प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या पंचाहत्तर ते शंभर वर्षांच्या कालावधीत उद्घोषक हा प्रकारच नव्हता. टाईम टेबलचा मोठा लाकडी बोर्ड एखाद्या प्लॅटफॉर्मवर असे. त्या बोर्डावर ‘गाडी थांबणाऱ्या’ व ‘न थांबणाऱ्या’ स्टेशनांची नावं काळ्या व लाल अक्षरात दिसत, परंतु कित्येकदा ती स्टेशनची नाव बरोबर फिरतही नसत; त्यामुळे सर्वच कारभार रामभरोसे होता. तेव्हा दूर पल्ल्याच्या गाड्यांच्या आगमन-निर्गमनाच्या वेळा व प्लॅटफॉर्मसचे क्रमांक अचूकपणे सांगणारी एकमेव व्यक्ती असे व ती म्हणजे लाल डगलेवाला हमाल.
उद्घोषकाची पहिली सुरुवात १९५० मध्ये बोरीबंदर स्टेशनावरील लोकल सुटण्याच्या कक्षात सुरू झाली. नवेपणाच्या त्या दिवसांत घोषणांचे आवाज इतके भसाडे येत, की त्या उद्घोषणा ऐकवत नसत व काहीही कळतही नसे. काही वेळा तर लोकल गाडीची घोषणा गाडी निघून गेल्यावर होत असे. हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या आणि प्रवाशांचा त्या घोषणांवर विश्वास बसू लागला.
या कामाकरता खास करून चुणचुणीत व स्पष्ट बोलणाऱ्या मुलींची निवड झाली.
घोषणा कशा दिल्या जाव्यात याचं पद्धतशीर शिक्षण त्यांना देण्यात आलं. त्याकरता मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात आली. लाऊडस्पीकर यंत्रणेत आमूलाग्र सुधारणा झाल्यानं आवाज स्पष्ट व दूरपर्यंत ऐकू येऊ लागले.
दूर पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या खूप वाढली व त्यांना अनेक डबेही जोडले जाऊ लागले. या बदलांबरोबर लोकांना सोईचं व्हावं म्हणून ‘इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले’ची यंत्रणा सुरू केली गेली. त्यामुळे सर्व स्टेशनांतही एक सुसूत्रता आली. प्रवास सुखकर होऊ लागला. काही वर्षांपूर्वी आपला डबा शोधताना घाम फुटत असे. आता मात्र गाडीचं नाव, गाडी क्रमांक, डब्याची येण्याची जागा हे सर्व गाडी स्टेशनात शिरण्याआधी जवळजवळ दहा मिनिटं आधीपासून सर्व मोठ्या स्टेशनावर पाहावयास मिळतं. त्यामुळे डब्यासमोर गर्दी-गोंधळ अजिबात होत नाही.
आता उद्घोषकांचा दर्जाही सुधारलेला आहे. मध्यवर्ती उद्घोषण केंद्र (Central Announcement Centre) मुंबई व्ही.टी. येथून थेट कल्याणपर्यंत जोडलेलं असल्यानं कोणती गाडी उशिरा येणार आहे, तिला किती वेळ लागेल, हे सर्व उद्घोषकामार्फत प्रवाशांना कळविलं जातं. भारतभरातील हजारो स्टेशनांवर हे उद्घोषक फार मोलाची कामगिरी बजावीत आहेत. ही कौतुक करण्यासारखी बाब आहे.
डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply