नवीन लेखन...

राजकीय पक्ष आणि माध्यमांचा बेजबाबदारपणा

देशाच्या सुरक्षेशी घातक खेळ

धोकादायक आरोप
गुजरातमधील पोरबंदर समुद्र किनार्यालगत एका स्फोटकांनी भरलेल्या नौकेचा तटरक्षकदलाने पाठलाग केला आणि ती बोट रोखली. त्यानंतर या बोटीचा स्फोट झाला आणि ती समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये चार जण होते.हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी आणि राजकीय पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या जहाजामध्ये दहशतवादी नसून ते तस्कर किंवा स्मग्लर होते. ते दहशतवादी असल्याचे घोषित करून सरकार स्वत:चे कौतुक करून घेत आहे असे या वृत्तपत्रांचे आणि राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर, या जहाजामधील लोकांची नावे का जाहीर केली नाहीत, कोणत्या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता, त्यांचा भारतीय हद्दीत येण्याचा उद्देश काय होता असे सवाल विचारण्यास त्यांनी सुरुवात केली. हे कमी की काय म्हणून, काही माध्यमांनी आम्ही पाकिस्तानशी बोललो आहोत आणि त्यांनी अशा प्रकारची नौका पाठवल्याचा इन्कार केला आहे असेही सांगितले. याशिवाय, काही जणांनी या पूर्ण घटनेबाबतच संशय व्यक्त करत झालेल्या घटनेविषयी गुजरात किनार्‍यावरील पोलिस अनभिज्ञ होते, तसेच भारतीय नौदलालाही या ऑपरेशन विषयी माहिती नव्हती असे म्हटले आहे. ही बुडालेली नौका खोटी असावी आणि सरकार उगीचच पाकिस्तानविषयी खोटे आरोप करते आहे, तसे आरोप करण्यापूर्वी या बोटीत दहशतवादी होते हे सिद्ध करण्याची गरज आहे, असे या सर्वांना म्हणावयाचे आहे. हा सर्व प्रकार अतिशय धोकादायक, चिंताजनक आणि अयोग्य आहे. किंबहुना, जी भूमिका पाकिस्तानकडून मांडली गेली असती तीच भूमिका ही मंडळी मांडत आहेत.

एकजुटीची गरज
पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि इतर सर्व राजकीय पक्ष यांनी माध्यमांपुढे येऊन आम्ही एकत्र दहशतवादाचा मुकाबला करु असे सांगितले. मात्र भारतामध्ये याउलट काही राजकीय पक्ष आणि माध्यमे ही कोस्टगार्ड, गुप्तचर यंत्रणा आणि एनटीआरओ (नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन) यांनी सांगितलेली माहिती ही चुकीची आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशाच्या सुरक्षिततेपुढे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचे आणि सीमेवरील गोळीबाराचे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाने एकजुटीने, एकत्रित येऊन, पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज आहे. मात्र त्याऐवजी वृत्तवाहिन्यांवरून परस्परांशी भांडण्याचे आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे, सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे काढण्याचा उद्योग काही जण करत आहेत, जे अतिशय निंदनीय आहे.

सुरक्षितते पुढे प्रचंड आव्हान
२०१४ मध्ये एलओसीवर ५५० हून अधिक वेळा गोळीबार झाला आहे. काश्मीर सीमेवर १२० हून जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. देशामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत, तसेच काही हल्ल्यांचे कट उधळून लावले आहेत. इसिसचे ट्विटर खाते हाताळणारा तरुण आपल्या देशामध्ये पकडला गेलेला आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत. या सर्व घटना घडत असतानाही पाकिस्तान हा एक चांगला देश आहे, त्यावर काही आरोप करण्यापूर्वी आपल्याकडे पुरावा असणे आवश्यक आहे, अशा आशयाची विधाने होत आहेत. अशा प्रकारच्या बातम्या, चर्चा पाहून आपल्या सैन्याच्या, सुरक्षा यंत्रणांच्या जवानांचे मनोबल खचणार नाही का, याचा जराही विचार ही मंडळी करत नाहीत.

