(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्यासाठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे).
तदागच्छ महातेज आश्रमं पुण्यकर्मणः ।
तारयैनां महाभागां अहल्यां देवरूपिणीम् ॥ ११ ॥
(महातेजस्वी श्रीरामा! आता तू पुण्यकर्मी महर्षि गौतमाच्या या आश्रमात चल आणि त्या देवरूपिणी महाभागा अहल्येचा उद्धार कर).
विश्वामित्रवचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः।
विश्वामित्रं पुरस्कृत्य आश्रमं प्रविवेश ह॥ १२॥
(विश्वामित्रांचे हे वचन ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामांनी महर्षिंच्या मागोमाग त्या आश्रमात प्रवेश केला.)
दर्श च महाभागां तपसा द्योतितप्रभान् ।
लोकैरपि समागम्य दुर्निरीक्ष्यां सुरासुरैः ॥ १३ ॥
(तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले- महासौभाग्यशालिनी अहल्या आपल्या तपस्येने दैदीप्यभान होत आहे. या लोकातील मनुष्य तसेच संपूर्ण देवता आणि असुरही तेथे येऊन तिला पाहू शकत नव्हते).
देवी अहल्येचे तेजस्वी स्वरूप पाहून श्रीरामाचे डोळे दिपून गेले. काल महर्षि विश्वामित्राने सांगितलेली देवी अहल्येची कथा डोळ्यांसमोर तरळली. श्रीरामाला आठवले, महर्षि विश्वामित्र म्हणाले होते, राम, उद्या आपण मिथिला राज्यात प्रवेश करू. त्या आधी उद्या पहाटे, माझा देवरूपिणी महातेजस्वी अहल्येच्या आश्रमात जाण्याचा विचार आहे. श्रीरामला आतापर्यंत हे चांगलेच कळले होते, महर्षि विश्वामित्रांच्या बोलण्यामागे काही हेतू निश्चित असतो. त्यांना काहीतरी कार्य सध्या करायचे असते. श्रीरामाने विचारले महर्षि, देवी अहल्या कोण आहेत, आपण तिथे जाण्याचे प्रयोजन काय? महर्षि म्हणाले, राम, लक्ष्मण आज तुम्हाला महासाध्वी अहल्येची कथा सांगतो. महर्षि विश्वामित्र कथा सांगू लागले
अयोध्या आणि मिथिला दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित एका रान नदीच्या काठी, एका वृद्ध तपस्वीचे आश्रम होते. न्यायशास्त्राचे अध्यन करून, गौतम ऋषी, गौतम ऋषी वृद्ध तपासिच्या आश्रमात न्यायशास्त्र शिकवू लागले. त्या वृद्ध तपस्वीची एक कन्या होती. तिचे नाव अहल्या. प्राण सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या प्रिय पुत्री अहल्येचे लग्न गौतम सोबत लावले. आश्रमाच्या जवळच एका पर्णकुटीत दोघे पती-पत्नी गृहस्थ धर्माचे पालन करत आनंदाने आयुष्य जगू लागले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
सकाळची वेळ होती, नेहमीप्रमाणे गौतम ऋषी आश्रमात शिकवायला गेले होते. कुटीत एकटी अहल्या होती. अचानक तिला अश्वांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अहल्या कुटी बाहेर आली. एक धिप्पाड पुरुष घोड्यावरून उतरला आणि त्याच्या सोबत अनेक हत्यारबंद सैनिक ही होते. तो पुरुष म्हणजे देवांचा राजा इंद्र. या इंद्राला, इंद्रपद स्वत:च्या कर्तृतावर नव्हे तर वंशपरंपरेने मिळाले होते. त्या काळी इंद्रपदाचे स्थान आजच्या युनायटेड नेशन्स सारखे होते. इंद्राचे स्थान आर्यावर्तातल्या राज्यांच्या वाद-विवादात एक मध्यस्था व्यतिरिक्त अधिक न्हवते. आर्यावर्तातले अधिकांश राजा-महाराजा प्रजेकडून वसूल केलेल्या करांच्या एक भाग इंद्राला देत असे. राज्य चालवण्याची कसली ही चिंता नसल्यामुळे इंद्र स्वर्गात, एशोआरमात, गंधर्व– अप्सरांच्या सोबत राहायचा. स्वर्गातले नियम कायदे वेगळे होते. एवढेच नव्हे, आर्यावर्तात ही इंद्र अदंडनीय होता अर्थात आर्यावर्तात केलेल्या अपराधासाठी इंद्राला दंड देण्याचा अधिकार कुणाला ही नव्हता.
