नवीन लेखन...

रक्तापलिकडची नाती…

मनात घर करून राहणारी

 

आमच्याकडे काम करणाऱ्या चंदा ताईंच्या साक्षीचं याच महिन्यात लग्न झालं…

त्या आगोदर काही दिवस, सवाष्ण म्हणून मला त्यांच्या घरी अतिशय प्रेमाने जेवायला बोलावलेलं … मीही जायला प्रचंड उत्सुक होते.

घर लहानसंच ..पण लगबग खूप होती. लग्न घर वाटत होतं अगदी..

तेवढ्यात साक्षी दिसली..’या ताई’, म्हणाली.. ‘आई आतल्या खोलीत आहे’.. आजारी आहे’. मी लगेचच आतल्या खोलीत गेले. चंदा ताई गलितगात्र दिसत होत्या. मूळव्याधीचा त्रास त्यांना होताच, पण यावेळेस नेमका वेगळाच कुठलासा आजार बळावला..वेळेवर योग्य औषधोपचार घ्या, तात्पुरता इलाज उपयोगाचा नाही हे या आधी अनेकदा त्यांना सांगून बघितलं . त्यांना परवडेल असा इलाज कुठे उपलब्ध आहे हे सुद्धा सांगून बघितलं. लक्ष दिलं गेलं नाही आणि आज लेकीचं लग्न अवघ्या ६ दिवसांवर असताना गंभीर दुखणं उपटलं.

हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या अडचणी आपण नाही समजू शकत हेच खरं.

चंद ताईंच्या सासूबाई, यजमान, मुलगा आणि स्वतः ,होणारी नवरी साक्षी कामाला जुंपलेले. मी आत गेले तशी ,मला पाहताच चंदा ताईंना अश्रु अनावर झाले..मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सगळं काही व्यवस्थित होईल म्हटलं. तुम्हालाही बरं वाटेल, आज गुरुवार आहे, चांगला दिवस आहे. त्यांच्या घरात स्वामी समर्थांची व दत्त महाराजांची तसबीर होती. मनोमन प्रार्थना केली त्याकडे पाहून. लग्न तर व्यवस्थित पार पडुदेच आणि चंदा ताईंनाही पूर्ण बरं वाटुदे.

त्या दिवशी, मी धरून एकूण चौदा सवाष्णींना आमंत्रण होतं. शिवाय घरातली इतर मंडळी, पाहुणे धरता स्वयंपाकाचा घाट मोठा होता. चंदा ताईंच्या नियोजनाप्रमाणे पहाटे चार ला स्वयंपाक सूरु करायचा होता. त्यांचं आजारपण उपटल्यामुळे त्यांच्याने काहीही होणं शक्य नव्हतं. सासूबाई सवाष्ण नाहीत त्यामुळे स्वतंपाकात त्या सहभागी होऊ शकत नव्हत्या.

चंदा ताईंची धाकटी बहीण तेवढी राहिली. अशावेळी तिच्या मदतीला शेजारच्या चार सवाष्णी धावून आल्या. चौदा जणींपैकी याही चौघी असणार होत्या. पण अजिबात मानपानाचा विचार न करता या चौघी जणी पाहटे ४ वाजता पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाला हजर होत्या. सुनियोजित वेळेप्रमाणे स्वयंपाक वेळेच्या आधी तयार होता.

हे सगळं ऐकून मी भारावून गेले. चंदा ताईंच्या सासूबाईंना म्हटलं, किती भाग्यवान आहात तुम्ही. नात्याची माणसं नसूनहि मागचा पुढचा विचार न करता हि माणसं किती सहज मदतीचा हात पुढे करतात. आमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताई सुद्धा स्वतः ची कामं सांभाळत जमेल तशी मदत करत होत्या, त्यांची मुलगी श्रुती तिथे राहून पडेल ते काम करत साक्षी ला घरात मदत करत होती.

माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते.

आपल्याकडे पाच दिवसांचा गणपती बसतो तेव्हा सुद्धा घरातली माणसं तोंड फिरवतात, का ? काम करावं लागेल म्हणून. एवढंच काय, लग्न मुंजीसारख्या मोठ्या कार्याच्या वेळी सुद्धा नात्यातली मंडळी आपापली सोय पाहतात. मदतीचा हात पुढे करणारी 10 पैकी 2 माणसं..माणसं महत्वाची हे बरोबर, पण हि असली फोल नाती का जपायची? केवळ रक्ताचं नातं म्हणून.? माणसं काही फक्त मदत करायला नसतात , वेळप्रसंगी मानसिक आधार सुद्धा लागतो. तेव्हाही कोण आपलं आणि कोण नाही हे समजतं.

आपली नाती निवडण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला मिळायला हवा होता , नाही का?

आमची जेवणं झाली, ओटी भरली गेली ..मी चंदा ताईंना भेटून निघणार तेवढ्यात बांगड्या भरणारी बाई आली. चंदा ताईंच्या सासूबाई मला म्हणाल्या, ” गौरी ताई , बांगड्या भरण्याचा पहिला मान तुमचा, अगदी हव्या तेवढ्या बांगड्या भरा. साक्षीच्या लग्नापर्यंत इथे राहिलात तरी चालेल, आम्ही सगळी व्यवस्था करू” मी पुन्हा भारावून गेले. ‘दोन्ही हातात 12-12 बांगड्या भरल्या. मी निघताना चंदा ताई शेजारी विश्रांती घेत होत्या. त्या घरात सुद्धा माझी ओटी भरली गेली आणि मगच मला जाऊ दिलं गेलं..

आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी.

— गौरी सचिन पावगी

Image source: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..