माझे परममित्र कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी, यांनी कलाविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल त्यांना मिळालेली कौतुकाची पोचपावती, त्यांच्याच शब्दांत….
१९९३ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड झाली.. संमेलनाचे अध्यक्ष होते, विद्याधर गोखले. त्या संमेलनाच्या सजावटीचे काम मला मिळाले. माझ्या कामाच्या पद्धतीनुसार मी जिथे संमेलन होणार आहे, ती जागा पाहिली. तिथे मुख्य रंगमंच व मंडप तसेच इतर कार्यक्रमांसाठी लागणारऱ्या मंडपांची आखणी केली.
सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या पोर्ट्रेट्सची मांडणी केली. संपूर्ण वातावरण साहित्यिक केले. यासाठी मला अभयसिंहराजे यांना वारंवार भेटावे लागत होते. त्यांनी मला मनासारखं काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. परिणामी मी वेळेतच, संमेलनाची संपूर्ण सजावट पूर्ण केली.
संमेलनाचे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत शानदार उदघाटन झाले. तीन दिवस हा सोहळा रंगला होता. समारोपाच्या दिवशी संमेलन पार पडल्यानंतर मी सर्व सजावट आवरायला घेतली. माझ्या सहकाऱ्यांनी आपले काम चोख पार पाडले. मी अभयसिंहराजे यांचा निरोप घेऊन मुंबईस परतलो.
मी पुन्हा माझ्या चित्रपटांच्या कलादिग्दर्शनात रममाण झालो. सुमारे दहा दिवसांनंतर, सकाळच्या वेळी आमच्या सोसायटीचा वाॅचमन माझ्याकडे एक पार्सल सोडवून घेण्याची पावती घेऊन आला. मी वाचून पाहिले तर सातारहून अभयसिंहराजे यांनी मला sunny मोपेड पाठवलेली होती. सोबतचं पाकीट उघडून पाहिलं तर त्यामध्ये गाडीची कागदपत्रे होती व अभयसिंहराजे यांचं पत्र होतं.. त्यात त्यांनी माझ्या कामावर खुश होऊन ही गाडी सप्रेम भेट म्हणून पाठवली असल्याचं लिहिलेलं होतं..
मी त्या भेटीचा स्वीकार केला. एका राजानं, कलाकाराचं केलेलं कौतुक कोण नाकारेल? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनमोल कामगिरी करणाऱ्या, आपल्या सहकाऱ्यांना कधी सोन्याचं कडं तर कधी नजराणा, जहागीर दिली होती.. त्यांच्या पश्चात तीनशे वर्षांनंतरही अभयसिंहराजे छत्रपतींची परंपरा चालवत होते.. त्या भेट दिलेल्या वस्तूच्या किंमतीपेक्षाही, त्यामागची कलाकारांप्रती असलेली राजांची भावना ही माझ्या दृष्टीने अनमोल होती..
आता या गोष्टीलाही अठ्ठावीस वर्षे झाली.. आता मी देखील कलादिग्दर्शनाच्या कामातून निवृत्ती घेतलेली आहे.. आज अभयसिंहराजे नाहीत, मात्र त्यांनी माझ्या कामाचं केलेलं कौतुक, अविस्मरणीय असंच आहे..
त्याकाळी राजे म्हटलं की, त्या व्यक्तीबद्दल नितांत आदर वाटत असे.. आता ‘राजे’ हा शब्द कुणीही आपल्या नावापुढे सहज लावतात.. त्या पुरुषांमध्ये ती योग्यता असावी लागते, तसा दिलदार स्वभाव असावा लागतो.. तो रयतेचा राजा असावा लागतो, स्वतःसोबत इतरांनाही प्रगतीपथावर घेऊन जाणारा धनाचा नव्हे तर मनाचा, तो ‘राजा’ असावा लागतो..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-१२-२१.
Leave a Reply