोष्टी घरोघरी बहुतेक असतातच. या बेसिक म्हणजे मूलभूत गोष्टीतूनच मी त्याच्यात ते, त्याच्यात हे, मग दोन्हीतही एखादे तिसरे अशी विविध काँबिनेशन्स दिली आहेत. त्यामुळे होते काय की वर्षाचे ३६५ दिवसही रोज नवीन काही करायचे तरी करता येते.”

“एखादे उदाहरण देता येईल का?”

“हो देते की. आता लॉलीपॉपच घ्या. चिकन लॉलीपॉप, प्रॉन लॉलीपॉप, व्हेज लॉलीपॉप असे थोडाफार प्रकार सोडले तर बाकी काही नाही. पण मी फक्त वांग्यापासून पन्नास प्रकारच्या लॉलीपॉपच्या रेपीसी दिल्या आहेत.”

“काय सांगता? वांग्याचे लॉलीपॉप?”

“होय काका. वांग्याचे आपल्याला दोनचार प्रकारच ठाऊक असतात. बैंगन भरता नाहीतर स्टफ बैंगन किंवा बैंगन मसाला राईस वगैरे. पण जर गिहाईकाला बैंगन लॉलीपॉप्स मिळाले तर? त्यातही पन्नास प्रकार? कसे वाटेल त्याला?”

“वा! फारच खूश होतील ते! पण हे पन्नास प्रकार आपण कसे तयार केले?”

“काका त्यासाठी अगदी लहान वांग्यापासून, मध्यम आकाराची, काकडीसारखी, दुधीसारखी, भोपळ्यासारखी सर्व प्रकारची वांगी वापरून ते करता येतात.”

“मॅडम पण फार मोठ्या वांग्यांचे लॉलीपॉप कोण खाणार? मुळांत वांग्याचे लॉलीपॉप ही कल्पनांच फार चमत्कारिक वाटते नाही?”

“काका त्यात चमत्कारिक काही नाही. आता मोठे लॉलीपॉप कोण खाणार असे वाटते पण काका खाणाऱ्यांच्या तोंडाचा, जबड्यांचा विचार मी त्यात केला आहे.”

“खाणाऱ्यांची तोंडे? जबडे?’

“काका एखाद्याला छोटा लॉलीपॉप आवडणार नाही पण तोच जर भरभक्कम तंगडी लॉलीपॉप असेल तर त्याला तो सगळीकडून लचके तोडून खायला आवडेल. म्हणून निरनिराळ्या जबड्यांना तोडायला आवडतील असे लॉलीपॉप मी शोधले आहेत. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे ऑर्डर द्यावी किंवा करावे.”

“वा! मॅडम हा एक नवीनच विचार आपण मांडला आहे.”

“खाणाऱ्यांचे जबडे हे आजपर्यंत कोणी ऐकले नाही.’

“काका, मी एवढेच करून थांबले नाही तर माझ्या पदर्थांना येणारे सर्व प्रकारचे लॅगदो मी तयार मिळण्याची सोय माझ्या रॅगदॉलमध्ये केली आहे.”

“म्हणजे आपल्या पुस्तकातील रेसीपीप्रमाणे कोणताही पदार्थ करायला गृहिणींना काहीच अडचण नाही म्हणायची.”

“बिलकुल नाही. कोणताही पदार्थ, कोणत्याही वेळी, कोणत्याही सीझनमध्ये करता येतो. शिवाय या पद्धतीने गृहिणी स्वत:ही काही नवी रेसीपी बनवू शकतात. आमच्या कित्येक गृहिणींनी अशा रेसीपी बनवून त्या ‘माझी मैत्रीण’, चला चव चाखूया’, ‘सूनबाई माझी सुग्रण’ या टॉप टीव्ही मालिकांतून करून दाखविल्या आहेत. परवाच एका गृहिणीने करेला हलवा हा एक नवीनच प्रकार करून दाखवला. त्यातून स्फूर्ती घेऊन मी करेला लाडू हा एक नवा प्रकार नुकताच शोधला आहे. त्याची रेसीपी मी शेवटी देणारच आहे आपल्या वाचकांसाठी!”

“वा! वा! मॅडम, या व्यवसायात आणि एकूणच स्वयंपाकाच्या पद्धतीत आपण फार मूलभूत बदल करीत आहात. आपल्या उद्योगाला आणि आपल्या अमेरिकेतील धंद्याच्या विस्ताराला आमच्या शुभेच्छा! आपण आमच्या वाचकांसाठी काय नवीन रेसीपी देणार आहात?”

“काका, मघाशी तुम्ही प्यालात ते ब्रिजल लॅगदो कसाटा शेक आणि करेला लाडू.”

“वा, फारच छान. सांगा.”

ब्रिजल लॅगदो कसाटा शेक

साहित्य: पाव किलो रंगदॉलचे ब्रिजल लॅगदो. १ वाटी आटीव दूध. १ वाटी कार्न.

१वाटी साखर. दोन कप कोणतेही कसाटा आईस्क्रीम, कोणत्याही फळांच्या फोडी.

कृती: मिक्सरमध्ये ब्रिजल लॅगदो आणि इतर सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा. नंतर वरून फळांच्या फोडी घाला. दोन मोठे ग्लास शेक तयार होते. ब्रिजलमध्ये आयर्न असते त्यामुळे शरीराला बळकटी येते.

करेला लाडू.

साहित्य: पाव किलो कारली. १ किलो गूळ. १ वाटी चिंच लॅगदो. २ वाट्या तांदुळाचे पीठ. २ वाट्या डाळीचे पीठ. धणे-जिरे पावडर.

कृती: कारल्याच्या बिया काढून तुकडे करावे. मिक्सरमधून काढावे. बारीक वाटले की त्यात गूळ, चिंच लॅगदो, तांदुळाचे पीठ डाळीचे पीठ (भाजून), धणे-जिरे पावडर घालावी. एक वाटी खोबरेल तेल चांगले कडकडीत करून घालावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण चांगले मळून घ्यावे. थंड झाल्यावर लाडू करावेत. रोज एक लाडू आबालवृद्धांना फार औषधी आणि पौष्टिक आहे.

“वा! वा! मॅडम फारच छान आणि नमुनेदार रेसीपी आहेत. धन्यवाद ! येतो.”

“काका, हे ब्रिजल लॅगदो कसाटा शेक तसेच राहिलेय, ऐवढे संपवून टाका. आवडलेय ना?”

“हो हो आवडलेय ना मॅडम, पण आज माझा गुरुवार आहे ते विसरलोच होतो.”

“अरे मग साबूदाणा-पोटॅटो लॅगदो इन ग्राऊन्ड नट मिल्क शेक चालेल का?”

“राहू द्या मॅडम. आज मी काहीच खातपीत नाही. पुन्हा येईन. धन्यवाद

काका काढता पाय घेतात.

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..