नवीन लेखन...

श्री. (ना)राज ठाकरे आणि पाडव्याचं भाषण

मी श्री. राज ठाकरेंचा चाहता आहे. त्यांचं कला प्रेम, त्यांचं व्यक्तीमत्व आणि वक्तृत्व मला मानापासून आवडतं. त्यांचं भाषण, त्यांनी घेतलेल्या मुलाखती मी आवर्जून बघतो. सध्याच्या राजकारणात त्याच्याकडून काही ठोस घडेल याची मला अपेक्षा होती. पण पाडव्याचं शिवाजी पार्कवर झालेलं श्री. राज ठाकरेंचं भाषण मी पाहीलं आणि माझ्या हाती निराशा लागली. या त्यांच्या भाषणातील काही मुद्द्यांबद्दल मला काय वाटतं ते मी या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

दि. ९ मार्च २००६ मधे झालेल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या स्थापनेनंतर लगेचंच २००९ साली झालेल्या झालेल्या विधानसभा निवडणूकांत, एकूण १३ आमदार निवडून आणत श्री. राज ठाकरेंच्या ‘मनसे’ने आपली दमदार एन्ट्री नोंदवली होती. या व्यतिरीक्त आणखी १३ जागांवर मनसेने क्रमांक दोनची मतं घेतली होती. त्यानंतर २०१२ साली झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकांत राज्यातील विविध महानगरपालिकांत मिळून मनसेचे ११२ नगरसेवक निवडून आले होते व नाशिक महानगरपालीकेत तर सत्ताही मिळाली होती. इतर पक्षांच्या राजकारणाला आणि त्याच त्याच चेहेऱ्यांना कंटाळून जनतेनेही मनसेवर विश्वास दाखवला होता. ‘मनसे’सारख्या एखाद्या नवख्या पक्षाला सुरुवातीसच मिळालेले हे यश निश्चितच लक्षणीय होतं.

मात्र मनसेला हे यश पचवता आलेलं नाही, हे आज १२ वर्षानंतर म्हणावं लागतं. याच एक महत्वाच कारण, कि या पक्षाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. निवडणुकांच्या काहीकाळ अगोदर हा निद्रिस्त ज्वालामुखी काही काल जागा होतो आणि निवडणुका संपल्यावर पुन्हा निद्रिस्त अवस्थेत जातो, हा अनुभव आहे. कार्यक्रमात सातत्य नसलेली संघटना किंवा पक्ष समाजकारणात किंवा राजकारणात जास्त काल तग धरू शकत नाहीत. श्री. राज ठाकरेंकडे करिष्मा आहे, त्यांचे अनेक चाहते आहेत परंतु त्यांच्या चाहत्यांच पक्षाच्या कार्यकर्त्यात रुपांतर करण्यात त्यांना सातत्याच्या अभावामुळे अपयश आलेलं लक्षात येतं. श्री. राज ठाकरे यांच्या वकुबाचा आणि करिष्म्याचा अन्य नेता मनसेकडे नाही आणि म्हणून मध्यंतरी श्री. राज ठाकरेंना त्यांच्या कौटुंबिक अडचणींमुळे पक्षाकडे लक्ष देता आलं नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीत पक्ष रोडावला.

परवाच्या पाडव्याच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी मनसेसाठी नसून श्री. राज ठाकरेंसाठी होती याविषयी कुणाचं दुमत असू नये. या सभेत पक्षाचा घसरणारा क्रमांक वर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्याना काहीतरी गृहपाठ देणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. नवनविन कल्पनांचं भांडार असलेले कल्पक राज ठाकरे, आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी हटके कार्यक्रम देऊन मरगळलेल्या कार्यकर्त्यांना सडसडून कामाला लावतील आणि त्यातून पक्षाला नवसंजीवनी देतील अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली. श्री. राज ठाकरेंच्या भाषणातून ऐकायला मिळाली ती फक्त टिका आणि टिकाच, ती ही इतर सर्व पक्ष करत असलेली आणि फारशी तथ्यांवर आधारीत नसलेली..

