२०१० साली भूमध्य आणि काळ्या समुद्रात आमचे जहाज फिरत होते. आमच्या जहाजावर भारतीय नौदलातून रिटायर्ड झालेले झारखंडच्या रांची मधील एक अधिकारी इलेक्ट्रिकल ऑफिसर ज्यांना जहाजावर बत्ती साब असे सुद्धा बोलले जाते असे आमच्यासोबत काम करत होते. नेहमीप्रमाणे जहाजावर असणाऱ्या एकूण सत्तावीस जणांमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यातील अधिकारी आणि खलाशी होते, कोणी जम्मूचा, कोणी कलकत्त्याच्या, कोणी दिल्लीचा, कोणी चेन्नईचा कोणी शहरातला तर कोणी गांव खेड्यातला. लक्षद्वीप बेटांच्या समूहातील एक मिनीकॉय नावाचे बेट आहे तेथे जवळपास सगळे भारतीय हे मुस्लिम आहेत या छोटाशा मिनीकॉय आयलंड वरील जवळपास प्रत्येकजण जहाजावर खलाशी म्हणून कामं करतात. आमच्या कंपनीत प्रत्येक जहाजावर डेक आणि इंजिन डिपार्टमेंट मध्ये कामं करणारे असे कमीत कमी पाच जण तरी एकवेळेला असतातच, कोणी बोसन, एबी, मोटरमन, वायपर किंवा ट्रेनी सिमन आणि आता आता तर अधिकारी म्हणून सुद्धा हे लोकं यायला लागले आहेत.
त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा. प्रत्येक जहाजावर क्रू स्मोक रूम आणि ऑफिसर्स स्मोक रूम वेगवेगळी असते. ऑफिसर्स स्मोक रूम मध्ये क्रू किंवा खलाशी कधीच जाऊन बसत नाहीत, पण क्रू स्मोक रूम मध्ये फक्त जुनियर रँक चे अधिकारी तेवढे जाऊन बसतात कधी कधी. ऑफिसर्स आणि क्रू काम करताना टीम वर्क मध्ये करतात पण ऑफिसर्स आणि क्रू अशी दरी ऑफ ड्युटी असल्यावर लगेच दिसून येते.
संध्याकाळी रामायण चा भाग बघितल्यावर पुढला भाग बघेपर्यंत त्यावर चर्चा आणि गप्पा रंगत असत. ऐंशी च्या दशकात जेव्हा दूरदर्शन वर रामायण मालिका प्रक्षेपित व्हायची तेव्हा ज्या आदराने आणि भक्तीने तल्लीन होऊन घरातील व आजूबाजूची लोकं एकत्र येऊन बघायची तोच अनुभव 2010 साली जहाजावर क्रू स्मोक रूम मध्ये बघायला मिळायचा. रामायण कोणी लिहले, कधी लिहिले यापेक्षा त्या पौराणिक कथा बघताना त्यातून दिला जाणारा संदेश, त्यातून होणारा बोध खरोखरच विलक्षण असाच आहे.
जन्म होईपर्यंत आणि जन्म झाल्यावर साजरा केला जाणारा उत्साह आणि आनंद तसेच मुलांचे कौतुक रामायण मालिकेत ज्याप्रकारे दाखवले जाते तसाच अनुभव आपण सर्व घेत असतो. दिलेले वचन आणि त्या वचन पूर्ती साठी पुत्राला वनवासाचा आदेश देणाऱ्या बापाची अवस्था, सत्ता आणि राज्य सोडून वनवासात जाणारा आज्ञाधारी पुत्र, त्याला साथ देणारी त्याची अर्धांगिनी आणि त्यांच्या मागे सावली सारखा जाणारा धाकटा बंधू. आपल्या सावत्र भावाला स्वतःसाठी राज्य सोडून वनवास भोगावा लागतोय याची जाण ठेवून असे राज्य नाकारणारा सावत्र भाऊ. रामायणातील एक एक पात्र सत्य, वचन, त्याग, निष्ठा, भक्ती आणि शक्तीची सगळी रूपं आपल्याला दाखवतो. रामायण आणि महाभारत ह्या पुराण कथा जरी असल्या तरी असत्यावर सत्याचा विजय, दुर्गुणांवर सगुणांची मात, शक्ती आणि भक्तीचा महिमा, त्याग आणि निष्ठेची शिकवण आणि संस्कार देणारी आपली संस्कृती आणि परंपरा आहे हेच दर्शवितात.
जहाजावर रामायण लावले जायचे तेव्हा मिनीकॉय आयलंड वरील सगळे मुस्लिम खलाशी त्याचा एकसुद्धा भाग चुकवत नसत, उलट बत्ती साब च्या मागे लागून रामायण आणि महाभारत च्या डी व्ही डी कम्प्युटर मधून राईट करवून घेत. आम्हाला आमच्या घरी बायका आणि मुलांना दाखवायच्या आहेत, केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून त्यांच्यावर संस्कार व्हावेत पिता – पुत्र, पती – पत्नी, देव – भक्त, गुरु -शिष्य, सक्खे -सावत्र, शत्रू – मित्र या सर्व नात्यांसह
प्रेम -आपुलकी, वात्सल्य -भावना, सत्य -असत्य, जय -पराजय, मान -अपमान, राग -लोभ, तत्व – निष्ठा अशा सगळ्यांची जाणीव आणि बोध व्हावा यासाठी पाहिजे असे मोठ्या मनाने कबूल करायचे.
घरापासून आणि घरच्यांपासून लांब राहायचे, कोणी तीन ते पाच महिने तर कोणी आठ ते दहा महिने कामं तर करतात पण शेवटी समुद्रातील तरंगणाऱ्या जहाजावर लॉक डाऊनच ना???
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply