भारत सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारी खात्यांमध्ये सर्वांत जास्त कर्मचारी वर्ग हा रेल्वेखात्यात नोकरी करतो. त्यांची संख्या अंदाजे १४ लाखांपर्यंत आहे. साधारणपणे दर ४५० ते ५०० भारतीयांमध्ये एक व्यक्ती ही रेल्वेशी संलग्न असते. हा आकडा ज्यांना रेल्वेकडून पगार मिळतो त्यांचा आहे, रेल्वेशी जोडल्या गेलेल्या अनेक कंपन्या, बांधकामांवरील कर्मचारी, हे यांहून निराळेच असतात. स्टेशनवरील अनेक जोडधंद्यात असलेली मंडळी हीसुद्धा रेल्वे धावण्याशी निगडित आहेत. असा हा प्रचंड मोठा ‘जगन्नाथाचा रथ’ लक्षावधी भारतीयांना रोजचा प्रवास. घडवीत असतो. यामधील तीन चतुर्थांश वर्ग हा गँगमन, साफसफाई करणारे कर्मचारी, हमाल, अशा वेगवेगळ्या विभागांतून काम करीत असतो.
रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम करणारे हे लोक ब्रिटिश राज्य असताना तीन श्रेणींमध्ये कामाला होते. पूर्णत: युरोपियन, अँग्लो इंडियन आणि इंडियन. यांपैकी पहिल्या दोन श्रेणीतील लोकांचा दर्जा उच्च असे. त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व चांगली घरे असत. दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीत काम करणाऱ्यांबाबत मात्र जाणवण्याएवढा भेदभाव असे. १९४६-४७ च्या सुमारास पहिले दोन्ही वर्ग लोपच पावले आणि कर्मचारीवर्गात एकसंधता आली. तत्पूर्वी इ.स. १९२० ते १९४० च्या दरम्यान रेल्वेकर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी ४८ वेळा संपावर गेले होते. स्वातंत्र्यानंतर सर्वांत मोठा संप १९७४ साली मे महिन्यात झाला होता. आता एखाद्या विभागातील मोटरमन, गार्ड्स हे तात्पुरत्या काळासाठी संपावर जातात. एकूण कामगारवर्ग समाधानी असल्याचं चित्रं आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना राहण्याकरता रेल्वेच्या मालकीच्या राहण्याच्या जागा (Quarters) भारतभर असून, त्यांची बांधणी उच्चदर्जाची आहे. येथील सर्व सोयी अद्ययावत आहेत. रेल्वेकॉलनीची व्यवस्था तर डोळ्यांत भरणारी असते.
रेल्वेची हॉस्पिटल्स् आधुनिक असून, दवाखाने भारतभर आहेत. तिथे सर्व प्रकारची औषधं मिळण्याची सोय आहे. त्याहून अति-उच्चदर्जाची वैद्यकीय सेवा खाजगी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्समधून मिळण्याची सोय आहे.
शिक्षण व खेळांकरता रेल्वेचं फार मोठं बजेट असून, त्यातून अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उच्च शिक्षणाची संधी मिळते.
‘भारतीय रेल्वे आपल्या देशाचा मौल्यवान ठेवा आहे’ हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय रेल्वेबाबतचे उद्गार होते, आणि ते किती सार्थ आहेत हे भारतीय म्हणून आज आपण अभिमानानं पाहतो आहोत.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply