मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता. ‘४ मर्यादित’चा तो संपूर्ण रूट माझा पाठ झाला होता. आजही मी कधी संधी मिळाल्यास, त्या रुटवरून प्रवास करतो. फक्त बसच्या ऐवजी मोटरसायकलने. आता हा रूट आपलं रुपडं बदलत चाललाय, पण तो अजूनही मला माझं लहानपण काही क्षणांसाठी मिळवून देत असतो.
पुढे मी जेंव्हा एकट्याने प्रवास करायला सुरुवात केली, तेंव्हा मग बसच्या ऐवजी ट्रेनने प्रवास करू लागलो. लालबागला मामाकडे जाताना दादरला उतरून मार्ग बदलायचा आणि करी रोड किंवा चिंचपोकळीला उतरायचं. मामाच्या घरापासून चिंचपोकळी स्टेशन अगदी जवळ, पण कधीतरी मामाकडे ‘भारतमाता’ समोरच्या कोपऱ्यावरच्या ‘श्रीकृष्ण दुग्धालया’तून काहीतरी खाऊ घेऊन जाण्याची आईची आज्ञा असे, तेंव्हा करी रोडला उतरायचं आणि श्रीकृष्णला भेट देऊन पुढे मामाच्या घरी जायचं..! आता ‘भारतमाता’ तिथेच असली तरी, ‘श्रीकृष्ण’ मात्र रिटायर झालंय..
तेंव्हापासूनच चिंचपोकळी आणि करी रोडचं एक वैशिष्ट्य माझ्या मनात ठसलं होतं, ते म्हणजे त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून वरच्या रस्त्यावर बाहेर पडण्यासाठी असलेले रॅम्प्. असा रॅम्प दादरच्या मध्य रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवरही होता. आहे. गम्मत म्हणजे दादर स्टेशन बाहेरच्या पश्चिमेच्या बाजूला, दक्षिण टोकाला असलेल्या फुलबाजाराच्या दारात असणाऱ्या पुलावर लोकांना चढण्यासाठीही रॅम्प होता. आता हा अस्तंगत होऊन तिथे जिना आलाय.
पुढे माझ्या फिरण्याची कक्षा रुंद झाल्यावर, तसाच रॅम्प, पश्चिम रेल्वेवरच्या माटुंगा रोड स्टेशनावरही आत आणि बाहेरच्या रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी असलेला माझ्या लक्षात आलं होत. हार्बर रेल्वेवेवर जाण्याचा प्रसंग आजवरच्या आयुष्यात अगदीच कमी आला, त्यामुळे तिकडच्या स्टेशनांवर असे रॅम्प आहेत की नाही याची मला माहित नाही, परंतु हार्बर आणि मध्य रेल्वेला वरच्या मजल्यावर काटकोनात सांधणाऱ्या सँडहर्स्ट रॉड या दुमजली स्टेशनावरही असा रॅम्प असल्याचं मला पुढे कधीतरी दिसलं. कुर्ल्याला आणि लोअर परेललाही असावा कदाचित, माहित नाही. . ही मोजकी स्टेशन वगळता मला इतरत्र कुठल्याही स्टेशनवर असे रॅप्स दिसलेले नाहीत किंवा असल्यास ते मी पाहिलेले नाहीत.
आणखी एका प्रकारचे लहान रॅम्प जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्मवर असायचे. प्लॅटफॉर्मच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना, आठ-दहा फुटांवर रुळांच्या पातळीत उतरणारे रॅम्प सगळ्याच स्टेशनांवर असायचे, ते आता नष्ट झाले आहेत. हे रॅम्प नष्ट झाल्याने, पूर्वी मला सुताराच्या फरशीच्या धारे सारखे वाटणारे प्लॅटफॉर्म आता लांब जास्त आणि रुंद कमी असणाऱ्या आयताकार चौकोनी ठोकळ्यांसारखे दिसतात.
जिने बांधण्याचा साधा सोपा पर्याय असूनही, हे असे चढते आणि उतरते रॅम्प का बांधले असावेत, हा प्रश्न माझ्या मनात तेंव्हा पासून मुक्कामाला होता. असे अनेक बिनकामाचे (म्हणजे पैसे मिळवण्यास अगदीच निरुपयोगी असणारे) प्रश्न माझ्या मनात भाड्याने राहत असतात. माझ्या मनात अश्याच भाडेकरूंनी अधिकृत घर बांधलेली आहेत. परवाच त्यापैकी एक भाड्याने राहायला असलेला प्रश्न – ‘चहा; ‘तो’ कि ‘ती’ – हा माझ्यापुरता सोडवून त्याला त्याच हक्ाकच घर मिळवून दिल होत. त्याचा प्रश्न सुटला आणि ‘काही मोजक्याच स्टेशनांवरच्या ह्या रॅम्प्सचं प्रयोजन कायं’, हा प्रश्न, ‘माझीही अडचण सोडावं म्हणत’ हट्टाला पेटला. हा प्रश्न हट्टाला पेटला त्याला कारण असं झालं की, मी हल्ली माझ्या कामानिमित्त माटुंगा रोड स्टेशनला जवळपास दररोज उतरतो. ह्या स्टेशनवर उतरण्यासाठी आणि बाहेरच्या रस्त्यावरही जाण्यासाठी दोन स्वतंत्र रॅम्प्स होते. होते म्हणजे अजूनही आहेत. परंतु ह्या स्टेशनवर नवीन ब्रिज बांधल्याने, प्लॅटफॉरवरून वरच्या पुलाजकडे जाणारा वांद्रे टोकाकडचा रॅम्प प्रवाश्यांसाठी बंद करण्यात आला आहे. हा मजबूत रॅम्प काही दिवसांत आपल्या नजरेआड होऊन, त्याजागी भविष्यात कधीही पडू शकणारा जिना बांधला जाण्याची शक्यता आहे. माटुंग्याला बाहेरच्या पश्चिमेकडल्या रस्त्यावर उतरणारा रॅम्प मात्र अजून वापरात आहे.
भविष्यात वर उल्लेख केलेल्या स्टेशनांवरचे रॅम्पही असेच नजरेआड होऊ शकतात. हे ऐतिहासिक रॅम्प नजरेआड होण्याच्या पूर्वी, अपंगांची सोय पाहाणं आतासारखं कायद्याने आवश्यक नसतानाही, ते त्याकाळात बांधण्याची आवश्यकता मुळात का पडली असावी, ह्या माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर शोधणं मला आवश्यक वाटलं.
हा असा प्रश्न पाडण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ते काही मोजक्याच स्टेशनांवर आहेत. दादर-करी रॉड-चिंचपोकळी-सँडहर्स्ट रॉड या चौकोनाटाळ्या स्टेशनवर हे रॅम्प्स दिसतात. बाकी उर्वरित सर्व स्टेशनांवर आपल्या नेहेमीच्या परिचयाचे जिने आहेत
कुठल्याही वाहतुकीच्या मार्गावरचे रॅम्प्स, वाहनात सामानाची चढ उत्तर करणे सोयीचे जावे यासाठी असतात, त्याचसाठी ती इथेही असावेत, हे याचं सोप्प उत्तर. वर उल्लेख केलेली ठिकाण पूर्वीच्या गिरणगावातली आहेत. त्यामुळे तिथे सामानाची चढ उत्तर होत असणारच. परंतु यातील सँडहर्स्ट रॉड आणि दादर ही स्टेशन वगळता, करी रोड, चिंचपोकळी आणि माटुंगा रोड ही स्टेशन काही मालाची चढ उत्तर करण्यासाठी फारशी प्रसिद्ध नव्हती. मग इथे रॅम्प्स का, ह्या प्रश्नाचं उत्तर, वरच्या सोप्या उत्तरापलीकडे जाऊन शोधण्याखेरीज पर्याय उरत नाही.
मुंबईचा अभ्यास करताना (पक्षी;मुंबईवरील वाचन करताना. मी अभ्यास करतो हे अनेक तज्ञांच्या पचनी पडत नसल्याने, ‘वाचन करताना’ असा या कंसात खुलासा केला आहे), एक ही सर्व जुनी स्टेशन्स. सुरुवातीच्या काळात बांधली गेलेली. आणखी एक गोष्ट माझ्या सतत लक्षत येत होती, ती ही, की हा सर्व भाग बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या, श्रीमंत पारशी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या आणि एतद्देशीय कामकऱ्यांच्या निवासाचा भाग होता. सर्व व्यापार मुंबई फोर्टमध्ये मर्यादित असल्याने, मोकळी जागा म्हणावी असा हाच परिसर होता. मुंबईच्या गव्हर्नरनेही आपला प्रासाद फोर्टातुन परळला हलवला होता. ब्रिटिश मरिनमधल्या बुखानन नांवाच्या एका बड्या अधिकाऱ्याचा ‘चिंट्झपुगली’ नांवाचा भव्य बंगला चिंचपोकळी स्थानकाच्या परिसरात होता आणि त्यावरूनच ‘चिंचपोकळी’ ह्या स्टेशनचं नामकरण झालं आहे, अशी माहिती डॉ. अरुण टिकेकरांनी त्यांच्या ‘स्थल-काल’ या पुस्तकात दिली आहे. ब्रिटिश गव्हर्नरच एक वीकएंड हाऊस सायनच्या किल्ल्यासमोरच्या डोंगरावर होत, अशीही माहिती डॉ. टिकेकरांनी दिली आहे. माटुंगा स्टेशनच्या पश्चिमेला डेव्हिड ससूननी बांधलेली ब्रिटिशकालीन उद्योग शाळा आहे. चिंचपोकळीच्या पश्मिमेला आर्थर रोडचा तुरुंग तर पूर्वेला भायखळ्याच्या डोंगरीच्या तुरुंग, ह्याच परिसरात हॉस्पिटल्सही मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यातली बरीचशी ब्रिटिशकालीन आहेत. बड्या अधिकाऱ्यांचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा निवासी भाग असल्याने, त्या अधिकाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आपल्या घरापासून फोर्टमधल्या आपल्या कार्यालयात जाण्यासाठी किंवा फोर्टातल्या अधिकाऱ्यांना या परिसरात जाण्या-येण्यासाठी रेल्वे सोयीची असावी आणि रेल्वेत बसण्यासाठी जाताना, आपल्या घरापासून रेल्वेच्या डब्यापर्यंत आपला आणि आपल्या पदाचा आब सांभाळत घोड्यावरून किंवा पालखी-मेण्यांतून थेट प्लॅटफाॅर्मवर जाणं येणं शक्य व्हावं यासाठी, ह्या मोजक्याच स्टेशनांवर ते रॅम्प बांधले असावेत, असं उत्तर मला विचारांती सापडत. ह्या सर्व स्टेशनांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे सर्व प्लॅटफार्म्स दुहेरी आहेत. एकाच प्लॅटफाॅर्मवर दोन बाजुंना अप आणि डाऊनला जाणाऱ्या गाडीत बसणं सोयीचं आहे. दोन्ही दिशांना जाणाऱ्या गाड्यांपर्यंत जाण्याचा उद्देश एकाच रॅम्पमधे साध्य होतो.
या स्टेशनांवरचे मोठे रॅम्प खाश्या स्वाऱ्यांसाठी आणि सर्वच फलाटाच्या दोन्ही बाजूंच्या टोकानावर असलेले लहान, रुळांमधे उतरणारे रॅम्पस सामानाची चढ उत्तर करण्यासाठी असावेत. रेल्वेच्या माल डब्यांचं प्रयोजन त्याचसाठी, गाडीच्या दोन बाजूच्या दोन टोकांवर, ड्राइव्हर आणि गार्डच्या निकट असत, ते त्याचमुळे असावं. आजही ते तसंच आहे.
आता घोडे-पालख्या गेल्या. आरामाचं महत्व जाऊन, व्यायमाचं(जबरदस्तीच्या) महत्व वाढलं. त्यामुळे रॅम्प्स संपत आले आणि जिने आले. पुन्हा कालचक्र फिरलं आणि आराम नसला तरी, सोय होणं महत्वाचं वाटलं आणि आता सरकते जीने आले. तरीही इतिहात तसं का होतं, ह्याची उत्सुकता मला होती. ‘बिना कारन कोई बात नही होती’ यावर माझा विश्वास असल्याने, त्याकाळात तसं का होतं ह्याचं उत्तर शोधण्याचा मी केलेला हा एक (माझ्यापुरता)प्रामाणिक प्रयत्न..!!
ही माहिती कुठे नोंदलेली आहे की नाही, त्याची मला माहिती नाही, परंतु ‘काही स्टेशनांवरच रॅम्प्स का’, या प्रश्नाचं माझ्या तर्कबुद्धीने दिलेलं हे उत्तर आहे. त्याचा खरे-खोटेपणा तरासायचं काम मी तुमच्या तर्कबुद्धीवर सोडतो आणि थांबतो..
–©️नितीन साळुंखे
9321811091
09.05.2019
लेख अतिशय विचाराना चालना देणारा आहे. गिरण्या कारखाने या करता लागणारी मोठे मशीन पार्ट नेण्यास हा मार्ग सुलभ असावा, हाही एक तर्क