काल दहावीचा निकाल लागला. जवळपास २०० च्या आसपास मुलांना १०० टक्के मार्क्स मिळाले हे वाचून खुप छान वाटलं. त्या सर्व हुशार मुलांचं अभिनंदन. या मुलांबद्दल कौतुक असलं तरीही माझ्या दुसऱ्या मनात कुठेतरी काळजीची पालही चुकचुकली. पैकीच्या पैकी मार्क्स म्हणजे कसा आणि केवढा अभ्यास केला असेल या मुलांनी, वर्षभर बाकी सर्व बाजूला ठेवून फक्त अभ्यासच केला असेल का, या मुलांना शंभर टक्के मार्क्स मिळाले, तर मग यांच्या मागून परिक्षेला बसणारांचं मार्कांचं उद्दीष्ट काय असेल की आता करण्यासारखं काहीच उरलं नाही या विचाराने त्यांना फ्रस्ट्रेशन येईल का, या सारख्या अनेक प्रश्नांची मालिका मनात फेर धरू लागली.
आता आणखी एक प्रश्न मनातील इतर सर्व प्रश्नांवर मात करून पुढे येऊ लागला, तो हा, की ही परिक्षा मार्कांची होती की गुणवत्तेची? ‘मार्कां’साठी आपण योजलेला ‘गुण’ हा प्रतिशब्द योग्य आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासून पाहाण्याची गरज आहे. आपण असाच जोश मे होश खोवून अनेक गोष्टींना चुकीची नांवं दिली आहेत असं मला वाटतं. भल्या भल्या स्थितप्रज्ञावंतांची मन:शांती हरण करणाऱ्या कबुतरांना शांतीदूत असं नांव देऊन, अशीच एक चुक आपण केली आहे हे असंच एक वानगीदाखलचं उदाहरण. ‘मार्क्स’ म्हणजे ‘गुण’ हे कदाचित त्या काळात बरोबर असेलही पण आता मात्र त्याचं पुन:र्निरिक्षण होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जगभरात ‘मार्क’वाद पिछाडीवर जात असताना आपण मात्र त्याचा जयजयकार का करतोय हे आकलनाच्या पलिकडचं आहे.
माझी मुलंही हल्लीच्या काळातच, म्हणजे गेल्या पांच वर्षात, दहावी आणि बारावी पास झाली. त्यांनाही असेच छाती दडपून (म्हणजे माझी छाती, त्यांची ५६ इचाच्याही पुढे गेली होती..!) टाकणारे मार्क्स मिळाले होते. मी ते करत असलेला अभ्यास आणि घेतलेली मेहेनत जवळून पाहीली होती. मी ही माझी मुलं उत्तम मार्कांनी पास झाली म्हणून पेढे वाटले होते, पण ते जनरित म्हणून.
यांच्या निरिक्षणावरून माझं प्रांजळ मत असं बनलं आहे, की ही परिक्षा ‘स्मरणशक्ती’ची आहे, ‘आकलना’ची नाही. किंबहूना आपल्या शिक्षण पद्धतीत आकलनाला महत्वच दिलं जात नाही. वर्षभर घोकंपट्टी करायची आणि परिक्षेच्या पेपरात जाऊन ओकंपट्टी करायची, हे आणि एवढंच होतं असंही माझं निरिक्षण आहे. बरं, एका दिवशीच्या पेपरसाठी पाठ केलेलं, त्या दिवशीच्या विषयाची परिक्षा दुपारी दोन वाजता संपली, की तिन वाजता सपाट झालेलं असतं कारण दुसऱ्या दिवशीच्या परिक्षेचा डाटा डोक्यात भरायचा असतो. सद्यस्थिती पाहाता, त्यात काही चुकीचं आहे असं कुणालाच वाटत नाही हे ही चुकीचं नाही. पण माझ्यासारख्या ‘आऊट आॅफ डेट’ माणसाला मात्र हे दाताखाली आलेल्या मिठाच्या खड्यासारखं खटकत आणि मुलांनी वाढलेल्या रुचकर मार्करुपी जेवणाची चव उगाचंच बिघडल्यासारखी वाटतं. मुलांचा सध्याचा अभ्यास हा काॅम्प्युटरच्या RAM म्हणजे, Random Access Memory सारखा वाटतो मला. संगणकातली ही मेमरी तात्पुरती असते, जोपर्यंत आपण सेव्हची कमांड देत नाही, तो पर्यंत ती सेव्ह केली जात नाही. मुलांची अभ्यासातली मेहेनत आकलनाची कमांड देऊन सेव्ह करण्यास कुणीतरी शिक्षण तज्ञाने त्यांना शिकवलं पाहीजे. आता काही सुपर संगणक आहेत, की ज्यात सर्व काम आॅटो सेव्ह होत जातं, नाही असं नाही, पण हे सुपर संगणक पुढे अमेरीकेत किंवा तशाच एखाद्या पहिल्या जगातील देशात स्वत:ची निर्यात कधी होईल याची वाट पाहात असतात.
गेली काही वर्ष सातत्याने बहुतेक मुलांना ऐंशी टक्क्यांच्यावर मार्क्स मिळताना दिसतात. मुलांचं नापास होण्याचं प्रमाणही दरवर्षी लक्षणीयरित्या घटताना दिसतंय. हल्ली बहुतेक सर्वांना एक अथवा दोन मुलं असतात. सहावा-सातव्या वेतन आयोगामुळे आणि ओपन मार्केट इकाॅनाॅमीमुळे बहुतेक सर्वांकडे पैसाही भरपूर असतो. त्यामुळे चांगलं शिक्षण आणि उत्तम, महागड्या क्लासेसमधे आपल्या मुलांना घातलं जातं. ज्यांची परिस्थिती नाही ते ही प्रसंगी कर्ज काढून, पोटाला चिमटा कढून मुलांना उत्तम शिक्षण देतात. पैशांची आणि क्लासेसचे ढग बरसून मान्सून उत्तम झाला की मार्कांचं पिक भरघोस येणारच, त्यात नवल ते काय? पण हे भरघोस पिक पुढे मात्र करपून गेल्यासारखं का वाटतं हा प्रश्नच आहे.
येवढी उत्तम ‘गुण’वत्ता असलेल्या बहुतेक मुलांची आणि त्यांच्या पालकांचीही, एखाद्या चांगल्या किंवा फारीनच्या कंपनीत लाखभर पगाराची नोकरी मिळणे हीच अपेक्षा असताना दिसते. पायाभूत क्षेत्रात संशौधन करणं, संरक्षक दलात जाणं किंवा आपल्याला आवडलेल्या एखाद्या क्षेत्राला वाहून घेणं हे अभावानेच होताना दिसतं. सध्याचा जमानाच वाहून घेण्यापेक्षा, प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचा असल्यामुळे असं होत असावं. पाच आकडी पगाराच्या नोकरीला प्रतिष्ठा आल्यावर आणखी वेगळं ते काय होणार?
यात आपल्या समाजमनाचीही चुक आहे असं मला नोंदवावसं वाटतं. पायाभूत संशोधन, एखाद्या किड्यावर किंवा प्राण्यावर आयुष्यभर संशोधन करणं, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं, लेखनाकडे कल असलेल्यानं लेखनाला वाहून घेणं या व अशाच इतर वेगळ्या वाटेनं जाणाऱ्यांना, आपल्या समाजात प्रतिष्ठा नाही. प्रतिष्ठा जाऊ द्या, त्यांच्याकडे हेटाळणीनेच पाहीलं जातं, मग अशा वेड्यांना सांभाळणं तर लय लांबची गोष्ट आहे. याचमुळे भारतात जगाला आश्चर्यचकित करणारे शोध लागत नाहीत, नोबेल पारितोषिकं आपल्याला अभावानेच मिळतात आणि मिळाली तरी विभागून मिळतात.
या शालांत परिक्षेत उत्तम मार्क्स मिळवलेल्या मुलांनी व त्यांच्या पालकांनी थोडा विचार करणं आवश्यक आहे. आपल्या स्मार्ट मुलाच्या Random Access Memory चं कायम स्वरुपी मेमरीत रुपांतर होऊन, त्याचा विनियोग समाजासाठी व पर्यायाने देशासाठी कसा होईल हे पाहाणं आवश्यक आहे. हे खरंय, की देशात आज घोटाळा सोडला तर ‘आदर्श’ असं काहीच उरलेलं नाही, पण स्वत:च इतरांसाठी आदर्श बनायला काय हरकत आहे..?
एक मात्र आहे, कालच्या शालांत परिक्षेच्या निकालात, पैकीच्या पैकी मार्क्स देतांना मंडळाने कला आणि खेळ यांचेही काही मार्क्स दिल्याचं आज पेपरमधे वाचलं. मंडळ कला-खेळ यांचाही विचार करत असेल तर ते अभिनंदनीय आहे. यातून देशाला जागतिक किर्तीचे कलावंत व खेळाडू मिळण्यास सुरुवात होऊन भविष्यात काहीतरी चांगलं घडेल याची अपेक्षा ठेवून आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करून थांबतो.
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply