नवीन लेखन...

रेल्वेप्रवासाचं नियोजन – भाग – २

रेल्वेप्रवासाचं नियोजन

साधारण १९५५ सालापासून तिकिटाचं रिझर्व्हेशन करणं प्रवासीमंडळींमध्ये रुळू लागलं होतं. त्या तिकिटावरचा पेननं लिहिलेला डबा क्रमांक आणि सीट क्रमांक वाचणं म्हणजे एक दिव्यच असे. पुढे गाडीत हमखास जागा पकडून देणारे स्टेशनवर उभेच असत. त्यांचं जाळंच तयार झालेलं होतं. त्यांच्यातील काही जण गाडी यार्डातून निघून फ्लॅटफॉर्मला लागतानाच अनेक जागा अडवून येत. मग काय? सीट देण्याचा लिलावच! जो प्रवासी जास्त पैसे देणार तो वजीर. काही वेळा दोन बाकांच्या मध्यातही पथारी पसरत. भांडणं, कलकलाट यानं प्रत्येक डबा दुमदुमून निघत असे. ही स्थिती बदलत जाऊन, आज आपण घरबसल्या संगणकाद्वारे तिकिटाचे आरक्षण आज करू शकण्याइथपर्यंतचा टप्पा रेल्वेनं गाठला आहे.

संगणकावरून आरक्षण (Computer Rail Reservations) ही भारतीय रेल्वेच्या अभूतपूर्व यशाची सर्वोत्तम घटना मानावी लागेल. काही वर्षांत याचं जाळं भारतभर पसरलं. कुठल्याही स्टेशनवरून, भारतभरातील कोणत्याही गाडीचं जाण्याचं-येण्याचं तिकीट क्षणात प्रवाशांच्या हातात पडू लागलं. भारतातील अनेक प्रादेशिक भाषांना डावलून संपूर्ण इंग्रजीत हजारो ‘बुकिंग क्लार्क्स’ना याचं उत्तम शिक्षण देणं हे एक जिकरीचं काम होतं. गेल्या अनेक वर्षांत मी रेल्वेने भरपूर प्रवास केला, पण संगणकीय तिकिटात एकदाही चूक झालेली मला आठवत नाही. याकरता वापरण्यात येणारं सॉफ्टवेअर अतिशय उच्च दर्जाचं आहे. आरक्षण दोन महिने, तीन महिने, सहा महिने आधीपासून होत असल्यानं (ही कालमर्यादा सारखी बदलत असते) प्रवास-नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे.

आपल्याला ज्या गावाला जायचं आहे, तिथपर्यंत कोणकोणत्या गाड्या जातात याची व्यवस्थित माहिती (गाडी क्रमांकासकट) रेल्वे टाईमटेबल वा संगणकाद्वारे आपल्याजवळ असणं आवश्यक असतं. आजकाल भारतभरातून असंख्य गाड्या सर्व दिशांना जात असतात, तेव्हा योग्य गाडी शोधण्याचा अभ्यास केल्यास प्रवास सुखकर होतो. बऱ्याच वेळा महत्त्वाच्या गाड्या अगदी पहिल्या दिवशीच तासभरात पूर्ण भरतात, पण विशेष प्रसिद्ध नसलेल्या गाडीमध्ये आरामात जागा मिळू शकते.

वेटलिस्ट आणि रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलायझेशन (आर.ए.सी.) ही तिकिटं काढून ठेवणं व पुढील संपूर्ण प्रवासाचं नियोजन करणं हे व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण काही वेळा आपला तिकीट क्रमांक अगदी गाडी सुटण्याच्या दिवसापर्यंत पुढे जात नाही, पण जे सारखे प्रवास करत असतात ते बेधडकपणे अगदी पन्नासावा क्रमांक असेल तरी गाडीवर हजर होतात. काही वेळा जागा मिळतेही, पण हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतं.

विविध प्रवासी कंपन्या सुरुवातीला रेल्वे तिकिटाची सोय प्रवाशांना करून देत असत. त्यावेळी फॉर्मवर विविध नावं व वयं लिहून आधीच तिकिटं मिळविली जात असत. जे प्रवासी उशिरा नोंदणी करत, त्यांच्या हातात निराळ्या नावाची व वयाची तिकिटं दिली जात. तिकीटचेकरनं नाव विचारलं तर फॉर्मवरचं नाव बेधडकपणे सांगावं लागे, पण काही वेळा वयाचा गोंधळ होत असे. आता एसी कोचेसमध्ये ओळखपत्रं विचारू शकतात.

एकदा पुण्याहून येताना मला तिकीट मिळालं होतं, मिस्टर जे. एच. शाह नावाचं, वय ७६. मी जेमतेम ५० वर्षाचा. डब्यावरील चार्ट पाहून मी थक्कच. गाडी सुरू झाली; चेकर माझ्यापर्यंत आला, पण एकाएकी डब्यात गडबड गोंधळ झाला, अनेक प्रवासी घुसले आणि मग तपासनीस जो गायब झाला तो उगवलाच नाही. माझं नशिब बलवत्तर हे खरंच, पण माझ्या एजंटनी मला साफ बनविलं होतं हेही तेवढंच खरं! एजंटकडून रिझर्व्हेशन करताना असं बनवलं जाण्याची शक्यता गृहीत धरावी लागत असे.

एकदा आमचा २५ जणांचा ग्रूप जम्मू तावी एक्सप्रेसनं मुंबईकडे परत येणार होता. चक्की बँक स्टेशनवर आम्ही सर्व चढणार होतो, आम्हा सर्व प्रवाशांची नावं, वयं व्यवस्थित भरलेले फॉर्ड्स जम्मू येथील एजंटकडे पाठविण्यात आले होते. तेथील एजंटनी रेल्वेक्लार्कशी संधान बांधलेलं होतं, भारतभर रिर्झव्हेशन बरोबर सकाळी ८ वाजता सुरू होतात; पण जम्मू येथील क्लार्कनी सकाळी ७.४५ ला कॉम्प्युटरवर नावं टाकण्यास सुरुवात केली. खिडकी तर बंद होती, त्याचवेळी त्या ऑफिसवर रेल्वे व्हिजिलंट फोर्सची धाड पडली, त्यांनी सर्व फॉर्मूस जप्त केले. आमच्यापैकी एकाही प्रवाशाचं तिकीट निघालं नाही. मुंबईच्या टूर ऑफिसला कळताच त्यांनी ताबडतोब दिल्लीच्या एजंटला गाठलं व दुसऱ्या दिवशीची सर्वांची ‘स्वर्णजयंती मेल’ची तिकिटं दिल्ली ते मुंबई अशी काढली. आमची टूर हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे संपणार होती व तेथून चक्की बँक स्टेशन अगदी दोन-तीन तासांच्या अंतरावर होतं, पण आता सर्वांना डलहौसी ते दिल्ली असा ६८० कि.मी. चा प्रवास बसनं करावा लागणार होता. बरं, हे सर्व घडलेलं रामायण टूर प्रमुखांनी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं. १६ दिवसांची सहल आनंदात झालेली, रात्री हॉटेलमध्ये आम्हा सर्वांना या घोळाची कल्पना देण्यात आली. प्रत्येक जण मनातून बिथरलाच, पण उपाय काहीच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता डलहौसीहून सर्व प्रवासी निघाले ते रात्री दीड वाजता दिल्लीत पोहोचले. तिथून पहाटे साडेपाच वाजताच दिल्ली स्टेशनात हजर. गाडीची वेळ ७ वाजता, त्यात काही जणांची तिकिटं वेगवेगळ्या डब्यात, परत तिकीटचेकरची दाढी कुरवाळत, दक्षिणा देत सर्वांची तिकिटं एका डब्यात आली आणि निःश्वास टाकला. या अशा अनेक अडचणींमुळे ‘टूर ऑपरेटरां’ची फारच दमछाक होते.

कोणत्याही प्रवासात योग्य गाडीची तिकिटं बिनबोभाट मिळण्यासारखं सुख नाही. त्यासाठी नियोजन आवश्यकच असतं. जरी हे सर्व व्यवस्थितपणे पार पडलं तरी काही वेळा काहीतरी अनपेक्षित घटना घडतात आणि आपण पेचात पडतो. हा अनुभवदेखील आम्ही एकदा घेतला.

तेव्हा शेगाव ते मुंबई असा प्रवास आम्ही ५ जण करत होतो. त्यात आमची १८ वर्षांची नात बरोबर होती व एकत्रित तिकिटावर तिचं नाव पहिलं होतं. रात्री ११ वाजता तिकीट तपासनीस आले त्यांनी नातीला ओळखपत्र विचारलं. नेहमी ज्येष्ठ नागरिकांजवळ कार्ड असणं आवश्यक असतं हे सर्वांना माहीत असतं, पण कॉलेज विद्यार्थी असं कोणतंही कार्ड बरोबर ठेवत नाहीत. तिकिटावर तिचं पहिलं नाव असल्यानं ते आवश्यक आहे, बाकीच्यांनी कार्ड दाखवून उपयोग नाही असं सांगून त्यांनी सरळ सरळ २५०० रु. दंड भरा असं फर्मान काढलं. प्रत्येकानं बॅगेतून पैसे शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला दंड भरावा लागणार असं सांगत तो पुढील डब्यात चेकींग करता गेला. आम्ही सगळेच खट्ट झालेलो. गजानन महाराजांचं दर्शन चांगलंच महागात पडणार होतं. तासाभराने तो परत आला. आल्या आल्याच गोड शब्दांत त्यानं आम्हाला सांगितलं, की ‘मी तुम्हाला दंड लावणार नव्हतो. हे प्रथमपासूनच ठरविलं होतं. तुमची चूक नक्कीच आहे, पण परत अशी चूक करू नका हे लक्षात राहावं म्हणून मी एका तासानं परत आलो.’ अशीही देव माणसं भेटतात हे आमचं भाग्यच होतं.

-– डॉ.अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..