स्व. दिनकर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी आज हयात नाहीत तरी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या त्यांच्याच कवितेच्या ओळी त्यांची आठवण कायम ताजी तवानी ठेवतात.
“विसर मला पण न विसर ही येथील अमर कला,
धुंद करील गतकालीन शिल्प इथे सहज तुला…”
गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी आज या दुनियेत नसले तरी त्यांनी उभारलेल्या राजा केळकर संग्रहालयातील प्रत्येक ऐतिहासिक वस्तूतून त्यांच्या अचाट परिश्रमाचे मोल चिरंतनमनात गर्दी करते. राजाश्रयाशिवाय केवळ एक व्यक्ती असा अफाट संग्रह उभा करू शकतो हे केळकरांनी सर्व जगाला दाखवून दिले.
आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना डॉ. केळकरांची शोधक दृष्टी मात्र गतकाळाचा वेध घेत होती. जुन्या सरदार घराण्यातील नाना वस्तू जमवण्याचा त्यांना छंदच जडला. मराठेशाहीतील एक प्रसंग या आपल्या कवितेत या अज्ञातवासींनी लिहून ठेवले होते की’ लाख होन खर्चूनी बांधिला रायांनी वाडा… अजून कुणाची द्यावयास वेढा’. त्यांची स्वतःचीही स्थिती ‘लाख क्षण वेचुनी उभारला केळकर संग्रहाचा डोळे दिपवून टाकणारा वाडा ‘ अशी होती.
अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या असा केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरुड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.
क्रौंचाच्या मृत्यूतून रामायण निर्माण झाले तर केळकरांचा मुलगा राजा याच्या मृत्यूतून संग्रहालयालाचे महाकाव्य जन्माला आले. त्यांनी संग्रहालयाला राजाचेच नाव दिले. हे संग्रहालय जुन्या वस्तूंचा मांडलेला नवा बाजार असून ते सुंदर काव्यच वाटते. पंधरा ते वीस हजार वस्तूंचे हे देखणे संग्रहालय पाहताना केळकरांनी त्यासाठी किती वणवण केली, सारा देश कसा पायथा घातला ते आठवत राहते.
१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. केळकरांनी कधीच पैशाची पर्वा केली नाही. या छंदासाठी त्यांनी पत्नीचे दागिने विकले, एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. हातधुलाईचे धोतर आणि तसाच झब्बा घालून काका केळकर संग्रहालयातून फिरू लागले की त्या गतवैभवाचे तेज त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या वाणीतून प्रकटू लागे.
कै. राम गणेश गडकरी हे त्यांचे गुरू होते. अज्ञातवासी नावाने ते कवी म्हणूने ख्यातनाम झाले आणि जे न देखे रवी ते अशी दृष्टी लाभलेल्या अज्ञातवासीनी अज्ञात इतिहासाच्या देशभरातील असंख्य गुहा ढुंडाळून चीजवस्तू जमवल्या. त्याच्यांतल्या कवी आणि त्यांच्यातला संग्राहक यांचा सुंदर मिलाफ संग्रहातील दिसतो आणि ऐतिहासिक वस्तूंबद्दलच्या प्रेमाच्या सामाजिक प्रगल्भतेचा वेगळा आविष्कार जाणवतो.
राजा दिनकर केळकर संग्रहालयातील प्रत्येक वस्तू प्रेरणादायक आहे. तुमच्या कामातील कौशल्य दाखवा, असे आव्हान त्या वस्तू तरुण पिढीला करत आहेततसेच संग्रहालय टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नेहमी सांगतात.
श्री बाबासाहेब पुरंदरे सांगतात की, संस्कृती आणि कला जपण्याची पुण्याची परंपरा आहे. मुलांमध्ये संस्कृती विषयक आवड निर्माण होण्यासाठी शालेय जीवनात प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर विविध संग्रहालये, ऐतिहासिक वस्तू दाखवून त्यांच्याबद्दल आवड निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय तरुण पिढीतूनही नवीन चित्रकार, शिल्पकार घडणार नाहीत.
केळकर संग्रहालयात सौंदर्याचा अद्भूत खजिना आहे. एकट्या काकासाहेब केळकर यांनी आतोनात प्रयत्नातून हे संग्रहालय उभे केले आहे. हे जतन करून त्याची किंमत वाढवली पाहिजे. केवळ देशातच नव्हे, तर जगभर या संग्रहालयाचे महत्त्व वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर करतात.
— जगदीश पटवर्धन, बोरीवली (प.)
Leave a Reply