नवीन लेखन...

लंडनचा पाऊस

कोणत्याही गावातला पाऊस मला खूप आवडतो. कोकणातला आठ आठ दिवस संतत धार धरणारा पाऊस तर सर्वात आवडता. ठाण्याचा ही आवडतोच पण तो फक्त घरात बसून बघायला. आपल्याकडे पावसाळा हा सेपरेट ऋतू आहे आणि साधारण त्याच काळात आपण पाऊस अनुभूवू शकतो. लंडन मध्ये ही ऑक्टोबर ते जानेवारी असा ऑफिशियली पावसाळा जाहीर केलेला असला तरी इथे पाऊस वर्षभर आणि कधी ही पडतो. पावसामुळे क्रिकेटच्या किंवा विम्बल्डनच्या मॅच वर पाणी फिरल्याचे आपण अनेक वेळा बघितलं आहेच. तरी ही लंडनचा पाऊस ही अनुभवण्या सारखीच गोष्ट आहे म्हणून हा लेखन प्रपंच. इथे बरेच वेळा आकाशात ढगांचीच गर्दी असते त्यामुळे आकाश ही करड्या रंगाचंच दिसतं. विमानातून खाली पाहताना ही ढगांचा पडदा दूर सारून विमान खूप खाली आल्याशिवाय भर शहरातून नागमोडी वळणे घेत जाणारी लंडनची टेम्स नदी, मोकळी मैदानं, एका लायनीत एक सारखी दिसणारी एक मजली लाल कौलारू घरं, सरळ सोट जाणारे मोटार वेज आणि त्यावर खेळातल्या गाड्यांसारख्या दिसणाऱ्या सुर्रकन जाणाऱ्या गाड्या हे काहीही आपल्याला पहाता येत नाही.

लंडनचं आकाश नितळ निळं क्वचितच दिसतं. स्वच्छ ऊन ही गोष्ट लंडनमध्ये तशी दुर्मिळच आहे. त्यामुळे Sun is shining bright च टोपीकराना फारच अप्रूप. अर्थात हवा कशी ही असली तरी त्याबद्दल तक्रार करणं हा लंडनकारांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. ? असो. बहुतांश वेळा हवा ढगाळ असल्यामुळे खूप जणांना ते डिप्रेसिंग ही वाटतं पण मला अशी हवा मनापासून आवडते. अश्या हवेत अगदी भर दुपारी फिरायला गेलं तरी उन्हाचा त्रास होत नाही. दुपारी बारा वाजता सुदधा मागच्या अंगणात गरम गरम कॉफी घेत एखादं पुस्तक वाचण्याची मजा काही वेगळीच असते. किंवा काही ही न करता मनात कोणताही आकार धरला तरी आकाशातल्या ढगात तो लगेच तयार होण्याचा खेळ तर किती ही वेळ खेळला तरी कंटाळा येत नाही मला.

इकडे जनरली पाऊस खूप वेळ आणि अगदी धो धो असा पडतच नाही. थंड हवेमुळे आणि कमी सूर्यप्रकाश असल्याने जमीन एवढी तापत नाही आणि जरी तापत असती तरी जमीन हा प्रकारच इंग्रज लोकांनी आपल्या गावात ठेवलेला नाहीये. सर्वत्र सिमेंटचे रस्ते, हिरवळ किंवा मग छोटे छोटे दगड तरी घातलेले मोकळ्या जागी. त्यामुळे पावसा बरोबर येणाऱ्या मृदगंधाला मात्र इथली मंडळी मुकली आहेत. अत्तराचे भाव आज पार कोसळले हा पहिल्या पावसात आपल्याकडे फिरणारा मेसेज ही इथे व्हायरल होत नसेल.

कधीतरी थंडर स्टॉर्म ची वॉर्निंग येते, आपण विजांचा कडकडाट आणि धो धो पावसाची अपेक्षा करतो पण आपला अगदीच भ्रमनिरास होतो. थंडरस्टॉर्म म्हटलं तरी विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट नसतोच. दहा पंधरा मिनिटांची एखादी सर पडली की संपलं इथलं थंडरस्टॉर्म. एरवी तर पाऊस अगदीच कळेल न कळेल इतपत पडतो पुण्याच्या पावसासारखा. बाहेर असलो तर छत्री उघडली नाही तरी ही चालेल . पण त्याचा फायदा असा होतो की त्यामुळे इथले रस्ते, झाडं, फूटपाथ रोजच नैसर्गिक रित्याच धुवून निघतात.त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही.

आपल्याकडच्या धो धो पडणाऱ्या आणि खिडकीच्या पत्र्यावर ताड ताड ताशे वाजवणाऱ्या पावसाच्या आवाजाची एक मस्त गुंगी येते. धो धो पडणाऱ्या पावसाचा आवाज हा सगळ्या white noise मध्ये लोकप्रिय आहे ते उगाच नाही. इथे मात्र पावसाला फार जोरच नसतो आणि पावसाबरोबर येणाऱ्या थंडीमुळे खिडक्यादारं बंदच करावी लागत असल्याने इथला पाऊस अगदी निःशब्द असतो. घरात असलो तर कळत ही नाही बाहेर पाऊस पडतोय ते. अर्थात असा पाऊस ही खिडकीत बसून बघायला छानच वाटतो.

