रमेश तामिळनाडू मधून एम.टेक. करण्यासाठी केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आला होता.त्याचे गाव पाँडेचरीच्या आसपास कुठेतरी होते. तामिळ पिक्चरचा जबरदस्त फॅन असलेला रमेश दिसायला आणि वागायला पण एकदम टिपिकल तामिळ सिनेमातले कॅरॅक्टर! उंच, सावळा, कपाळावरचे केस थोडेसे मागे गेलेले आणि टिपिकल रजनीकांत स्टाईल मिशा ठेवणारा. आम्ही सगळे त्याला “अण्णा” म्हणूनच हाक मारायचो! सिगारेट आणि केरळ मध्ये पॉप्युलर असलेली कळ्ळ ( माडी) चा शौकीन असलेला रमेश रंगात आला की रजनीकांत चे डायलॉग ऐकवायचा. त्यातल्या त्यात “शिवाजी” मधला रजनी त्याचा आवडता.
खरेतर त्याने अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.टेक. केले होते. ‘अण्णा युनिव्हर्सिटी’ ही तामिळनाडू मधील एक नामवंत युनिव्हर्सिटी आहे. बी.टेक. मध्ये सेकंड क्लास असल्यामुळे त्याने एम.टेक. करायचे ठरवले. एम.टेक. ला एडमिशन साठी ६० टक्के गुण असणे आवश्यक होते परंतु शासनाकडून मिळणाऱ्या सवलती मुळे त्याला त्यात सूट मिळाली होती. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मुळे त्याला सारी फी पण माफ होती. मूळचा हुशार असणाऱ्या रमेश मध्ये बेफिकीरपणा होता. एम.टेक. करताना पण तो तेवढासा सिरीयस नव्हता. कधी कधी तो, बारावीला त्याला मॅथ्स मध्ये शंभर पैकी शंभर गुण पडले होते आणि बी.टेक. करत असताना तो बॅच मेट्स ना कसे मॅथ्स शिकवायचा याचे किस्से ऐकवायचा! तामिळनाडू मधून तो केरळ मध्ये शिकण्यासाठी आला होता खरा पण मल्याळी लोकांबद्दल त्याचे काही चांगले मत नव्हते! इथले शिक्षक मुद्दामहून आपल्या असाईनमेंट्सना कमी मार्क्स देतात ही तक्रार तो बऱ्याचदा ऐकवायचा!
“यु विल नॉट फेस एनी प्रॉब्लेम दिनेशभाई, यु आर अ सन इन लॉ ऑफ केरला… दिज पीपल विल गिव्ह यू गुड मार्क्स!” एकदा तो मला म्हणाला होता!!
एम. टेक. चा कोर्स बऱ्यापैकी प्रॅक्टिकल वर आधारित होता. प्रत्येक विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा पण व्हायची. महाराष्ट्रात एम.टेक. च्या कोर्स मध्ये अशी प्रॅक्टिकल ची परीक्षा होताना कधी मी पाहिले नाही! तेथील प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची पद्धत इतर कॉलेजेस पेक्षा वेगळी होती. आम्हाला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन तीन चार तासांसाठी लॅब मध्ये सोडून दिले जायचे. इंटरनेट बंद केलेले असायचे आणि अधून मधून सर फक्त फेरी मारायचे. डिग्री प्रोग्रॅम ला घेतली जाते तशी कुठलाही एक्सपरिमेण्ट करून दाखवायची ती परीक्षा नव्हती!
त्या दिवशी “डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग” या विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा होती या विषयाची धास्ती सगळ्यांनीच घेतलेली असायची. याच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार फिल्टर डिझाईन करून त्याचा कोड (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम) लिहून तो कोड डीएसपी प्रोसेसर वर इम्प्लिमेंट करावा लागायचा आणि नंतर त्याला इनपुट सिग्नल देऊन मिळालेले आउटपुट हे दिलेल्या स्पेसिफिकेशन्स नुसार आहे की नाही ते दाखवावे लागायचे. नऊ जणांच्या बॅचमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असायचे त्यामुळे कोणी कोणाची कॉपी करेल हे शक्य नसायचं आणि दिलेल्या वेळेत आपले काम पूर्ण करणे हे ही महत्वाचे होते त्यामुळे कुणी कुणाला मदत करायच्या फंदात पडायचे नाही!
रमेश एक्झाम साठी गेल्यानंतर त्याला जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळालं तेव्हाच त्याला कळून चुकलं होतं की त्याच्याकडून हा प्रोग्रॅम लिहिणे काही होणार नाही! त्याच्या बॅचच्या नऊ स्टुडंट्सची परीक्षा सकाळच्या सत्रात होती आणि दुपारच्या सत्रामध्ये बाकीचे नऊ स्टुडंट्स येणार होते. त्यामध्ये त्याचा रूम पार्टनर पण होता. लॅब मध्ये कुणी सुपरवाझर नाही आहे हे बघून रमेशने त्याच्या पार्टनरला मोबाईल वरून प्रॉब्लेम स्टेटमेंट पाठवले आणि प्रोग्रॅम लिहून पाठवायला सांगितले! इकडे रूमवर त्याचा पार्टनर दुपारी परीक्षा असल्यामुळे अभ्यासात गर्क होता रमेशला प्रोग्रॅम लिहून पाठविण्यात त्याचा वेळ वाया जाणार होता. त्यामुळे त्याने त्याला मेसेज पाठवून दिला की त्याला काही हा प्रोग्राम लिहायला जमत नाही त्यामुळे तो पाठवत नाहीएय.
त्याचा मेसेज वाचून रमेश ची उरली सुरली आशा संपली! रमेशने पार्टनरला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या, पण तो काहीच करू शकत नव्हता! त्याच्याकडे आता करण्यासारखं काहीच उरले नव्हते. त्या दिवशी भारताची कुठलीतरी वन डे मॅच सुरू सुरू होती. प्रोग्रॅम लिहिणे जमत नाहीएय निदान क्रिकेटचा आनंद तरी घ्यावा म्हणून रमेश क्रिकेटचा स्कोअर बघायला लागला. तो स्कोअर बघण्यात गर्क असतानाच नेमके सर लॅब मध्ये आले. मोबाईल मध्ये डोळे घालून बसलेल्या रमेश कडे बघून त्यांनी त्याचा मोबाईल मागून घेतला.
“सार, आय एम नॉट कॉपिंग सार” रमेश त्याच्या टिपिकल तामिळ चा प्रभाव असलेल्या इंग्लिश मध्ये म्हणाला.
“आय नो, यु आर नॉट कॉपिंग बट लेट मी सी युर मोबाईल” पर्यवेक्षक म्हणाले.
“आय वोज जस्ट चेकिंग स्कोर सार” रमेश म्हणाला.
“ओके, बट गिव्ह युवर मोबाईल”
“येस सार, यु कॅन सी सार” असे म्हणून रमेश ने सरांकडे मोबाईल दिला.
मधल्या काळात इकडे हॉस्टेलवर त्याच्या पार्टनरला काय वाटले कुणास ठाऊक, आपली तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी रमेशने पाठवलेला प्रॉब्लेम सोडवला आणि आता सोडवला आहेच तर रमेश ला मेसेज पाठवूया म्हणून त्याने तो प्रोग्रॅम रमेशला पाठवूनही दिला!
सरांनी रमेश चा मोबाईल घ्यायला आणि त्याच्या रूमपार्टनर चा मेसेज यायला एकच गाठ पडली. त्यावेळी व्हाट्सएप नव्हते. SMS वरच बोलणे व्हायचे. मोठा मेसेज असेल तर तो तुकड्या तुकड्यात येई. प्रोग्रॅम मोठा असल्यामुळे सरांच्या हातातल्या मोबाईल वरचे मेसेज थांबत नव्हते!
सरांनी शांतपणे मोबाईल रमेश च्या समोर धरून विचारले
“रमेश, व्हाट इस धिस? कुड यु एक्सप्लेन?”
ते सारे मेसेज पाहून रमेश चा चेहरा बघण्यालायक झाला होता!
त्या परीक्षेत त्याचा ‘निकाल’ लागला हे सांगायला नको. तो अर्थातच नापास झाला. कालिकत युनिव्हर्सिटी च्या नियमाप्रमाणे कोणत्याही विषयात एकदा नापास झाले की पुढच्या प्रयत्नात कितीही मार्क्स मिळाले तरी “पास क्लास” मिळतो. त्यामुळे त्याला एम.टेक. ला पण पास क्लास वर समाधान मानावे लागले.
त्या दिवशी संध्याकाळी, ‘आधी नाही म्हणून नंतर प्रोग्रॅम का पाठवला’ या कारणावरून त्याची आणि पार्टनर ची चांगलीच जुंपली. रमेश च्या मते सारी चूक त्याच्या रूम पार्टनर ची होती! त्याच्या मते पार्टनरने अगोदर ‘नाही जमणार’ असा मेसेज पाठविल्यामुळेच तो बिनधास्त मोबाईल वर स्कोर बघत होता. त्याच्या मते अगोदरच जर पार्टनर ने त्याला ‘पाठवतो’ असे सांगितले असते तर तो सतर्क राहिला असता! अर्थात त्याच्या या लॉजिक ला पार्टनर कडे उत्तर नव्हते!
– श्रीस्वासम
Leave a Reply