नवीन लेखन...

राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर

महाराष्ट्रातील फलटण संस्थानचे शेवटचे राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९६ रोजी झाला.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात ऐतिहासिक जहागिरदार घराण्यांत फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचे स्थान महत्त्वाचे होते. या घराण्याची राजकीय सत्ता जवळजवळ सातशे वर्षे अबाधित होती. चौऱ्याऐंशी गावांचे हे संस्थान आकाराने लहान असले, तरी मानाने फार मोठे होते. मालोजीराजे उर्फ नानासाहेब यांचा जन्म गणेश चतुर्थीला त्यांच्या आजोळी निभोरे (ता. फलटण) गावी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण होते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथराव नाईक निंबाळकर होते, तर आईचे नाव सीतादेवी. फलटणचे संस्थानाधिपती मुधोजीराजे उर्फ बापूसाहेब महाराज यांनी नारायण या अवघ्या चार वर्षांच्या मुलास दत्तक घेतले (१८ डिसेंबर १८९९) आणि त्याचे नामकरण मालोजीराजे असे करण्यात आले. मुधोजीराजे मालोजीराजांचे दत्तक पिता आणि आनंदीबाई राणीसाहेब त्यांच्या दत्तक मातोश्री होत्या.

मालोजीराजे यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथे मुधोजी हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि संस्कृततज्ज्ञ गोपाळ रघुनाथ भिडे यांच्याकडे सरकारी वाड्यातच झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूरला कँडीसाहेबांच्या सरदार हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांना राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून प्रशासनाचे धडे मिळाले. मालोजीराजे यांचा विवाह माळेगावचे जहागिरदार राजे शंभुसिंह जाधवराव यांची तृतीय कन्या आबईसाहेब यांच्याशी १८ डिसेंबर १९१३ रोजी झाला. लग्नानंतर मालोजीराजेंच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. त्या दांपत्यास सरोजिनी ही एक कन्या आणि प्रतापसिंह, विजयसिंह, उदयसिंह व विक्रमसिंह हे चार पुत्र अशी पाच अपत्ये झाली. नोव्हेंबर १९१७ मध्ये मालोजीराजांचा वयाच्या एकविसाव्या वर्षी राज्याभिषेक होऊन फलटण संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे दिवाळी पाडव्याच्या दिवशी त्यांच्या हाती सोपविण्यात आली.

कायम दुष्काळ प्रवण प्रदेशातील बाणगंगा आणि माणगंगा नद्यांच्या खोऱ्यात फलटण संस्थान वसले होते. त्यामुळे संस्थानची प्रजा आणि राज्यकर्ते यांना नेहमी बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. मालोजीराजे यांनी आपल्या कारकिर्दीत संस्थानात विविधांगी सुधारणा घडवून आणल्या. त्यांचा कारभार जातिनिरपेक्षपणे चालत असे. राज्यकारभारात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. दुसऱ्या महायुद्धकाळात देशात भयंकर धान्यटंचाई निर्माण झाली असताना त्यांनी आपल्या संस्थानात एकही भूकबळी होऊ दिला नाही. त्यांनी आपल्या संस्थानात कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली. आपल्या राजवाड्याशेजारी सर्व जातीजमातींच्या मुलांसाठी एक वसतिगृह सुरू केले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश, पडदा पद्धत बंद, सक्तीचे शिक्षण, आंतरजातीय विवाहाला मान्यता हे त्यांचे निर्णय तत्कालीन परिस्थितीत क्रांतिकारक होते.

मालोजीराजे यांनी आपल्या रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या संस्थानात सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. त्यासाठी संस्थानात सहकारी पतपेढी व सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. १९१८ साली दि फलटण बँक लिमिटेडची स्थापना करण्यात आली, तसेच १९२६ साली श्री लक्ष्मी सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक स्थापन केली. सहकारी संस्थांमुळे संस्थानातील शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यांना पतपुरवठा होऊ लागला.

दुष्काळी प्रदेशात शेतीला पाणी मिळवून देणे ही अतिशय जटील समस्या असते. फलटण संस्थानातील या समस्येचे काही प्रमाणात निराकरण करण्यात मालोजीराजे यशस्वी ठरले. त्यांनी १९२५ पासून भाटगर धरणातील नीरा उजव्या कालव्याचे पाणी फलटण संस्थानातील अनेक गावांना मिळवून दिले. त्यामुळे संस्थानातील एक चतुर्थांश शेतजमीन बागायती बनली. फलटण संस्थानात ऊस या नगदी पिकाचे उत्पादन होऊ लागले आणि ऊस शेतीचे क्षेत्र वाढले. १९३१ साली मालोजीराजेंनी पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र सुरू केले. त्यानंतर त्यांनी श्रीमान शेठ मफतलाल व आपटे यांच्याशी वाटाघाटी करून व त्यांना सवलत देऊन, मदत करून १९३३ साली आपल्या संस्थानात साखरवाडी येथे फलटण शुगर वर्क्स लि. या नावाचा साखर कारखाना काढला.

मालोजीराजे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी सुधारणांचा कारभार पहिला होता. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानात १९१८ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा पास केला आणि त्याची प्रथम फलटण नगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. मालोजीराजेंनी स्त्रीशिक्षण प्रसारास चालना दिली व मुलींना विशेष सवलती दिल्या. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था, संशोधनसंस्था यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला सातारा येथील आपला बंगला, साडेदहा एकर जमीन आणि पाच हजार रुपयांची देणगी देऊन त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याला मदत केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना फलटण संस्थानामार्फत तहयात सहाशे रुपयांचे वर्षासन सुरू केले होते. १९४१ मध्ये बनारस विश्वविद्यालयाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या फलटण भेटीच्या वेळी त्यांच्या बनारस विश्वविद्यालयाच्या विकासकार्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली. मालोजीराजे विद्वानांचे व गुणीजनांचे चाहते होते. त्यांनी प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व शिवचरित्रकार सर जदुनाथ सरकार, डॉ. राधाकृष्णन, श्री विश्वेश्वरय्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी आण्णासाहेब कर्वे, साहित्यसम्राट न. चि. केळकर इत्यादी ख्यातनाम व्यक्तींना फलटणला आणले. त्यामुळे त्यांना पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी फलटणच्या जनतेला लाभली. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावी राजमाता जिजाबाई यांच्या भग्नावस्थेत असलेल्या समाधीचा मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केला.

१९३१ ते १९३९ या कालावधीत मालोजीराजेंनी सातारा गट संस्थानिकांचा प्रतिनिधी या नात्याने नरेंद्र मंडळावर काम केले. १९३३ च्या मे महिन्यात भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. देशातील राजकीय बदलांची दिशा ओळखून पावले टाकण्याची राजकीय दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. संस्थांनी राज्यकारभाराचे लोकशाहीकरण आणि संस्थानाचे अस्तित्व राखण्यासाठी लहान लहान संस्थानांचा गट करून त्यांच्या संघराज्याची निर्मिती या दोन उद्दिष्टांची परिपूर्ती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.

१९२८ मध्ये मालोजीराजेंनी आपल्या ३२ व्या जन्मदिनी जबाबदार राज्यपद्धती हे आपल्या कारभाराचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर केले. १९२९ च्या गणेश चतुर्थीला फलटण संस्थान कायदेमंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच वेळी माधव संभाजी अहिवळे या मागासवर्गीय गृहस्थाची कायदेमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४२ पर्यंत अनेक सवलती देऊन फलटण लोकसभा, लोकल बोर्ड, नगरपालिका या संस्थांमध्ये लोकनियुक्त सभासदांना प्रतिनिधित्व व अधिकार देण्यात आले. १९४२ चा फलटण संस्थान कायदेमंडळाचा कायदा अत्यंत महत्त्वाचा होता. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार संस्थानच्या कायदेमंडळातील सदस्यांपैकी १२ लोकनियुक्त व ६ दरबार नियुक्त राहणार होते. लोकनियुक्त १२ सदस्यांमधून दोन मंत्री नेमण्याची तरतूद होती.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रातील आठ दक्षिणी संस्थानांचा गट बनवून संघराज्य स्थापन करण्यात मालोजीराजांनी पुढाकार घेतला होता; परंतु जनमत संघराज्य स्थापनेच्या विरोधी असल्यामुळे दक्षिणी संस्थानांच्या संघराज्याचा प्रयोग अयशस्वी झाला. ८ मार्च १९४८ ला कोल्हापूर संस्थान सोडून बाकी सर्व दक्षिणी संस्थाने मुंबई राज्यात विलीन करण्यात आली. फलटण संस्थान आपल्या खजिन्यातील पासष्ट लाख रुपये शिल्लक रकमेसह मुंबई राज्यात विलीन झाले.

१९४९ साली अनपेक्षितपणे मालोजीराजे यांचा बाळासाहेब खेर यांच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून समावेश झाला. मंत्रीपदाचा स्वीकार केल्यानंतर सहा महिन्यांनी ते काँग्रेस पक्षाचे सभासद झाले. १९४९-५२ या काळात ते सहकार खात्याचे मंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने काढण्यास प्रोस्ताहन दिले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मालोजीराजे फलटण मतदारसंघातून मुंबई प्रांतिक विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९५२ ते १९५७ या काळात ते मोरारजी देसाई यांच्या मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या नानाविध कामांपैकी महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना धरण प्रकल्पाचा आराखडा व कार्यारंभ आणि मुंबईतील मंत्रालयाच्या सहा मजली भव्य, प्रशस्त इमारत ही दोन कामे संस्मरणीय आहेत.

१९५७ च्या निवडणुकीत फलटण मतदारसंघातून मालोजीराजे पराभूत झाले. त्यानंतर १९५७ ते ६२ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामुळे त्यांना आव्हानात्मक परिस्थितीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करावे लागले. त्यांनी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून मे १९५७ मध्ये विशाल सह्याद्री हे दैनिक सुरू केले. तसेच प्रतापगडावर छ. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला आणि त्याचे अनावरण ३० नोव्हेंबर १९५७ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या शुभ हस्ते करविले.

मालोजीराजे यांनी फलटण येथे श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. पुढे १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणातून बाजूला पडले. त्यांचा प्रभाव ओसरला. अखिल भारतीय काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर ते महाराष्ट्र प्रदेश संघटना काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तसेच ते काहीकाळ जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते.

मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे १४ मे १९७८ रोजी निधन झाले.

— अरुण भोसले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..