मुसळधार वृष्टी होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला की त्या दिवशी चकचकीत ऊन पडतं ह्या पार्श्वभूमीवर इथला अचूक अंदाज ही काही तरी जादूच वाटते. हवामान खात्याच्या अंदाजाला पाऊस कधी धोका देत नाही. एक दिवस सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज होता. साधारण पावणे दहा झाले तरी पत्ता नव्हता पावसाचा. मला “कसे चुकले हे “ म्हणून थोडा असुरी म्हणतात तसा आनन्द होत होता पण पुढच्या पाचच मिनिटात वातावरण बदललं आणि थोडा का होईना पडला बिचारा. स्वतः पडला पण हवामान खात्याचा अंदाज खोटा नाही पाडलान. सकाळी ऊन दुपारी ढग आणि संध्याकाळी पाऊस हे एकाच दिवशी दाखवण्याचे कसब लंडनच्या हवेत आहे. ऊन पावसाचा खेळ इथे कायमच सुरू असतो. त्यामुळे इंद्रधनुष्य मात्र खूप वेळा दिसते. थंडीच्या दिवसात सूर्याची किरणं तिरपीच असतात दिवसभर तेव्हा तर भर दुपारी ही इंद्रधनुष्य दिसू शकत. थंडीच्या दिवसात पारा चार अंशाच्या खाली असताना जर पाऊस पडला तर त्याच रूपांतर हिम वृष्टीत होत. अर्थात लंडनला थंडी खूप असली तरी बर्फ मात्र क्वचितच पडतो. असो. कधी कधी संध्याकाळच्या वेळी आकाशातले काळे ढग दूर सारून आसमंतात फाकणारा सोनेरी सूर्यप्रकाश फार सुंदर दिसतो. सर्व परिसर सुवर्ण प्रकाशात झळाळून निघतो.

एक दिवस असाच दिवसभर पाऊस होता. छत्री वैगरे घेऊन मी पाय मोकळे करायला बाहेर पडले होते. ढगाळ हवा, रिमझिम पडणारा पाऊस, हवेतला गारवा, पावसामुळे स्वच्छ झालेली झाडं, फुलं , घरांपुढल्या ताज्यातवान्या झालेल्या बागा, वाऱ्यामुळे भिरभिरत खाली येणारा झाडांचा मोहर , पावसामुळे अचानक रस्त्यावर आलेल्या असंख्य गोगलगायी हे सगळं पहात असतानाच समोरच दृश्य पाहून थबकलेच मी. झुपकेदार शेपटी असलेला एक छोटासा कोल्हा समोरच्या फुटपाथवरून पलीकडच्या वाडीत धावत जाताना दिसला. होय होय , बरोबर वाचताय तुम्ही… कोल्हाच होता तो….

लंडनचे कोल्हे हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण थोडक्यात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर शहराची लोकसंख्या वाढू लागली त्यामुळे जंगलं तोडून तिथे मानवी वसाहती बांधल्या गेल्या. त्या जंगलातले हे मूळ रहिवासी नवीन रहिवाश्यां बरोबर इथेच मुक्कामास राहिले, म्हणून लंडन मध्ये खूप कोल्हे दिसतात. लोकं घरातल उरलं सुरलं मांस वैगरे रात्री त्यांच्यासाठी घराबाहेर ठेवून देतात. त्यांच्या पोटापाण्याची सोय आपोआपच होते त्यामुळे शिकार वैगरे विसरून ते आता माणसाळलेत असं म्हणतात. तरी कोल्हा म्हटलं की थोडी भीती वाटतेच. तरी कोकणात आमच्याकडे कोल्ह्याचं दर्शन हा शुभसंकेत मानला जातो म्हणून थोडं बरं ही वाटलं. असो. लहान मुलांना आपल्या बागुलबुवा सारखी कोल्ह्याची भीती दाखवतात म्हणे.

बघता बघता पावसाचा जोर वाढला . पावसामुळे आणि वाऱ्यामुळे थंडी ही वाढली. माझ्याकडे छत्री आणि स्वेटर दोन्ही असल्याने मी पावसाचा आनन्द घेत मजेत चालत होते. तेवढ्यात माझ्या अगदी जवळ एक गाडी येऊन थांबली. इतक्या जवळ थांबलेली गाडी बघून मी थोडी घाबरलेच पण गाडीचा नंबर बघताच मात्र रिलॅक्स झाले. पावसाचा जोर वाढलेला बघून माझी मुलगी मला न्यायला आली होती. मुलीला आपली एवढी काळजी आहे हे बघून छानच वाटलं पण मानवी मनाला निखळ आनंद घेताच येत नाही.एवढे दिवस आपण तिची कळजी घेत होतो , आता ती आपली घेतेय ह्या रिव्हर्स पेरेंटहुडच्या विचाराने थोडं उदास ही वाटलच.

-हेमा वेलणकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..