दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला.
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. १९५३ मध्ये वडिलांच्या ‘शहंशाह’ या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. १९७१ मध्ये ‘अंदाज’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. “अंदाज’, “सीता और गीता’, “ब्रह्मचारी’ वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. “शोले’ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला “शान’ जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला “सागर’ चांगला चालला.
“शक्ती’मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने “बुनियाद’ या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला. “शोले’प्रमाणेच या मालिकेतील मास्टरजी, लाजोजी वगैरे पात्रे घराघरांत पोचली. रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून दिलेले अंदाज, सीता और गीता, शोले, शान, शक्ति,सागर, जमीन, भ्रष्टाचार, जमाना दीवाना, असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. रमेश सिप्पी यांनी दूरचित्रवाणी मालिका’बुनियाद’चेही दिग्दर्शन केले होते. ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती.
रमेश सिप्पी यांनी निर्माता म्हणून ब्रह्मचारी, कुछ ना कहो, ब्लफमास्टर, टॅक्सी नंबर 9211, चांदनी चौक टू चाइना, नौटंकी साला, सोनाली केबल या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी अभिनेत्री किरण जुनेजा यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे. रमेश सिप्पी हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) अध्यक्षपदी राहिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply