प्रवासी रेल्वेमधील प्रत्येक डब्याला दोन्ही बाजूंना दोन अशी समोरासमोर एकूण चार स्वच्छतागृहे असतात. ती वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, त्यांत व्यवस्थित पाणी पुरवठा करणं व दिवाबत्तीची सोय करणं, कडी कोयंडे तपासून दुरुस्त करून घेणं, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं; पण या महत्त्वाच्या कामात बऱ्याच वेळा निष्काळजीपणा आढळून येतो. त्यामुळे डब्यात शिरताना दाराजवळच येणारी तसंच प्लॅटफॉर्मवर येणारी दुर्गंधी ही एक फार गंभीर समस्या बनलेली आहे. सर्व स्वच्छतागृहे खालच्या बाजूनं उघडी असतात, त्यामुळे रेल्वेरुळांवर व त्यांच्या मधल्या भागात पडणारं मलमूत्रादि सांडपाणी हे आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीनं हानिकारक ठरत आहे. चीनसारख्या देशात गाडी स्टेशनात उभी असताना सर्व स्वच्छतागृहे बंद ठेवली जातात, त्यामुळे रेल्वेस्टेशनवर अजिबात घाण नसते.
स्वच्छतागृहांमधून रेल्वेरुळांवर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे रेल्वेचे रुळ गंजतात. या कारणामुळे रुळ बदलावे लागल्यानं रेल्वेला प्रतिवर्षी ३ कोटी, ५० लाखांपर्यंत खर्च येतो. डब्यांतील स्वच्छतागृहांमुळे होणारी आरोग्य आणि पर्यावरणाची हानी टाळावी व हा खर्च आटोक्यात यावा म्हणून बायोटॉयलेटसच्या वापराची सुरुवात झाली आहे. ‘डिफेन्स रिसर्च डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन’ (D.R.D.O.) यांनी नवीन पद्धतीची बायोटॉयलेट्स विकसित केली आहेत. Anaerobic Bacteria चा उपयोग करून बायोटॉयलेट्स (ग्रीन टॉयलेटस्) ही Biomethanation या पद्धतीनं तयार केलेली ही नवी टॉयलेटस् पर्यावरणाला शंभर टक्के अनुकूल आहेत. या प्रक्रियेमधून तयार होणारा वायू रंग व वासविरहित असून, थोड्या प्रमाणात पेट घेऊ शकतो. प्रत्येक टॉयलेटच्या खालील बाजूस ९०० लिटर सांडपाण्याचा साठा होऊ शकणारी टाकी असून, तिच्या वरच्या तोटीतून आत निर्माण झालेला वायू वातावरणात मिसळतो. आत जमा होणारी भुकटी मोठ्या स्टेशनवर टॅकच्या खालून काढण्याची सोय आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरता येतं. अशी स्वच्छतागृहे तयार करण्याचा कारखाना ‘मोतीबाग, नागपूर’ येथे आहे. ही स्वच्छतागृहे कपूरथळा (पंजाब) येथे डब्यांना विशिष्ट पद्धतीनं बसविली जातात. स्वच्छतागृहे बसविताना डब्याच्या रचनेत फार बदल करावे लागत नाहीत व संपूर्ण सुरक्षितता काटेकोरपणे सांभाळली जाते. अशा त-हेची स्वच्छतागृहे ग्वाल्हेर, वाराणसी, बुंदेलखंड एक्सप्रेस या गाड्यांना दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेली आहेत. ऑगस्ट २०१३ पर्यंत १४०० पेक्षा जास्त डब्यांमध्ये अशा प्रकारची स्वच्छतागृहे बसविली गेली आहेत, आणि २५,००० स्वच्छतागृहे तयार करण्याचं काम चालू आहे. वातावरण दुर्गंधीमुक्त व प्रदूषणमुक्त करण्याचा रेल्वेचा निर्धार आहे.
बायोटॉयलेट्स
यामध्ये वापरण्यात येणारे जंतू अंटार्क्टिकामधून आणलेले आहेत. Psychrophile नावाचे जंतू मनुष्याच्या विष्ठेच्या घन भागाचे विभाजन करतात आणि त्यामधून गंधविरहित वायू हवेत सोडण्यात येतो. (या गॅसचा बायोगॅस म्हणूनही उपयोग होतो.)
या संपूर्ण प्रक्रियेतून तयार होणारा मळीचा भाग खत म्हणून वापरता येईल व उरलेले निर्जंतुक झालेले पाणी टाकीत साठविले जाईल. या सर्व प्रक्रियेमुळे प्लॅटफॉर्मवर होणारी घाण नाहीशी होईल व रेल्वेचे रूळ सुरक्षित राहण्यास मदत होईल.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply