नवीन लेखन...

रम्य ते बालपण : धनराज खरटमल

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये धनराज खरटमल यांनी लिहिलेला हा लेख


संथ तलावाच्या पाण्यावर भिरभिरता दगड मारावा, त्या तलावावर बालपणीच्या आठवणींचे तरंग उमटावेत आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव तरंगावेत, असे काहीसे आपल्या बालपणीच्या आठवणींबाबत आजही घडत असते. याच आठवणींचे तरंग आयुष्याच्या संध्याकाळी मनात दाटून यायला लागतात.

साठच्या दशकात कुर्ल्यातल्या माळरानावर आम्ही राहायला आलो तेव्हा माझ्या बाबांनी जागा घेऊन तेथे एक चाळ बांधली होती. मुंबईत कधी काळी माळरानेही अस्तित्वात होती हे वाचून खरे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सभोवार उघडे माळरान आणि आसपास काही चाळी. आमची चाळ कुर्ला आणि घाटकोपरच्या सीमेवर असल्याने सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेले विद्याविहार स्टेशन अगदी आमच्या नजरेच्या टप्प्यात होते. अजून आमच्या चाळीत ‘विज’ नावाची गोष्ट यायची होती. पिण्याच्या व धुण्याच्या पाण्यासाठी मात्र म्युनिसिपालटीचा नळ होता. त्याकाळी एखादी मोटारगाडी पाहणे ही सुद्धा आमच्यासाठी चैन होती.

थंडीच्या दिवसात विद्याविहारजवळील शाळेत जाणे म्हणजे आमच्यासाठी दिव्य होते. कारण थंडीच इतकी असायची की आमचे दात कडाकडा वाजायचे. धुक्यामुळे समोरचे काही दिसणेही मुश्किल व्हायचे. पण न चुकता मात्र रोज शाळेत जावेच लागे. नाही गेलो तर मास्तरांची छडी दुसऱ्या दिवशी आमची वाट पाहत राहायची. खेळण्यासाठी घराच्या आजूबाजूला उघडे-मोकळे माळरान व काही छोट्या-मोठ्या टेकड्या होत्या. रविवारी सुट्टीचा दिवस असला की मग अर्ध्या चड्डीच्या खिशात गोट्या भरून खेळण्यासाठी धूम पळायचो. संध्याकाळी भोवरा, हुतूतू व कबड्डी, पावसाळ्यात खेळण्यासाठी एक लोखंडी सळई. रानोमाळ उगवलेल्या रानफुलांच्या झुडपांतून फुलपाखरासमवेत भिरभिरणे, ही आमच्या खेळातली श्रीमंती होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्तमानपत्राच्या लांब शेपटीच्या स्वत:च बनवलेले पतंग उडविणे ही तर खरी गम्मत होती. कैऱ्या पाडणे, चिंचा पाडणे, झाडांवर चढणे, उड्या मारणे, एकच टेलिफोन साया वस्तीत वापरणे हे ही आमच्यासाठी मौल्यवान होते त्या काळात.

सन १९७१ मधले भारत-पाक युद्धही बालपणी आम्ही अनुभवले. डोक्यावरून सूं-सूं करत जाणारी फायटर विमाने, रात्रीच्या वेळी उडणारे दारूगोळे, ब्लॅक आऊटचा भोंगा वाजला की साऱ्या वस्तीत काळा-कभिन्न अंधार पसरायचा. मग आकाशवाणीवरून सूचना यायची की पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली आहेत. पण त्यांना चकविण्यासाठी अरबी समुद्रात दिवे सोडण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सावधानतेचा भोंगा वाजला की सारे पटापटा घराबाहेर यायचे आणि उघड्या माळरानावर आपल्या पोटावर झोपायचे. न जाणो शत्रूपक्षाने बॉम्बहल्ला केला तर त्यातून बचावण्यासाठी ही क्लृप्ती आम्हाला थोरामोठ्यांनी सांगितलेली होती. भारताच्या रणरागिणी इंदिरा गांधी यांनी बांगला देशाची निर्मिती केली आणि भारत-पाक युद्ध संपले. साऱ्या जगात भारताचा बोलबाला झाला…

सन १९७२ साली साऱ्यांना गिळंकृत करायला महाभयानक दुष्काळ आला. अन्नपाण्यावाचून सारे मोताज झाले. घोड्यांना खायला घातला जाणारा गहू अमेरिकेने उदार मनाने लोकांसाठी पाठविला. त्यावेळचा उकडा तांदूळ ही तर आमच्यासाठी भात खाण्याची पर्वणी होती. नंतर पुढच्याच तीन वर्षांत म्हणजेच जून १९७५ मध्ये भारतात लागू झालेल्या आणिबाणीचाही आम्ही आमच्या बालपणात पुरेपूर अनुभव घेतला. त्याच साली आलेल्या दूरदर्शनने छायागीताच्या माध्यमातून साऱ्या वस्तीला एकत्र होण्यास भाग पाडले. त्या काळच्या गणेशोत्सवात रस्त्याच्या मध्ये लावलेला चित्रपटाच्या पडद्यावर रात्र-रात्र जागून चित्रपट पाहणे म्हणजे खऱ्या अर्थाने चित्रपट अनुभवणे होते आमच्यासाठी. नंतरच्या काळात रामायण-महाभारतानेही अघोषित कर्फ्यू लागू केला होता. आज संपूर्ण काळ बदलला आहे. सारे जीवनच झपाट्याने बदलत चालले आहे. आजची मुले स्मार्ट झालीत खरी, पण जीवनाचे सार मात्र त्यांच्यात उतरलेले दिसून येत नाही. कधी काळी पाच-दहा पैशांसाठी आई-बाबांमागे लागणाऱ्या आपणाला जेव्हा आपली मुले पाचशे हजार जेव्हा अगदी सहज मागतात तेव्हा आपल्या मुलांचे बालपण मोठे झालेले नसून पैसा मोठा झाला असेच म्हणावे लागते.

तर अशा होत्या माझ्या रम्य बालपणाच्या आठवणी. सारेच काही शब्दांकित करणे शक्य होत नाही, पण या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात सदैव तरंगत आहेत व तरंगत राहणार आहेत.

–धनराज खरटमल
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..