इंद्र घोड्यावरून उतरला. गळ्यात फुलांची माळ आणि वल्कल वस्त्र परिधान केलेली साक्षात रतिपेक्षा सुंदर स्त्रीला पर्णकुटीतून बाहेर येताना पाहून इंद्राला खात्री पटली, हीच ती अहल्या आहे, जिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तो आला होता. तिला पाहून इंद्राची कामवासना पेटली, त्याची कामुक नजर तिच्या अंग प्रत्यांगावर फिरू लागली. एक पुरुष आपल्याकडे कामुक नजरेने पाहत आहे, हे पाहून अहल्या मनात चाचपली, तरी ही सर्व धैर्य एकत्र करून म्हणाली, अतिथी आपण कोण आहात, कोणाला भेटायला आले आहात. माझे पती गौतम सध्या घरी नाही. ते आश्रमशाळेत शिकवायला गेले आहेत. मी त्यांना बोलवते. इंद्र जोरात हसत म्हणाला, हे सुंदरी, मी तुझ्यासाठी इथे आलो आहेत. तुझे विलोभनीय सौंदर्य अरण्यात नष्ट होण्यासाठी नाही आहे, तुझी जागा स्वर्गात आहे. स्वर्ण अलंकारांनी नटलेले तुझे सौंदर्य पाहून स्वर्गातील देवता थक्क होतील. हे सुंदरी, मला प्रसन्न कर. मी तुला आपल्या सोबत स्वर्गात घेऊन जाईल. अप्सरांमध्ये तुला सर्वोच्च स्थान मिळेल. इंद्राचे असे असभ्य बोलणे ऐकून, अहल्या रागाने आणि त्वेषाने ओरडली, कामांध, नराधम, माझ्या पतीला कळले तर…
अद्याप त्याला कळले ही असेल, पण तो काही ही करू शकणार नाही, इंद्राला जी वस्तू आवडते, तिचा उपभोग घेतल्या खेरीज तो राहत नाही, मुकाट्याने माझ्याशी समागम करून मला प्रसन्न कर, अन्यथा बळजबरी करावी लागेल, असे म्हणत इंद्राने तिचा हात पकडला आणि फरपटत तिला कुटीत नेले.
अश्वांच्या टापांच्या आवाज आश्रमात ही ऐकू आला होता. आपल्या कुटी बाहेर काही शस्त्रधारी व्यक्ती आहे, हे गौतम ऋषींना कळले, त्यांच्या मनात पाल चुकचुकली, काही ब्रह्मचार्यांना सोबत घेऊन गौतम ऋषी कुटी कडे निघाले, जवळ पोहचतच आपल्या प्रिय पत्नी अहल्येच्या किंकाळ्या ऐकू आल्या. काही लोकांना येताना पाहून अश्वरोही सैनिकानी आपले घोडे त्यांच्यावर सोडले. तरी ही गौतम कसेबसे कुटी जवळ पोहचले. सैनिकांनी त्यांना पकडले. गौतम म्हणाले, दुष्टानों, हे काय चालले आहे.
