नवीन लेखन...

२०१३ मध्ये शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध टिकवणे महत्वाचे

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत. आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेले

चांगले संबंध टिकवणे महत्वाचे आहे. चीनचा प्रभाव श्रीलंकेत वाढत आहे. २०१२ मध्ये तेथील हंबनतोटा या बंदराच्या विकासाचे आणि विमानतळाचे काम चीनला मिळाले आहे. आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न भारताकडून नेहमीच केला जातो; पण विस्तारवादी वृत्तीच्या चीनकडून त्यामध्ये अडथळे आणले जातात.

नेपाळ
२०१२ मध्ये नेपाळमध्ये सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया काय अधोरेखित करतात? नेपाळमधील माओवादी चीनच्या पदराआड लपून भारताकडे डोळे वटारून बघत आहेत. नेपाळमध्ये हिंदी, हिंदू आणि भारतीय उद्योगपती-व्यापार्‍यांविरुद्ध द्वेष पसरविण्याचे कारस्थान रचले जात आहे. या सार्‍या प्रकारामागे चीनचा हात आहे. विशेष म्हणजे ही आत्मघाती मनोवृत्ती नेपाळ अशा वेळी प्रकट करीत आहे, की जेव्हा हा देश भारतावर सर्वाधिक अवलंबून आहे. चीनमुळे नेपाळमध्ये सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया आपल्या देशासाठी अतिशय घातक ठरेल. ड्रॅगनच्या संपूर्ण सहकार्याने माओवाद्यांचे लक्ष्य नेपाळची सेना होती. कोणताही संघर्ष न करता नेपाळच्या लष्कराने शरणागती पत्करली. यानंतर सुनियोजित पद्धतीने भारताशी असलेल्या दृढ सांस्कृतिक संबंधांवर आघात करण्याचे धोरण माओवाद्यांनी अवलंबले.

गेल्या काही काळापासून नेपाळमधील टॉकिजमधून हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन बंद आहे. भारतीय क्रमांक लेल्या वाहनांना नेपाळमध्ये प्रवेश देण्यासही बंदी घातली होती. एवढेच नव्हे, तर नेपाळ रेडिओवर हिंदी गाण्यांचे प्रसारण करण्यास बंदी आणण्याचे फर्मानही जारी केले होते. पुष्पदहल कमल ऊर्फ प्रचंड समर्थक माओवादी वैचारिक दृष्टीने चीनला आपल्या निकटचा सहकारी तर भारताला आपला शत्रू मानतात. नेपाळमध्ये पायाभूत संरचना, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि माओवाद्यांना आर्थिक-राजकीय सहकार्य करून आम्हीच तुमच्या (नेपाळच्या) निकटचे आहोत असे सिद्ध करण्याचा प्रयत्न चीन करीत आहे, दुसरीकडे नेपाळमध्ये भारतीय सीमेपर्यंत रस्ते आणि रेल्वेमार्गाचे जाळे विणून सर्व बाजूंनी भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न ड्रॅगन करीत आहे. या घडामोडींकडे भारत सरकार दुर्लक्ष का करीत आहे?

भारत-बांगलादेश संबंध सुधारले पण घुसखोरी सुरुच
२००९ पासुन श्रीमती हसीना वाजेद सत्तेवर आल्यापासून भारत-बांगलादेश संबंध सुधारले आहेत. भारताविरुद्ध कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना आवर घालण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे, तर बांगलादेशात लपलेला उल्फाचा नेता अरविंद राजखोवा, राजू बरूआ, चित्रबन हजारिका आदींना अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आले. दोन वर्षांनी बांगलादेशात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत “भारत-बांगलादेश संबंध” हा प्रचाराचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असेल. हसीना वाजेद यांनी चीनला भेट दिल्यावर तत्काळ चीनच्या नेत्यांनीही ढाक्याला भेट देऊन मैत्री वाढविली. डॉ सिंग यांनीही ढाक्यास भेट देणे गरजेचे आहे. बांगलादेशात आजही सुमारे तीन हजार दहशतवादी व दहशतवाद्यांच्या १२० संघटना आहेत. ब्रह्मपुत्रा नदीतील सीमानिश्चितीच्या संदर्भात वारंवार चर्चा सुरू असते. सीमेवरील व्यापार वाढविण्यासाठी १० हाट (बाजार) सुरू करण्यावर एकमत झाले आहे पण अनेवर्षे भारतात बेकायदेशीररीत्या येणार्‍या बांगलादेशीयांचा प्रश्न ईशान्य राज्यात बिकट बनला आहे; बांगलादेश सीमा पार करून आतापर्यंत ४ कोटी बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. हे घुसखोर परत पाठवायची राजकीय ईच्हाशक्ती नाही. बांगलादेशाच्या भूमीवर शिजणारे भारतविरोधी कारस्थाने थांबविण्यासाठी, बांगलादेशींची बेकायदा घुसखोरी रोखण्यासाठी पावले टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.

