ज्या रेल्वेनं आपण प्रवास करणार, त्या गाडीचा प्रवासी डबा हा प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आज सुखसोयींनी युक्त डबे सर्वत्र उपलब्ध आहेत, पण सुरुवातीच्या काळातले रेल्वेचे डबे फारसे आरामदायी नव्हते. अगदी इंग्लंडमध्येदेखील सुरुवातीला रेल्वेचा प्रवास अतिशय खडतर असाच होता. थंड हवामान, लवकर पडणारा अंधार, त्यांतच डब्यातील सोयी अगदीच जुजबी होत्या. थंडीने प्रवासी गारठून जात. काही प्रवाशांजवळ मेणबत्त्या असत. त्या मिणमिणत्या उजेडात प्रवास करणं हे एक दिव्यच असे. प्रवास संपल्यावर हालअपेष्टांतून सुटका झाल्याचा आनंद प्रवासी अनुभवत.
भारतात रेल्वे प्रथम सुरू झाली तेव्हा आयताकृति लाकडी खोक्यांसारखे डबे चाकांवर बसविलेले असत. मधल्या भागात आडव्या, पाठ नसलेल्या लाकडी फळ्या बसण्यासाठी असत, काही डब्यांना छप्परही नसे; त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, गारठून टाकणारी थंडी व गाडीला बसणारे प्रचंड धक्के हादरे, अशा दिव्यातून २४ ते ३६ तास प्रवास चाले. जवळजवळ पहिली ४० वर्षे तिसऱ्या वर्गाला स्वच्छतागृहांची सोय नव्हती. काही ठरवीक तासांनी उजाड प्रदेशात गाडी टॉयलेटसाठी थांबविण्यात येई. पुढे प्रवाशांची गर्दी इतकी वाढत चालली, की काही वेळा उघड्या ट्रकसारखे मालगाडीचे डबे प्रवाशांना नेण्या-आणण्यासाठी उपयोगात आणले गेले. काही गाड्यांना सन १८६२ मध्ये दोन मजली डबे जोडण्यात आले. असेच डबे मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस व बलसाड एक्सप्रेससाठी अगदी सन १९९० सालापर्यंत वापरले गेले. इ.स. १८७४ मध्ये तिसऱ्या वर्गाहून खालच्या दर्जाचे चौथ्या वर्गाचे डबे तयार करण्यात आले. या वर्गामध्ये बसण्यासाठी लाकडाचं फळकूटसुद्धा नसे. डब्यात खालीच उकिडवं बसून लोक प्रवास करीत. तरीही जनतेचं रेल्वेवरील प्रेम काकणभरही कमी झालं नव्हतं. पुढे सन १८८५ मध्ये टेकून बसता येईल असं बाक डब्यात आलं. चौथा वर्गच बाद झाला. पहिला, इंटर आणि तिसरा वर्ग अशी तीन वर्गात विभागणी झाली.
सन १९२२ मध्ये इंग्लंडमधून लोकल गाडीकरता स्टीलच्या सांगाड्याचे डबे आयात करण्यात आले. पहिल्या वर्गाचे डबे मात्र प्रथमपासूनच इतके अलिशान होते, की अशा त-हेचे डबे इंग्लंड अमेरिकेतील गाड्यांनासुद्धा नव्हते. अशा डब्यांमधून बडे इंग्लिश राज्यकर्ते सोबत अनेक नोकरांना दिमतीला घेऊन प्रवास करत असत. डब्याला उत्तम आडव्या खिडक्या असत. आडवं झोपून बाहेरचं सौंदर्य आरामात पाहत त्यांचा प्रवास सुखकर होई. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे व मधल्या स्टेशनवर बर्फाच्या लाद्या डब्यात चढविल्या जात असत.
पुढे सन १८७० पासून रात्रीच्या वेळी प्रवाशांबरोबर तेलाच्या चिमण्या असत. नंतरच्या काळात गॅस बत्त्यांची सोय करण्यात आली.
सन १९०२ मध्ये जोधपूरच्या महाराजांनी आपल्या संस्थानातील रेल्वेच्या डब्यात विजेच्या दिव्यांची सोय केली. १९०७ सालापासून भारतातील प्रमुख मार्गांवरील गाड्यांच्या डब्यात विजेचे दिवे चमकू लागले. १९४७ सालापासून स्टीलची चौकट डब्यांना दिली गेली. त्याला ‘सिल्व्हर अॅरो’ या नावानं संबोधलं जाऊ लागलं. एका डब्यातून दुसऱ्या डब्यात अंतर्गत जाण्यासाठी Vestibule म्हणजे दोन डब्यांना जोडणारे चिंचोळे मार्ग आल्याने गाडी चालू असताना एका डब्यातून पलीकडच्या दुसऱ्या डब्यात जाणं शक्य झालं. सन १९३६ मध्ये पहिले वातानुकूलीत डबे अति-महत्त्वाच्या गाड्यांना लावण्यास सुरुवात झाली. हे डबे म्हणजे फिरते महालच होते. हळूहळू अशा डब्यांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. परिणामी, रेल्वेने ३ टायर, २ टायर व फर्स्ट क्लास वातानुकूलित डबे लावण्याचा निर्णय घेतला. स्लीपर कोचनं तर इतकी क्रांती केली, की सामान्य माणूसही साध्या स्लीपर कोचनं प्रवास करू लागला.
‘राजधानी’, ‘गरीब रथ’, ‘दुरांतो’ यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित डबे असलेल्या गाड्या सुरू झाल्या. ४ ते ५ तासांच्या प्रवासाकस्ता आरामात बसून जाता येईल अशा वातानुकूलित ‘शताब्दी’, ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ याही गाड्या आल्या. डब्यांची आकर्षक बांधणी व विविध रंगसंगती असलेल्या अनेक गाड्या दिमाखात धावू लागल्या.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply