कधी कधी काही माणसं स्वत:वर इतके अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणे जमतच नाही. अर्थात त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात. त्यामुळे अशी माणसं चिरकाल लक्षात राहतात त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले.
१९४०च्या दरम्यान या मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूणाकडे एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती आवडली त्यांनी या तरूणाला आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका देऊ केली. या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित.
त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना आहे १९५२ ची. पूढच्या पाच वर्षात या तरूणाला अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.
१९५९ मध्ये तर त्याने मग दिलीप कुमारशीच पंगा घेतला. “पैगाम” या चित्रपटात राजकुमार दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. मस्त जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.
मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. या चित्रपटा पासून राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला गर्दी करायचे. त्यांच्या ‘हिर रांझा’ या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. मात्र नंतर हळूहळू बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणीणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. अगदी आपल्या मुलाला त्यांने शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है….. , (वक्त) आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हें जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे…. (पाकीजा)
हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। (‘सौदागर’),हम आंखो से सुरमा नहीं चुराते, हम आंखें ही चुरा लेते हैं…… (तिरंगा) …हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी… (मरते दम तक) ….हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है…(‘तिरंगा’)
दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं……दिल एक मंदीर आणि वक्त या दोन चित्रपटाने त्यांना सहकलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता…….३ जुलै १९९६ रोजी हा जानी आपल्यातुन देहरूपाने कायमचा निघून गेला.
दासू भगत (३ जुलै ०१७)
Leave a Reply