नवीन लेखन...

राज कपूर – निळ्या डोळ्यांचा जादूगार !

त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते.

राजचे यशस्वी पोत निरखत असताना प्रकर्षाने आढळते ते त्याचे व्यक्तिमत्व ! पुरुषी सौंदर्याचा नमुना भासतो तो आणि बघताक्षणी शब्दशः त्याच्या “प्रेमात” पडण्यावाचून गत्यंतर नसते. नर्गिसचं नाकेलं आणि काहीसं पुरुषी रुपडं त्याच्या साच्यात म्हणून तर एकरूप झालं असावं आणि त्याच्या कर्तृत्वाचा पाया झालं असावं, त्याचं प्रेरक कारंजं बनलं असावं.

आणि प्रेमासारखा दुसरा संजीवक पाऊस असूच शकत नाही.

राज सुरुवातीला नशीबवान नव्हता. पित्याने घरटं नाकारून त्याच्या पंखांपुढे त्याचं स्वतःचं अथांग आकाश नेमून दिलं. त्याच्या पावलांना स्वातंत्र्याची मुभा दिली. या आव्हानाचा सोमरस पिऊन राजने बघता बघता इथे कलेचा हिमालय उभा केला. या अर्थाने तो स्वयंभूच !
निर्माता,दिग्दर्शक,संकलक,कलावंत, तंत्रज्ञ या प्रत्येक रूपात स्वतःचे ठसेच ठसे उमटवून गेला. चित्रमाध्यमावर स्वतःची इतकी भरभक्कम पकड फक्त त्या माध्यमावरील ” आतल्या” भावनेतूनच असू शकते. या माध्यमाला एक कलात्मक परिमाण बहाल करणं, एक व्यावसायिक उंची देणं यापरतं अन्य ध्येय त्याच्या डोळ्यांनी स्वीकारलेच नाही.

त्याच्या यशाचा अभ्यासक आणखी एका मुद्द्याचा परामर्श घेतल्याविना पुढेच जाऊ शकत नाही- त्याची माणसे !

अब्बास,शैलेंद्र,हसरत जयपुरी,एसजे, मुकेश आणि लता ! ही सारी आभाळाएवढी माणसं, किंबहुना प्रत्येकजण म्हणजे त्या त्या नावाचं आभाळच ! या साऱ्यांचे एकत्र येणे यासारखा महिमा नाही. प्रत्येकाने आपापले “बहर ” त्याला दिले आणि राज त्यातून एकेक ताजमहाल बांधत गेला.

तीच गोष्ट पडद्यावरील कलावंतांची ! राजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत वेगळा,ताजा आणि अस्सल वाटतो. ही राजची छाप, सावली त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमध्ये निस्तेज, पाट्या टाकणारा वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन, त्यातील त्याज्य भाग वगळून त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत. सगळ्यांनी त्याला आपापले “करिअर बेस्ट ” बहाल करून टाकले.

राज कपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य गाजविणारी, पूर्णतेचा, परफेक्शनचा ध्यास घेणारी ! तो होता एक पांढरा पडदा- सारं काही मिरविणारा, पण अंतर्यामी खोलवर ज्वालामुखी घेऊन हिंडणारा !!

“जोकर” च्या नेमक्या अपयशापाशी तो संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने “बॉबी”, ” सत्यम —- ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली. स्त्रीदेहाचे अस्थानी, अनाठायी दर्शन घडवायला सुरुवात केली. सवंग शोमन शिप ही आमची चिखलफेक त्याने सहन केली. तरीही या कलावंताच्या वाट्याला या देशाचे निखळ प्रेम आले.

तो जाणार हे त्याच्या महिन्याभराच्या दवाखान्यातील वास्तव्याने अबोलपणे सांगितलं होतं. “लिविंग लिजंड” च्या उत्कट शेवटाने (दादासाहेब फाळके स्वीकारताना त्याला बघणे मला अशक्य झाले, इमारतीची ती पडझड बघवत नव्हती.) आमचे डोळे खळाळून रडले.

त्या अर्थाने रडविणारा हा पहिला विदूषक !

आम्ही साऱ्यांनी पुन्हा एकदा नियतीपुढे हरणारी करुणा भाकली. तरीही त्याच्या जाण्याने मनाचे सारे बांधकाम कोसळलेच.
राज- आता मागे उरल्या आहेत ‘तोहफा” टाईप कळश्या निर्विकार पडदा, रिकाम्या खूर्च्या आणि असे कितीतरी भारंभार विषण्ण लेख !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..