नवीन लेखन...

रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन

हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेमार्गांची कसोशीनं देखभाल करणारे शेकडो कामगार म्हणजे रेल्वे गँगमन.’ ‘गँग’ ह्या शब्दाबरोबर डोळ्यांसमोर गुंडांची गँग उभी राहते, त्यामुळे या शब्दाला या कामगारांनी नापसंती दर्शवली; म्हणून त्यांना आता ‘ट्रॅकमन’ व ‘खलाशी’ म्हणतात. हे कामगार रेल्वेमार्गांना जिवापाड जपतात. रेल्वेमार्गांची सुव्यवस्था ठेवणं, डोळ्यांत तेल घालून फिशप्लेट्सवर सतत लक्ष ठेवणं ही ट्रॅकमनची जबाबदारी असते. खरंतर ते रेल्वेचे २४ तासासाठीचे वॉचमन असतात. वेळप्रसंगी मार्गावर कोणताही धोका आढळल्यास जिवावर उदार होऊन भरधाव येणाऱ्या गाडीला दूरवरून इशारा देत हे कर्मचारी ती थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर सुमारे ८ ते १० किलो वजनाची विविध हत्यारं असतात. ३५ किलो एवढं वजन १०० मीटर अंतरापर्यंत २ मिनिटांत एका फेरीत, तशीच वेळ पडल्यास अवजारांसकट १५०० मीटर अंतर ७ मिनिटांमध्ये धावून गाठण्याची क्षमता असेल, तरच या कामाकरता त्यांची निवड केली जाते. ट्रॅकमनना त्यांची सर्व कामं दोन समांतर मार्गांच्या मध्यात उभं राहून तळपत्या उन्हात किंवा गारठून टाकणाऱ्या थंडीत वा कोसळणाऱ्या पावसात करावी लागतात.

रुळांच्या दोन मार्गामध्ये उभं राहण्यास जेमतेमच जागा असल्यानं बाजूनं वेगात जाणाऱ्या गाडीचा धोका सततच असतो. मुंबई शहरात तर दर मिनिटाला लोकल जात असतात. त्यामुळे अनेक वेळा धक्का लागून हे ट्रॅकमन गंभीररीत्या जखमी होतात वा मरणही पावतात. गेल्या तीन वर्षांत मुंबई व आसपासच्या ट्रॅकवर जवळजवळ ३० लाईनमन बळी पडले. त्यातही प्रवासी गाडी वा मालगाडीपासूनचा धोका जास्तच असतो. लष्करातील जवान ज्याप्रमाणे सरहद्दीवर संरक्षण करताना बळी जातात, तसेच हे ट्रॅकमन आपली सर्वांची जीवनरेषा बिनात्रासाची व्हावी म्हणून आपला जीव गमावतात. खरं पाहता,

हे रेल्वेचे शूर सैनिक असून, त्यांच्या शौर्याची गाणी कधीच गायली जात नाहीत ही शोकांतिका आहे.

दिल्लीजवळील मांडवली या छोट्या रेल्वेस्टेशनजवळील भोला नावाच्या लाईनमननं त्यांच्या रोजच्या कामाचा दिनक्रम कसा असतो ते लिहिलं आहे. हा दिनक्रम त्याच्याच शब्दांत वाचण्यासारखा आहे. त्यानं जे लिहिलं आहे त्याचं सारं असं आहे: वयाच्या १७ व्या वर्षी उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यातून रेल्वे ट्रॅकमनच्या कामावर त्याची निवड झाली. आज वयाच्या ५२व्या वर्षांपर्यंत, म्हणजे ३५ वर्षे तो हे काम मनापासून करीत आहे. रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (यामध्ये २ तासांची सुटी) तो कामावर असतो. रोज अंदाजे १० ते १२ किलोमीटर चालावं लागतं. रोजचा हाच मार्ग असल्यानं लाईनची इंचाइंचाची त्याला माहिती आहे व त्यामुळे काम चोख बजावलं जातं. या ट्रॅकमनच्यावरची जागा ‘की’ मनची आहे, परंतु ते पद मिळविण्याची भोलाची इच्छा नाही; कारण तिथे जबाबदारी जास्त असते. कधी अपघात झाला तर संपूर्णपणे त्या पदावरील व्यक्तीला जबाबदार धरलं जातं. रेल्वेलाईनला लागूनच त्याला राहण्यासाठी दोन खोल्या दिल्या असून, तिथे नातवंडांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. महिना १५ ते १८ हजार रुपये असा पगार असल्यानं भोला त्यावर खूश आहे. ‘आमच्याशिवाय रेल्वेगाड्या चालणं कठीण आहे, पण आमच्या जागी दुसरे कोणी केव्हाही मिळू शकतात’ याची सतत जाणीव असल्यानं रेल्वेच्या इतर १३ लाख कामगारांप्रमाणे संपाचे विचार डोक्यात आणता येत नाहीत. खरं तर रोजच आम्ही मरणाच्या वाटेवरून चालत असतो, परंतु शेवटी माझं नशीब देवाच्याच हातांत आहे. माझी देवावर अढळ श्रद्धा आहे. घरात वा कामावर सतत २४ तास इंजिनचे कर्कश्श आवाज कानांवर पडत असतात, तेच आमचं जीवन आहे.’

प्रवाशांचा प्रवास निर्धोक ठेवणारे हे गँगमन नावाचे रेल्वेचे जणू शूर सैनिकच! त्यांच्या तत्परतेला आणि कष्टांना प्रत्येक प्रवासादरम्यान मनोमन सलाम करायला हवा.

डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

2 Comments on रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन

  1. रेल्वे मधल्या एका दुर्लक्षित व उपेक्षित अशा कर्मचार्या बद्दल एका डॉक्टरांनी लिहिले ली ही पोस्ट वाचून त्यांच्या निरीक्षणाचे कौतुक वाटते.त्यांचे रेल्वेची रंजक सफर हे पुस्तक मी वाचले आहे.त्यांची विविध विषयांची आवड व त्यातील सखोल माहिती ह्याबद्दल त्यांच्या विषयीचा आदर द्विगुणित होतो.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..