प्रथम ‘मनसे’ची स्थापना ज्या उद्दिष्टांसाठी झाली, ती उद्दिष्ट कितपत प्रभावी राहिलेली आहेत याचा विचार करणे मला गरजेचे वाटते. मराठी माणूस, मराठी भाषा आणि या दोघांचा उत्कर्ष हा मनसेचा पाया आहे. पण मला वाटते, हा मुद्दा आता तितकासा प्रभावी राहीलेला नाही. एक म्हणजे, मराठी माणसाचा टक्का आता मुंबईत बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि हे मराठीची हाली देत आपली पोळी भाजणाऱ्या शिवसेनेच्या काळातच झालेलं आहे. मनसेने ‘मराठी’ हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यामागे, याच मुद्द्यावर स्थापना झालेल्या शिवसेनेला शह देण्याचा उद्देश होता, असं म्हणता येईल. आणि मराठी भाषा तर सर्वपक्षीय नेत्यांसाहित सामान्य मराठी माणसालाहि नकोशी झालेली आहे. दुसरं म्हणजे, मराठी ही देशभरात एकमेंव अशी जमात असेल, की ती कधीही प्रांतीय विचार करत नाही. तात्पुरता करतही असेल, पण तीचा पिंड आहे कट्टर राष्ट्रीय. देशरक्षणार्थ सह्याद्री धावून गेल्याची उदाहरणं आहेत, विंध्य किंवा आरवली नव्हे. आपल्या गीतांतही ‘दिल्लीचे तख्त राखण्या’ची आन दिली गेली आहे. त्यामुळे केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा हा, सध्याच्या काळात, राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. श्री. राज ठाकरेंना आता आपला पाया अधिक व्यापक करण्याची गरज आहे.

आपल्या भाषणाची सुरुवात श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मुनगुंटीवारांच्या व्हिडीयोवर टिका करून केली. अर्थात हा व्हिडीयो मी पाहिलेला नसल्याने मला त्यावर बोलता येणार नाही. त्यांच्या भाषणातला दुसरा मुद्दा श्रीदेवीचा मृत्यू आणि तिच्या पार्थिवाला मिळालेला तिरंग्याचा सन्मान हा होता. श्रीदेवीला मृत्यू पश्चात निरंगा मिळायला नको होता हे माझंही मत आहे. आणि तिला तो मिळण्यामागे केंद्र किंवा राज्य सरकार कारणीभूत आहे, या मुद्द्यावर मी श्री. राज ठाकरेंशी सहमत आहे. अंत्यसंस्काराच्या दरम्यान राजकीय सन्मान, गणवेशातील सेवा आणि घटनात्मक पदावर असलेल्यांव्यतिरिक्त इतर कोणाला द्यावा हे ठरवण्याचे अधिकार सरकारला आहेत आणि श्रीदेवीच्या पार्थिवाला राजकीय सन्मान मिळण्यामागे सरकार चुकलं असं मलाही वाटतं. तरीही तिचा मृत्यू कसा झाला यावरचं भाष्य त्यांनी संकेत म्हणून टाळायला हवं होतं..

‘मेट्रो’ मार्गाच्या शेजारच्या इमारती परप्रांतीय वाट्ल त्या किंमती देऊन खरेदी करत आहेत, असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगीतलं. पण हे काय आजच होत नाहीय. गेली अनेक वर्ष हे काम चालू आहे. रस्ता किंवा रेल्वे किंवा मार्केटच्या जवळपासच्या जागा पूर्वीपासूनच भरमसाठ किंमतीला व्यापारी विकत घेत आहेत आणि गिरगांव-लालबागचा मराठी माणूस बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळतो म्हणून त्या विकून भाईंदर-विरार-कळवा-डोंबिवलीत स्वखुशीने जात आहे. गिरगांव-लालबागची जागा विकून मिळालेल्या पैशां पैकी निम्म्या पैशात डोंबिवली-विरारला फ्लॅट घेऊन उरलेले पैसे बॅंकेत व्याजाने ठेवण्याचा कार्यक्रम गेली ३०-३५ वर्ष जोरात सुरू आहे. या जागा मराठी लोक स्वखुशीने विकत होते आणि आहेत, त्यांच्यावर कोणी परप्रांतियाने जोर-जबरदस्ती केल्याचं एकीवात नाही. बळजबरीने जागा हडप केल्याचं वसई येथील आरे कोलानीतील आदिवासी जमिनींवर झालेल्या आक्रमणाचं उदाहरण श्री. राज ठाकरेंनी दिलं. अश्या काही घटना घडतही असतात आणि त्याविरुद्ध मनसे तीव्र आणि सनदशीर आंदोलन छेडेल अशी भूमिका कालच्या सभेत श्री. राज ठाकरेंनी घेतली असती, तर कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह संचारला असता अस्म मला वाटतं. मराठी माणसाने जागा विकू नये, जबरदस्ती झाल्यास मनसेकडे तक्रार करावी, मनसे सर्वतोपरी त्यांना मदत करेल आणि त्याने आहे त्याच जागी राहून स्वत:चा आर्थिक उत्कर्ष कसा साधावा, यासाठी मनसे सर्व सहाय्य करेल असं श्री. राज ठाकरेंनी सांगितलं असतं, तर ते अधिक संयुक्तिक झालं असतं.

‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे’ अशाच अर्थाचा आणखी एक मुद्दा. शिवसेनाही हा मुद्दा घेऊन निवडणूका लढवत असते. अहो पण, मुंबई काही केकचा तुकडा नव्हे, जी तोडून गुजरातला पळवतील. आणि मुळात पळवायची गरजच काय? मुबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीच्या ९० टक्के नाड्या गुजराती-मारवाड्यांच्याच हातात आहे. आणि या ९० टक्के गुजराती-मारवाडी शेठीयांकडे ७० टक्के मराठी माणूसच काम करतो. आणि हे चित्र काय आजचं नाही, तर ब्रिटीश काळ पासूनच आहे आणि त्यात आपल्या नाकावर टिच्चून उतरोत्तर वाढच होत गेली आहे. त्या अर्थाने मुंबई कधीच गुजरात्यांची झाली आहे, ती ही तुम्हा सर्व राजकारण्यांच्या साक्षीने( आणि कदाचित साथीनेही). भोगोलिक दृष्ट्या मुंबई महाराष्ट्राचीच राहील हा फक्त निवडणूकीचा पोकळ मुद्दा बनून राहीलाय. मुंबईच्या आर्थिक नाड्या मराठी माणसाच्या हातात राहतील यासाठी काय करावं, हे राज ठाकरे आणि इतर कोणताही मराठी माणसाचा पक्ष सांगत नाही. व्यापारी आस्थापनांवरील गुजराती पाट्या फोडून मुंबई महाराष्ट्रातच कशी काय राहाणार, हे ही राज ठाकरेंनी सांगायला हवं होतं..

परप्रांतीय आणि त्यांना रेशनकार्ड आदी मिळवून देणारे मराठी सरकारी अधिकारी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी घेतला. तो बहुतांशी खराही आहे. मात्र हे सरकारी अधिकारी आपला आणि परका असा भेद करत नाहीत, तर त्यांची बांधीलकी, त्यांच्या कार्यालयाच्या भिंतीवर टांगलेल्या गांधीजींची कॉपी असलेल्या कागदावरच्या ‘गांधीं’शी असते. हे सरकारी अधिकारी आपल्याच समाजात, आपल्याच शेजारी राहात असतात. त्यांच्या पैशांचा आणि शौकांचा स्त्रोत आपल्याला माहित असतो. वेळ प्रसंगी ते सार्वजनिक उत्सवांना किंवा मंडळांना किंवा पक्षानाही त्याच पैशांतून देणग्या/वर्गण्याही देत असतात आणि आपणही त्या आनंदाने घेत असतो. म्हणजे एका अर्थाने आपणही त्सांच्या पापाच्या पैशांचे वाटेकरी होत असतो. आपण म्हणजे त्यात सर्व आले, अगदी राजकीय पक्षही..! श्री. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात, आपल्या शेजारीच राहाणाऱ्या अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी आपल्या कार्यकर्त्यांनी कसा संबंध ठेवावा किंवा कसा संबंध ठेवू नये किंवा कसं वागावं किंवा कसं वागू नये, हे सांगीतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. अशा अधिकाऱ्यांची पुराव्यासकटची तक्रार सरकारच्या सक्षम खात्यात करण्याचा कार्यक्रम श्री. राज यांनी नववर्षाच्या मुहुर्तावर आपल्या कार्यकर्त्यांना दिला असता, तर मनसेच्या कार्यकर्त्यांलाठी तो एक मोठा समाजोपयोगी उपक्रम होऊ शकला असता. मनसेचं वेगळेपणही त्यातून दिसलं असतं आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेली जनता मनसेकडे आकृष्ट होऊ शकली असती..

मिडीया, न्यायव्यवस्था यावर असलेला सरकारी दबाव याचाही उल्लेख श्री. राज ठाकरेंनी केला. मिडिया नेमक्या कशा प्रकारे काम करते यावर पिटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या साक्षीतून हळू हळू बाहेर येतंच आहे. सध्याचा बहुसंख्य मिडिया ‘जागल्या’च काम करत नाही हे खरं आहे. परंतु त्याचं कारण सरकारी दबावापेक्षा, तो एक व्यवसाय झाला आहे आणि तो व्यवसाय काही मुठभर भांडवल शहांच्या हातात आहे, हे जास्त आहे. आणि व्यावसायिक सरकार विरोधी भूमिका अगदी क्वचितच घेतात. वर्तमानपत्र तर सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत आहे, त्यांच्यावर दबाव का नाही येत, हा प्रश्नही विचार करण्यासारखा आहे. पुन्हा श्री. राज ठाकरेंचं भाषण सर्वच मराठी वाहिन्यांनी थेट दाखवलं, त्याचं काय? वाहिन्या टीआरपीवर चालतात, टीआरपी मुळे त्यांना जाहिराती मिळतात आणि श्री. राज ठाकरेंचा टीआरपी सर्वोत्तम आहे. वाहिन्यांनी यातून केला तो व्यवसाय. बाकी समाज जागृती वैगेरे गोष्टींशी सध्याच्या मिडीयाचा काही संबंध उरलेला नाही.. न्यायाधीचांवर दबाव येतो असं त्या वार्ताहर परिषद घेणाऱ्या न्यायाधीशांनी कधीही म्हटलं नव्हत. तर त्यांचा वाद ज्युनियर आणि सिनियर न्यायाधीश आणि त्यांना चालवायला मिळणारे खटले यावर होता.

अक्षय कुमारचा मुद्दाही पोकळ होता. भले तो असेल परकीय नागरिक, पण त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाहीर आहेत आणि तो जे करतोय ते देशासाठी आवश्यकही आहे. अमिताभ बच्चनही गेली अनेक वर्ष गुजरातच्या टुरिझमला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या सरकारी जाहिराती करीत आहेत. सिने अभिनेत्यांचा भारतीय जनतेवर असलेला प्रभाव लक्षात घेऊन जनहिताचे असे संदेश चित्रपट/जाहिरातींद्वारे होत असतात, त्यात गैर काही नाही. अक्षय कुमार विदेशी नागरिक असून तो इथे राहून काही देश विघातक कार्यक्रम करत असेल, तर तो काळजीचा मुद्दा होता..

शेतकरी आत्महत्या, धर्म पाटील आत्महत्या इत्यादी मुद्देही राज ठाकरेंनी आपल्या भाषणात घेतले. पण यावर आपल्या पक्षाची भूमिका काय असेल ते सांगितलं नाही. सध्याचे मुख्यमंत्री बसवलेले असून ते स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झालेले नाहीत असं श्री. राज ठाकरे म्हणाले. यात त्यांनी काही वेगळं असं सांगितलेलं नाही. उद्या मनसेची सत्ता आली तरी श्री. राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख या नात्याने ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल. पक्षीय लोकसाहित हे असाच होत असतं. कॉंग्रेसमध्ये तरी वेगळं काय व्हायचं. बाबासाहेब भोसले यांना स्वतःलाहि कधी मुख्यमंत्री होऊ अस्म वाटलं नसणार, पण झाले कारण पक्ष प्रमुखाची मर्जी. शिवसेनेनेही तेच केलं. लोकांना हवा तो मुख्यमंत्री अद्याप महाराष्टात कशाला, देशातही जन्माला यायचा आहे..