पोरबंदर प्रकरणीच्या प्रश्नांची उत्तरे
पोरबंदरमधील या बहुचर्चित बनलेल्या बोटीच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो. बोटीमधील स्फोटक पदार्थ पकडणे अतिशय कठीण काम असते. कारण अशा प्रकारची बोट समुद्रात थांबवली जाते तेव्हा त्यामध्ये असणारे कर्मचारी त्यांच्याकडील बंदुका, रायफली, स्फोटक पदार्थ तिथूनच समुद्रात फेकून देतात. परिणामी, अशी बोट पकडली गेली तरी त्यामध्ये काहीही नसल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारच्या बोटी या पूर्णपणे स्फोटकांनी वा अवैध हत्यारांनी भरलेल्या नसतात. त्यामध्ये मासे, डिझेल किंवा इतर गोष्टींचा समावेश अधिक असतो आणि बोटीच्या गुप्तभागामध्ये थोडी स्फोटके दडवली जातात.त्यामुळेच केवळ तस्करी करणारे म्हणजे तस्कर आणि दहशतवादी वेगळे अशा प्रकारचा भेदभाव आपल्याला करता येणार नाही. आजकाल अनेक तस्कर अफू, गांजा, चरस, स्फोटक पदार्थ आणि रायफली यांची तस्करी करतात.

ज्यावेळस अशा प्रकारची ऑपरेशन्स होतात तेव्हा ती पूर्णपणे गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. कारण माध्यमांमधून अशा प्रकारचे वृत्त प्रसारित झाल्यास लढण्याच्या डावपेचांमध्ये कमजोरी निर्माण होण्याची भीती असते. गोपनीयतेच्या दृष्टिकोनातूनच कोस्ट गार्डनी या कारवाईबाबतची माहिती नौदलाला, गुजरातच्या किंवा इतर पोलीसांना दिली नसेल तर त्यात गैर काही नाही.

या बोटीबाबतची माहिती अमेरिकन गुप्तहेर संस्था व एनटीआरओ या संस्थेने दिली होती. त्यानुसार, त्यांनी काही संभाषणेही टेप केली होती. त्या संभाषणांमधून अशा प्रकारच्या एका बोटीमधून काही स्फोटके आणि सामग्री वाहून नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसारच तटरक्षक दलाने २४ तास ऑपरेशन करून या बोटीला पकडले. त्यामुळेच या कारवाईबाबत गैर झाले नाही.

असे असतानाही पाकिस्तानने ही बोट त्यांची असल्याचा इन्कार केल्याची बातमी काही माध्यमांनी समोर आणली. ही बोट पाकिस्तानच्या केटी बंदरातून निघालेली होती. त्या बोटीवर असणार्‍या कॅप्टनच्या आईनेही याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. पाकिस्ताननेही ही बोट तस्करी करण्याकरिता वापरली जात होती, हे मान्य केले आहे.

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी आणण्यात दारुगोळा हा तस्करांकरवी समुद्रमार्गातूनच आणण्यात आला होता. बरेचदा गुन्हे करणारे गुन्हेगारही काही दहशतवादी कृत्यामध्ये भाग घेतात. दाऊद इब्राहिमनेही अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांसाठी अशा गुन्हेगारांची मदत घेतली होती. त्यामुळेच तस्कर आहे म्हणून सोडून द्यावे असे धोरण चालणार नाही. ही बाब राजकीय पक्षांनी आणि संबंधित माध्यमांनी लक्षात घ्यायला हवी. तस्कर आणि दहशतवादी वेगवेगळे आहेत असे सांगणे चुकीचे आहे.

माध्यमांचा उथळपणा आणि बेजबाबदारपणा
आपल्याकडे २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी बरीच चर्चा झाली होती, परंतु तरीही त्यातून काही बोध घेतला गेला नसल्याचे दिसते. अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा दलाने २६/११ च्या हल्ल्याबाबतची काही माहिती प्रकाशित केली आहे. त्यातून मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या मृत्यूबाबतचे सत्य समोर आले आहे. उन्नीकृष्णन हे हल्ला करण्यासाठी येत असल्याची माहिती वरच्या मजल्यावर लपलेल्या दहशतवाद्यांना वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आधीच मिळाली होती. त्यामुळेच त्यांचा घात झाला आणि त्यातच उन्नीकृष्णन यांचा मृत्यू झाला. माध्यमांमधील काही जणांच्या बेफिकीरीची इतकी मोठी किंमत देशाला मोजावी लागू शकते, हे यातून स्पष्ट होते. सरकार अशा प्रकारच्या थेट प्रक्षेपणावर बंदी आणण्याचा विचार करत आहे आणि ते योग्यही आहे.

