लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे हे राज कपूर यांचे स्वप्न होते. राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. अभिनेता होण्यासाठी त्यांनी क्लॅपरबॉय म्हणूनही काम केले आणि केदार शर्मा यांची थप्पडही खाल्ली. दहावीत राज कपूर एका विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी वडिलांना, ‘मला आता पुढे शिकायचे नाही, मला चित्रपटात काम करायचे आहे’असे सांगितले होते. राज कपूर यांचे वडील मा.पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूर यांना निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या युनिटमध्ये क्लॅपर बॉय म्हणून काम करण्यास सुचविले होते. शर्मा यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर एकसारखे आरशाजवळ जायचे आणि केसातून कंगवा फिरवायचे. तसेच क्लॅप देताना आपला चेहरा कॅमेरात दिसेल, याचीही ते काळजी घेत असत. ‘विषकन्या’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर यांचा चेहरा कॅमेऱ्याच्या समोर आला आणि चरित्र अभिनेत्याची दाढी क्लॅपच्या बोर्डावर अडकून निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूर यांचा गाल रंगविला. आपल्या केलेल्या कृत्याचा शर्मा यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या ‘नीलकमल’ या चित्रपटासाठी राज कपूर यांना साईन केले.
अभिनेता म्हणून १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नीलकमल’हा त्यांचा पहिला चित्रपट. १९४८ मध्ये त्यांनी ‘आर. के. फिल्म’ची स्थापना केली आणि ‘आग’हा चित्रपट तयार केला. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’या चित्रपटाने राज कपूर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील ‘आवारा हू’ हे गाणे परदेशातही खूप लोकप्रिय झाले. बॉलीवूडचा रुपेरी पडदा पुढे ज्या अनेक अभिनेत्रींनी ‘नायिका’म्हणून गाजविला त्यांना राज कपूर यांनी ‘आर.के’तर्फे रुपेरी पडद्यावर येण्याची पहिली संधी दिली होती. ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटाची निर्मिती केली ज्यात ऋषी कपूर बरोबर नायिका म्हणून डिम्पलला संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ‘कोवळ्या वया’तील (टीन एजर) प्रेमकथांच्या चित्रपटाचा पाया घातला. राज कपूर यांनी आपला मुलगा राजीव कपूर याला घेऊन ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनीला संधी दिली. तर ‘हिना’ चित्रपटात पाकिस्तानी कलाकार झेबा बख्तीयार व मराठी अभिनेत्री अश्विनी भावे हिला संधी दिली. अभिनेत्री निम्मी हिला ‘बरसात’मध्ये भूमिका दिली. बॉलीवूडची ‘स्वप्नसुंदरी’ हेमामालिनी हिला ‘सपनों का सौदागर’ मधून संधी मिळाली.
दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी हिला ‘जिस देश में गंगा बहेती है’ या चित्रपटात राज कपूर यांनी पहिली संधी दिली. या चित्रपटाने पद्मिनीला हिंदी चित्रपटात ओळख मिळाली. राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मध्येही तिची भूमिका होती. बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर राज कपूर आणि नर्गिस ही जोडी लोकप्रिय ठरली. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटानंतर पुढे ‘अंदाज’, ‘जान पहचान’, ‘आवारा’, ‘अनहोनी’, ‘आशियाना’, ‘अंबर’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ असे चित्रपट एकत्र केले. यातील अनेक चित्रपट व त्यातील गाणी गाजली. ‘श्री ४२०’ चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. राज कपूर आणि पाश्र्वगायक मुकेश यांचे अतूट नाते तयार झाले होते. राज कपूर यांचा ‘आवाज’ अशीच मुकेश यांची ओळख होती. राज कपूर यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात पडद्यावर गाणे म्हणतानाचा राज कपूर यांचा आवाज मुकेश यांचाच होता. मुकेश यांच्या निधनानंतर राज कपूर यांनी व्यक्त केलेली ‘लगता है मेरी आवाज ही चली गई’ ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राज कपूर यांनी ‘हिना’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. पण हा चित्रपट त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. भारत सरकारने १९८८ साली राज कपूर यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन गौरवले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, फिल्म फेअर या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.
राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply