गडकरी यांची ओळख मुख्यत्वे करुन नाटक आणि कविता वरुन होते…. परंतु त्यांच्या या पैलु विषयी फार थोड्या रसिकांना माहिती असेल.
चिमुकली इसापनिती हे गडकर्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. त्यातील काही कथा–
कथा-१
कथा पहिली
एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. यासाठी संगत फार विचाराने करावी.
कथा दुसरी
रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ”रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.” असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ”काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?” रामा बोलला, ”हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.” हे ऐकून हरी फारच खजील झाला.
कथा ३
एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते.
कथा चौथी
एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, ”देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.”देवाने सांगितले की, ”बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत?” देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.
संदर्भ :- रामगणेश गडकरी यांचे संकेत स्थळ
संकलन – समीर सप्रे
Leave a Reply