भूतान, भारताचा मित्र की चिनचा?
आज भूतानचे भारताशी जेवढे प्रदीर्घ काळ घनिष्ट संबंध आहेत तेवढे ते अन्य कोणत्याही देशाशी नाहीत, हे खरे असले तरी त्यामुळे भारताने गाफील राहावे, अशी परिस्थिती अर्थातच नाही. सीमा सुरक्षेपासून रस्ते बांधणीपर्यंत आणि आरोग्यापासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांत भूतान फार मोठय़ा प्रमाणात भारतीय सहकार्यावरच अवलंबून आहे. जून २0१२ मध्ये रिओ येथे झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या पर्यावरणविषयक परिषदेत भूतानचे पंतप्रधान जिग्मी थिनले आणि चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ यांची भेट झाली, ही घटना विशेष उल्लेखनीय म्हणायला हवी. भारताच्या शेजारी देशांमध्ये एक भूतानच असा आहे की, जिथे चीनची उपस्थिती नाही! भूतान-चीन संबंधांमुळे ही परिस्थिती बदलेल. चीनने नानाविध प्रलोभने दाखविली आहे याला भूतान बळी पडेल का ?

मालदीवला चिनची फूस
मालदीव सरकारने राजधानी माले येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करून ते चालविण्याचे जीएमआर या भारतीय कंपनीला दिलेले कंत्राट अचानक रद्द केल्याने भारत आणि मालदीव या दोन्ही देशांतील आजवरच्या सौहार्दपूर्ण संबंधाला जबरदस्त तडा गेला आहे. मालदीव हा त्याच्या जवळजवळ सर्व गरजांसाठी भारतावर अवलंबून असलेला देश आहे. याचा अर्थ मालदिवला त्याच्या सर्व गरजा भागविण्याचे आश्वासन भारताच्या प्रतिस्पर्धी चिनने दिले आहे उघड आहे, भारताने हा प्रश्न या बेटावर अस्थिरता निर्माण करणार्‍या चिनकडे थेट उपस्थित करणे गरजेचे आहे.

चिनशी भारताचे दुबळे धोरण
चीन सारखा सातत्याने भारताच्या कुरापती काढत असतो. चीनकडून होणारे भारतीय सीमांचे उल्लंघन म्हणजे नित्याचाच प्रकार झाला आहे. भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करणे आणि भारताचे चुकीचे नकाशे प्रसिद्ध करणे, हा या कुरापतींचाच एक भाग आहे. २०११ मध्ये चिनी सैनिकांनी तब्बल १८० वेळा भारतीय सीमेचे उल्लंघन केले आहे. परंतु, केंद्रातील सत्ताधार्‍यांचे धोरण नेहमीच नरमाईचे राहिले आहे. ते का? सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही भारत-चीन सीमा वादावर तोडगा निघू शकला नाही. याला एकीकडे ज्याप्रमाणे चीनचा हटवादीपणा व मुजोरी जबाबदार आहे त्याचप्रमाणे भारताचे दुबळे धोरणही तितकेच जबाबदार आहे.

सशस्त्र दहशतवाद्यांची घुसखोरी व शस्त्रांची तस्करी, ‘नॉन-स्टेट अक्टर्सचा झालेला उदय, नार्कोटिकल व शस्त्रांच्या तस्करांचे असलेले लागेबांधे, घुसखोर, डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा वाढणारा दहशतवाद, फुटीरतावादी चळवळींना मदत पुरविणारे व पोसणारी बाह्यकेंद्री सत्तावर्तुळे, सीमेलगत

मदरशांची वाढणारी संख्या यामुळे सीमा व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे सीमा संरक्षणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अमली पदार्थाचे तस्कर व भरपूर पैसा हाती असलेले दहशतवादी यांनी निम्नस्तरातील राजकीय नेते, पोलीस, स्थानिक लोकांशी सूत जुळविलेले असते. शेजारी राष्ट्रांशी संबंध फारसे सलोख्याचे नसल्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानाचा सीमा सुरक्षेशी निकटचा संबंध आहे. जगातील सर्वात दुर्गम अशा भागांतील सीमेबाबत भारताचे चीन व पाकिस्तानशी असलेले वाद व अन्य सीमाप्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता सीमा सुरक्षा हे २०१३ मध्ये अतिशय कार्यक्षम व प्रभावी असणे गरजेचे झाले आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..