पोरबंदरच्या प्रकरणानंतर ज्याप्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला जात आहे आणि वाहिन्यांवरून ज्याप्रकारे चर्चा केली जात आहे, विधाने केली जात आहेत, त्या वाचताना-पाहताना अनेक प्रश्न उपस्थित होतात प्रत्येक गोष्टी कायद्याच्या आधारे सिद्ध करण्यासाठी घाई कशाला हवी ? आपल्या सुरक्षा यंत्रणांवर आपण विश्वास ठेवणार आहोत की नाही? ? की आपला पाकिस्तानहून आलेल्या बातमीवर अधिक विश्वास आहे ? आणि जर तसा असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे शत्रूराष्ट्राच्या बाजूने झुकणार्‍यावर आणि त्यांची भलामण करणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटले दाखल करण्याची गरज आहे.

पाकिस्तानने आपल्या देशात कितीवेळा हिंसाचार केलेला आहे आणि किती वर्षांपासून केलेला आहे हे जगजाहीर आहे. तरीही अनेक पाकिस्तानीप्रेमी तज्ज्ञ अशा घटनांदरम्यान सामान्य लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचे काम का करताना दिसतात ? जर ही बोट स्फोटक पदार्थ घेऊन जाण्याऐवजी केवळ तस्करी करीत होती असे मानले तरीही अशा प्रत्येक घटनेचे भारताच्या सरंक्षण विभागामध्ये विश्लेषण केले जाते आणि संबंधित व्यक्तीची वा यंत्रणेची चौकशी करून दोषी असणार्‍यांना शिक्षा दिली जाते.२६/११ च्या हल्ल्यानंतरही प्रधान कमिटीने अनेक चुका समोर आणल्या होत्या. त्यावेळच्या सरकारने या चुकांकडे दुर्लक्ष केले हा भाग वेगळा! पण अशा कारवायांदरम्यान घडणार्‍या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबाबत निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा देशात अस्तित्त्वात असताना माध्यमांना त्या घटनेचा ऊहापोह करून देशाच्या सर्व सुरक्षा यंत्रणांना, गुप्तचर यंत्रणांना, तटरक्षक दलाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची घाई आणि गरजच काय आहे? आपल्याकडे, दहशतवादी हल्ला झाला, माओवादी हल्ला झाला की त्याचा उपयोग भारतीय सुरक्षा व्यवस्थांना बदनाम करण्यासाठी केला जातो. तो अत्यंत चुकीचा आहे.

अशा प्रकारच्या लढाईबाबत किंवा एन्काऊंटर मोहिमेबाबत जर कोणाला शंका असेल तर त्यांनी सरकारशी याबाबत गुप्त संवाद साधावा, पत्रव्यवहार करावा. पण देशाच्या सुरक्षेशी संबंधित अशा गोष्टींचे विश्लेषण वाहिन्यांवर करणे वा वर्तमान पत्रांमध्ये चर्चा करून समोर आणणे हे चुकीचे आहे. कोणत्याही लढाईचा कोणताही भाग चर्चेमध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता नाही. गरज वाटल्यास त्याचे विश्लेषण हे फक्त सरकारी पातळीवरच गुप्तपणे झाले पाहिजे.

प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा माध्यम प्रतिनिधी तेथे उपस्थित नव्हते. माध्यमांनी नौदल, पोलिस अधिकार्‍यांकडून अनधिकृतरित्या माहिती मिळवली.सरकारचे काही अधिकारी जर अशा प्रकारची माहिती फोडून माध्यमांना पुरवत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे. अशा महत्त्वाच्या घटनेनंतर संपूर्ण देशाने एकत्र येण्याची आणि सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन बातमी देण्याची गरज असते. तसे न करता, आपल्याच सुरक्षा यंत्रणांवर, पोलिस दलावर, तटरक्षीय दलावर आरोप करून, त्यांच्या कारवाई भोवती संशयाचे वलय निर्माण करून आपण अप्रत्यक्षपणे पाकिस्तानलाच मदत करतो आहोत. काही माध्यमांच्या आणि काही राजकारण्यांच्या या घातकी खेळामुळे पाकिस्तानला पाठबळ दिले जात आहे. त्याचबरोबर देशातील नागरिकांमध्येही अकारण गैरसमज पसरवण्याचे काम होत आहे. आगामी काळातील सुरक्षेसंदर्भातील वाढते धोके लक्षात घेऊन माध्यमे, राजकीय पक्ष आणि सर्वांनीच जबाबदारीचे भान, तारतम्य बाळगण्याची अतिशय गरज आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..