परप्रांतीयांचा मुद्दाही असाच. हो मुद्दा रोजगाराशी निगडीत आहे. परप्रांतीय गाड्या भरभरून मुंबई किंवा महाराष्ट्रात येतात, ते रोजगारासाठी, त्यांना रोजगार नाही असं झालेलं दिसत नाही आणि मराठी तरुणांना रोजगार नाही, हे थोडं विचित्र वाटतं. मला वाटतं रोजगाराशी सांगड नोकरीशी घातल्याने हा गोंधळ होतोय. परप्रांतीय इथे येतात, पडेल ते काम करतात, त्यातून रोजगार कमावतात. मराठी तरूण मात्र नोकरी नसल्यामुळे बेरोजगार. वास्तविक राज ठाकरेंनी मराठी तरुणांना नोकरी बरोबरच लहान-मोठा व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करायला हवं होतं. या किरकोळ वाटणाऱ्या व्यवसायात किती मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो याची दोन उदाहरण देतो. चर्चगेट स्टेशनवर बसणारा एक बुट पाॅलिशवाला दिवसाला ५००-६०० लोकांच्या बुचांना पाॅलिश करतो व एका पाॅलिशचे १० रुपयांप्रमाणे ५ ते ६००० रुपयांचा गल्ला जमा करतो. चर्चगेटचा फुटफाॅल ५.५ ते ६ लाख प्रवासी रोज असा आहे. बोरीवलीच्या गोयल शाॅपिंग सेंटरच्या बाहेरचा चहावाला दिवसाला कमीतकमी १००० चहा विकतो. एका चहाचे ७ रुपये प्रमाणे ७००० कमावतो. कदाचित जास्तही असतील. मराठी तरुणांना कल्पना आहे किंवा कसं याची मला माहित नाही. याचप्रमाणे चणेवाला, फुगेवाला, भाजीवाला, पकोडेवाला आणि असेच किरकोळ व्यवसाय करून परप्रांतीय रोजगार कमावतात आणि आम्ही रोजगार नाही म्हणून रडतोय. ‘तरुणांनो, कोणतही काम करण्यास तयार व्हा, मनसे तुमच्या पाठीशी आहे’ असं सांगितलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. परप्रांतीय मिळेल त्या जागेवर अधिकृत कमी आणि अनाध्कृत जास्त असे व्यवसाय करतात आणि मराठी अधिकारीच त्यांना चिरीमिरीसाठी मदत करतात. मग हेच मराठी अधिकारी मराठी तरुणांना मदत करणार नाहीत असं होणार नाही, कारण या अधिकाऱ्यांची बांधिलकी फक्त पैशांची असते. त्यांचा हप्ता दिला कि ते कुणालाही मदत करतात असाच चित्र आपल्यासमोर आहे आणि श्री. राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात ते सांगितलं आहे. नोकरीसारखेच इतरही श्रम सारख्याच प्रतिष्ठेचे असतात हे मराठी तरुणांना श्री. राज ठाकरे यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याने सांगितल्यास तरुण ते नक्की ऐकतील..

‘राफेल’ विमानाचा मुद्दा असाच अभ्यास न करता मांडलेला होता. ‘राफेल’चा व्यवहार यूपीएच्या काळात झालेला होता. विद्यमान सरकारने त्यात काही दुरुस्ती सुचवल्या आणि किमतीही कमी करून घेतल्या. हि सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. उलट राज ठाकरेंनी त्यान मिळालेली माहिती कुठून प्राप्त झाली ते सांगितलं असतम, तर ती माहिती तपासून पहाता आली असती..श्री. नितीन गडकरींचा मुद्दा पटला नाही. नितीन गडकरींची अलीकडची काही भाषण किंवा मुलाखती मी गेल्या दोन दिवसांत यु ट्यूबवर मुद्दाम पहिल्या. श्री. राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे गडकरी खरच हजारो आणि लाखो करोडोंच्याखाली बोलत नाहीत. वरवर हे ऐकताना मलाही खटकत. पण बारकाईने ऐकल्यास गडकरी त्यांना लागणारा पैसा कसा उभा करतात ते हि सांगतात. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे किंवा मुंबईतील उड्डाणपूल सरकारकडे पैसे नसताना त्यांनी कसे बांधले, ते ही ते सांगतात. बाकी मेक इन इंडिया, ५६ हजार विहिरी, गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या, माहित असलेल्या जातीय आणि धार्मिक दंगली, मोदींच जगभरात फिरणं, नाणार रिफायनरी यावर अधिक लिहिताही येईल. परंतु यातील सर्वच मुद्द्यांची मला सखोल माहिती नाही, तसेच सर्व मुद्द्यांवर लिहायला गेलो, तर लेख बराच मोठा होईल म्हणून इथेच थांबतो.

श्री. राज ठाकरे आपल्या भाषणातून समोर जमलेल्या त्यांच्या अनुयायांना आणि चाहत्यांना २०१९ साली होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काही कार्यक्रम देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी स्वतःच्या पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी असेल ते न सांगता, केवळ केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. सर्व विरोधी पक्षांनी हे सरकार बदलण्यासाठी एक येण्याचं आवाहनही केल. एक राजकीय पक्ष म्हणून त्यांना तो अधिकारही आहे. परंतु सध्याच्या विरोधी पक्षांनी आपली पत आणि जनातेताला त्यांच्याविषयीचा विश्वास पूर्णपणे गमावलेला आहे. भाजप सोडून बाकीचे इतर सर्व पक्ष खाजगी कुटुंबाची मालमत्ता झालेली आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली त्यांचा व्यवसाय चालू आहे. सध्याच्या सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल जनतेत वाद असू शकतील, मात्र या सरकारच्या क्षमतेबद्दल आणि सचोटीबद्दल वाद असण्याच कोणताही सबळ कारण दिसत नसताना आणि नव्याने करण्यात येत असलेल्या आघाडीचे नेतृत्व कोण करणार यावर भलमोठं प्रश्न चिन्ह असताना, जनता या आघाडीला थारा देईल अशी सुतराम शक्यता नाही. लालू, मुलायम, राहुल गांधी, ममता बनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा स्वतः राज ठाकरे सारख्या नेत्यांच्या भाषणातून, त्यांचे त्यांचे कार्यकर्ते वगळता, इतर लोक किंवा मतदार आपली मतं बनवतात असं जर हल्लीच्या कुणाला वाटत असेल, तर ते काळाच्या बरेच मागे आहेत असं म्हणावं लागेल. तंत्रज्ञानाच्या झालेल्या विस्फोटामुळे सर्व खरी खोटी माहिती हातातल्या मोबाईलवर सहज उपलब्ध असते आणि माझ्यासारखे लोक त्या माहितीची शहानिशा वेळोवेळी करत असतात आणि त्यवर आपलं मत कोणाला द्यायचं ते ठरवत असतात.

मनसेकडे प्रचंड ताकद आहे. तरुण कार्यकर्तेही आहेत. श्री. राज ठाकरेंचा करिश्माही आहे. असं असतना, श्री. राज ठाकरे यांनी या सर्व गोष्टींचा उपयोग करून समोर जमलेल्या लाखो श्रोत्यांना चेत्वेल, जनतेत काही कार्यक्रम घेऊन जाण्यास उद्युक्त करेल असं काहीतरी राज ठाकरे सांगतील अस वाटत होत, पण तसं झालं नाही. नेहेमीप्रमाणे श्री. राज ठाकरे समोरच्या सभेशी किंवा टेलिव्हिजनवर त्याचं भाषण ऐकणाऱ्या माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांशी रिलेट झाल्यासारखे वाटले नाहीत. मुळात कालच भाषण राज ठाकरे याचं होत अस वाटलंच नाही. सरकारवर नाराज असलेले आणि तिसऱ्या आघाडीतील असंतुष्ट आणि स्वार्थी नेत्यांच्या आघाडीत सामील होऊ पाहण्रे राज ठाकरे मला अपेक्षित नव्हते..मला ते ‘नाराज’ वाटले. का आणि कशासाठी ते मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय..

— © नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..