तुझी भार्या, देवराज इंद्राला प्रसन्न करीत आहे, कुत्सित पणे असे म्हणत एका सैनिकाने त्याच्या डोक्यावर गदेने वार केला. गौतम ऋषी चक्कर येऊन खाली पडले. दुसर्या सैनिकाने त्यांचे हात मागून बांधले. थोड्यावेळाने गौतम ऋषी शुद्धीवर आले, पाहतो काय समोर इंद्र उभा होता. त्याच्या शरीरावर नखाने ओरबाडण्याच्या आणि दाताने चावण्याच्या अनेक जखमा होत्या. काहीतून रक्त ही वाहत होते. तरी ही गौतमकडे पाहत, राक्षसी हास्य करत इंद्र म्हणाला. गौतम तुझ्या भार्याने आज मला प्रसन्न केले आहे. एका वाघाला हरिणीचा शिकार करताना जो आनंद मिळतो, तसा आनंद तिने मला दिला आहे. काही थांबत, गौतमा, तुझ्या प्रिया भार्याने परपुरुषाशीं समागम केला आहे. तू तर न्यायशास्त्राचा ज्ञाता. तुला माहितच असेलच, न्यायानुसार, अश्या भ्रष्ट स्त्रियांच्या हातून अन्न जल घेणे तर दूर त्यांना स्पर्श करणे ही पाप आहे. तुला तिचा त्याग करावा लागेल. तरी ही मला तिची कीव येते. तिच्या सारख्या सौंदर्यवतीने पृथ्वीवर तिरस्कृत जगणे किंवा वारांगना सारखे जीवन व्यतीत करणे मला आवडणार नाही. तिला समजावून स्वर्गात पाठव, त्यातच तिचे हित आहे. आपल्या रूप सौंदर्याने देवतांना प्रसन्न करून एशोआरमात आयुष्य जगेल. स्वर्गीय अप्सरांमध्ये तिला मनाचे स्थान मिळेल. राहिले तुझे, एखाद्या कुरूप स्त्रीशी लग्न करून तू ही मजेत आणि चिंतामुक्त राहशील, हा! हा! हा!, असे म्हणत इंद्राने तेथून प्रयाण केले.
आश्रमात स्मशान शांतता पसरली. कुटी बाहेर गौतम ऋषी डोक्यावर हात ठेऊन मौन बसले होते. पुढे काय करायचे कुणाला ही काही कळत नव्हते, सर्वच मौन होते. सूर्यदेव अस्ताचला कडे जाऊ लागले. कुटीतून अहल्या बाहेर पडली, गौतमला उदेश्यून म्हणाली, प्रिय, इंद्राने मला भ्रष्ट केले आहे, आता माझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही. ह्या अपवित्र शरीराला नष्ट करण्याची मला अनुमती द्या. गौतम ऋषी तिच्या कडे पाहत म्हणाले, अहल्या, आत्महत्या करणे पाप आहे, मी त्याची अनुमती देऊ शकत नाही. शिवाय ह्यात तुझा काहीच दोष नाही. मी जाणतो तू, निर्दोष आहे. तुला दोषी मानून, समाजाने आपल्याला वाळीत टाकले तरी चालेल. आपण अरण्यात जाऊन कुटी बांधून राहू, अरण्यातल्या वृक्ष, लता, पक्षी, सत्य जाणतात, ते आपला त्याग करणार नाही.
तुम्ही म्हणतात म्हणून, मी आत्महत्या करणार नाही. मी जर दोषी नाही, तर समाजाने मला वाळीत का टाकावे? जो पर्यंत लोक माझ्या हातचे अन्नजल स्वीकार करणार नाही, तो पर्यंत मी ही अन्नजल स्पर्श करणार नाही.
गौतम ऋषी म्हणाले, अहल्या, हे उचित नाही अन्नजल ग्रहण न करणे म्हणजे एकप्रकारे आत्महत्या करणेच आहे.
अहल्या म्हणाली, हा केवळ माझ्या एकटीच प्रश्न नाही. अनेक स्त्रियांना अश्या प्रसंगातून जावे लागते, निर्दोष असताना ही त्यांना तिरस्कार सहन करावा लागतो, त्यांना जगणे त्यांना असह्य होते. जो पर्यंत मला न्याय मिळत नाही अन्न-जल ग्रहण करणार नाही, केवळ वायू आणि यज्ञीय अग्नि भक्षण करून मी जिवंत राहिल.
यज्ञवेदी समोर असलेल्या एका शिलेवर अहल्या ध्यानिस्थ होऊन बसत सूर्यदेवाला उद्येशून म्हणाली, हे सूर्यदेव, तुम्ही सर्वज्ञ आहात, मला न्याय द्या. जो पर्यंत मला न्याय मिळणार नाही, मी इथून उठणार नाही.
गौतम ऋषींच्या आश्रमात घडलेली घटना पंचक्रोशीत पसरली. जवळपासच्या आश्रमातील काही ऋषी-मुनी गौतमाचे सांत्वन करायला तिथे पोहचले. एक वृद्ध मुनी गौतमला म्हणाला, गौतम, अहल्येने उचित मार्ग निवडला आहे. अश्यारीतीने प्राणत्याग केल्यास, ती पवित्र होईल, तिला स्वर्गात स्थान मिळेल. गौतम म्हणाले, मुनिवर, आज एक महिना होऊन गेला आहे. इतके दिवस अन्न-जल ग्रहण न करता कुणी ही जिवंत राहू शकत नाही. पण अहल्या जिवंत आहे. तिला न्याय पाहिजे. कोण देणार न्याय. वृद्ध मुनी म्हणाले, तू महाराज दशरथ यांच्या सभेत न्याय मागण्यासाठी जा, कारण न्यायिक नियमांत परिवर्तन करण्याचा अधिकार फक्त राजाचा असतो. गौतम म्हणाले, मला माहित आहे, मी येथून बाहेर गेलो तर यज्ञीय अग्नि कोण प्रज्वलित ठेवणार? वृद्ध मुनी म्हणाले, ते आम्ही बघून घेऊ, तू काळजी करू नकोस.
गौतम ऋषी, महाराज दशरथाच्या राज्यसभेत पोहचले, आपली व्यथा-कथा त्यांच्या समोर मांडली. महाराज दशरथाने, राजपुरोहित महर्षि वशिष्ठ यांचे मत विचारले. महर्षि वशिष्ठ म्हणाले, राजन, कुठल्या ही निर्दोष व्यक्तीला दंड देणे न्यायसंगत नाही, हे जरी खरे असेल तरी, न्याय हा व्यक्तीनिष्ठ नसून, संपूर्ण समजासाठी असतो. कोणी पुरुष, परस्त्री बरोबर समागम करेल किंवा बळजबरी करेल तर त्याला मृत्यू दंड देण्याची व्यवस्था आहे. देवराज स्वर्गाचे अधिपती असल्यामुळे, ते अदंडनीय आहेत. त्या मुळे त्यांना दंड देणे शक्य नाही.
पर-पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला पुरुषाप्रमाणे मृत्युदंड देण्याची व्यवस्था नाही. कारण, स्त्रीवर बळजबरी झाली, किंवा तिने स्वतच्या इच्छेने संबंध केले, हे सिद्ध करणे अतिशय कठीण असते. स्वत:च्या बचावासाठी तिची पुरुषावर आळ घेण्याची संभावना नाकारता येणार नाही. दोन्ही बाबींवर विचार करून, व स्त्री वर अन्याय न होऊ देणे, यासाठी न्यायविदानीं स्त्रीला फक्त वाळीत टाकण्याची व्यवस्था केली आहे. केवळ एका स्त्री साठी न्यायिक व्यवस्थेत परिवर्तन करणे उचित नाही. तसे केले तर, स्वेच्छाचारी स्त्रिया याचा गैरवापर करतील. गौतम कडे पाहत वशिष्ठ ऋषी म्हणाले, अन्नजल बिना कुणी ही जिवंत राहू शकत नाही. मला तर असे वाटते, स्त्री सौंदर्याला भुलून गौतमनेच हा प्रपंच रचला असावा. वशिष्ठ ऋषींचे वचन गौतमला सहन झाले नाही. क्षणभर ही विचार न करता, सभात्याग केली. मोठ्या आशेने गौतम अयोध्येत आला होता. इथे ही त्याला न्याय नाही मिळाला. आता काय करायचे त्याला समजेनासे झाले. कुठल्या तोंडाने आश्रमात परत जाणार. अयोध्येत काय घडले असे कुणी विचारले तर त्यांना काय सांगणार. राहून-राहून वशिष्ठ ऋषींचे बोल, गौतमच्या कानावर आदळत होते. वशिष्ठ ऋषीने संपूर्ण सभेसमोर गौतमला स्त्री लंपट ठरविले होते. हा अपमान गौतमला सहन होत नव्हता. आपण अगतिक आहोत, आपण काहीच करू शकत नाही. आपल्या पत्नीला न्याय ही मिळवून देऊ शकत नाही. गौतम निराश झाला. आता जिवंत राहण्यात काहीच अर्थ नाही, गौतमाने प्राण त्यागण्याचा निश्चय केला आणि सरयू नदीत उडी टाकली.
गौतमचे डोळे उघडले, तो एका पर्ण कुटीत होता. गौतमला आठवले, मी तर नदीत उडी टाकली होती, तरी जिवंत का. कुणी आपल्याला इथे आणले. हा प्रश्न त्याला पडला. गौतमने चहूकडे डोळे फिरवले, एक प्रौढ वयाचे मुनी गौतमकडेच पाहत होते. गौतमने डोळे उघडले हे पाहून, ते म्हणाले पुत्र, या तरुण वयात जगण्याचे सोडून, मरणाची वाट का धरली? मी जर तिथे नसतो तर नाहक प्राण गेला असता तुझा. गौतम उठून म्हणाला. मुनिश्रेष्ठ, आपण माझे प्राण का वाचविले? मला जगायची इच्छा नाही. असे म्हणत, गौतमाने आपली कहाणी त्या मुनिना ऐकवली. ते मुनी म्हणले, गौतम, मी कुशिक पुत्र विश्वामित्र आहे. मी वचन देतो, मी देवी अहल्येला न्याय मिळवून देईल. तुला एकच विनंती आहे, पुन्हा आत्महत्येचा विचार मनात आणू नको. तू निश्चिंत होऊन आपल्या आश्रमात परत जा.
विश्वामित्र कथा सांगता सांगता थांबले, रामाला उद्येशून म्हणाले, राम, तू अयोध्येचा युवराज आहे, आता तूच ठरव, उद्या आपण गौतम ऋषींच्या आश्रमात गेले पाहिजे कि नाही. राम उद्गारला, गुरुदेव, मी उद्या अन्न-जल महातपस्वी अहल्येच्या हातानेच ग्रहण करेल. विश्वामित्र म्हणाले, राम मला तुझ्यापासून हीच अपेक्षा होती.
महर्षि विश्वामित्र, अयोध्येचे युवराज राम आणि त्यांचे अनुज लक्ष्मणासोबत गौतम ऋषींच्या आश्रमात येणार ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. जवळपासच्या आश्रमातले ऋषी मुनी, ब्रह्मचारी आणि ग्रामस्थ त्यांच्या स्वागतासाठी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ जमले. आज काय होणार याची उत्सुकता सर्वाना होती. श्री रामाने आश्रमात प्रवेश केला
प्रयत्नाान् निर्मितां धात्रा दिव्यां मायामयीमिव ।
धूमेनाभिपरीतांगीं दीप्तां अग्निशिखां इव ॥ १४ ॥
सतुषारावृतां साभ्रां पूर्णचंद्रप्रभामिव ।
मध्येऽम्भसो दुराधर्षां दीप्तां सूर्यप्रभामिव ॥ १५ ॥
(तिचे स्वरूप दिव्य होते विधात्याने फार प्रयत्ना॥ने तिच्या अंगांची निर्मिति केली होती. ती मायामयी असल्याप्रमाणे प्रतीत होत होती. धूमाने घेरलेल्या प्रज्वलित अग्निशिखेप्रमाणे ती वाटत होती. आणि ढगांनी झाकल्या गेलेल्या पूर्ण चंद्राच्या प्रभेसारखी दिसत होती. तसेच जलामध्ये उद्भाासित होणार्यां सूर्याच्या दुर्धर्ष प्रभेसमान दृष्टिगोचर होत होती.
सूर्यदेवा सारखे प्रखर तेज तिच्या चेहऱ्यावर असेल्यामुळे कुणाला ही तिला पाहणे शक्य नव्हते. एवढ्या कालखंडानंतर श्री राम आणि लक्ष्मणाने तिच्या चरणांना स्पर्श केला. श्री रामाने चरणस्पर्श करताच अहल्येने डोळे उघडले. श्री राम म्हणाले, माता मी अयोध्या नरेश दशरथ यांच्या पुत्र राम आहे आणि हा माझा अनुज लक्ष्मण आहे. तुझे दर्शन घेऊन आज मी कृतार्थ झालो आहे. अहल्येच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती उठली आणि रामाला मिठी मारत म्हणाली, राम किती वाट पहिली तुझी, का लावला एवढा वेळ? तू कौसल्येच्या गर्भात होता, तेंव्हा पासून तुझ्या आयुष्यातला एक एक दिवस मी ही जगला आहे. रामाने आपल्या हाताने तिचे ओघळणारे अश्रू पुसले आणि म्हणाला, माता, मला भयंकर भूक लागली आहे, तू आपल्या हाताने मला ग्रास भरवणार नाही तो पर्यंत माझी भूक शांत होणार नाही.
ते दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले नसेल तर नवलच. महर्षि विश्वामित्र गौतमास म्हणाले, गौतम, मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे. आता महाभोजाची तैयारी करा, आज साध्वी अहल्या, सर्वांनाच आपल्या हातानी भरवणार आहे. सर्व आश्रमवासी, ग्रामस्थ महाभोजाच्या तैयारीला लागले. महासती अहल्येने राम लक्ष्मणांना आपल्या हाताने भरविले ते अदभूत दृश्य पाहताना
पुष्पवृष्टिर्महत्यासीद् देवदुंदुभि निःस्वनैः ।
गंधर्वाप्सरसां चैव महानासीत् समुत्सवः ॥ १९ ॥
(देवतांच्या दुन्दुभि वाजू लागल्या. त्याबरोबरच आकाशांतून फुलांची भारी वृष्टि होऊ लागली. गंधर्व आणि अप्सरांच्या द्वारा महान उत्सव साजरा केला जाऊ लागला).
साधु साध्विति देवाः तां अहल्यां समपूजयन् ।
तपोबलविशुद्धाङ्गींः गौतमस्य वशानुगाम् ॥ २० ॥
(महर्षि गौतमांच्या अधीन राहणारी अहल्या आपल्या तपःशक्तिने विशुद्ध स्वरूपास प्राप्त झाली हे पाहून सर्व देवता तिला साधुवाद देऊन तिची भारी प्रशंसा करू लागल्या.)
गौतमोऽपि महातेजा अहल्यासहितः सुखी ।
रामं संपूज्य विधिवत् तपस्तेपे महातपाः ॥ २१ ॥
(महातेजस्वी महातपस्वी गौतमही अहल्येला आपल्याबरोबर पाहून सुखी झाले. त्यांनी श्रीरामांची विधिवत् पूजा करून तपस्येस आरंभ केला.)
अखेर अहल्येच्या संघर्षाला यश मिळाले. समाजाने तिचा स्वीकार केला. आज ही स्त्रियांवर बलात्कार होतात. पण तिला समाजात मनाचे स्थान मिळवून देण्यात आज समाज आणि राज्यव्यवस्था सबळ आहे का? त्या वेळी श्री राम होते, पण आज…
टीप: अन्न-जल ग्रहण केल्या बिना ही मनुष्य जिवंत राहू शकतो. गुजरात येथील अंबाजी मंदिराचे ९० वर्षाच्या अधिक वयाचे पुजारी गेल्या ६० वर्षाहून अधिक अन्न-जल ग्रहण करता जीवित आहे. भारताच्या सरकारी संस्थांनी सत्यता पारखण्यासाठी त्यांच्यावर प्रयोग ही केले आहे. NGO वर ही त्यांच्या वर कार्यक्रम बघितला होता.