नवीन लेखन...

रम्य ते बालपण – लेखमालिका परिचय

अनघा दिवाळी अंक २०१९ मध्ये संपादिका सौ. विद्या नाले यांनी लिहिलेला ‘रम्य ते बालपण’ या लेखमालिकेचा परिचय.


दोन शब्द…

अनघाने गेले ४० वर्षे दिवाळी अंक देताना मराठी रसिकांची आवड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ४० वर्षांत धार्मिक अंक, विविध विषयांवर बेतलेले अंक तर काही वर्षी एखादा विषय देऊन मान्यवरांचे लेख मागविले होते. हा ४१ वा अंक मराठी रसिकांना ‘रम्य ते बालपण’ हा विषय विविध क्षेत्रात आपला कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तींकडून लेख मागितलेले आहेत. माझी खात्री आहे आपल्याला या प्रत्येकाचे अनुभव ऐकून बऱ्यापैकी करमणूक होईल.

आता ज्या २० व्यक्तींचे लेख या अंकात अंतर्भूत आहेत त्याविषयी थोडेसे. आपल्या स्वच्छ कारभाराचा ठसा परिवहन आयुक्त व अन्न व औषध आयुक्त म्हणून गाजविणारे श्री. महेश झगडे या सनदी अधिकाऱ्यांनी पूर्व आयुष्यातील जे अनुभव सांगितले आहेत त्यावरून त्यांची कडक शिस्तीचे अधिकारी याबरोबरच त्यांची संशोधनाची आवड देखील आपल्या लक्षात येईल. दुसरे सनदी अधिकारी श्री. चंद्रशेखर ओक यांनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी, तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषविले आहे. आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाने शासकीय सेवेत जसा आपला ठसा उमटविला तसाच जनमानसातदेखील त्यांची प्रतिमा उंचावली. मोठमोठ्या पदांवर काम करताना त्यांनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. शिवाजी पार्कवर राहणाऱ्या मोहन वर्दे यांनी रिलायन्स कंपनीत सिनीअर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली आहे. त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना बालमोहन विद्यालय या ख्यातनाम शाळेचे नामकरण कसे झाले हे सांगितले आहे. डॉ. श्रीकांत तारे हे ख्यातनाम प्राध्यापक इंजिनीयरिंग महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे बालपणीचे अनुभव आपल्या मनाला स्पर्शन जातात. डॉ. बाळासाहेब सूर्यवंशी यांचे नाशिकला भव्य हॉस्पिटल आहे. अत्यंत गरीबीच्या परिस्थितीतून आलेल्या बाळासाहेबांनी तरीदेखील एम.डी. ही पदवी आपल्या अंगभूत हुशारी व जिद्दीच्या जोरावर मिळविली. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी या अतिशय हृद्य आहेत. जयवंत वाडकर हे हिंदी-मराठी नाट्य-सिनेपटलावर गाजलेले नट. यांच्या बालपणीच्या आठवणी रम्य वाटतात. तर प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांच्या भरजरी आयुष्याला बालपणीच्या त्यांच्या घरातील विरोधाची कशी झालर चिकटलेली होती व त्यातून त्यांनी आपले शिक्षण कसे पूर्ण केले ही कहाणी वाचनीय आहे. धनराज खरटमल या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने आपली लक्षात राहण्याजोगी कथा येथे मांडली आहे. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे व स्वाती पाचपांडे या स्त्रीद्वयींनी आपला बालपणीचा ठेवा इथे उलगडून दाखविला आहे. डॉ. महेश केळुसकर या ‘झिनझिनाट’ कवीने आपले बालपण कसे मार खाण्यात गेले व ते कसे प्रगल्भतेकडे वळत गेले याची साद्यंत कहाणी येथे कथन केली आहे. चित्तरंजन भट हे गझलनवाज सुरेश भटांचे चिरंजीव. म्हणतात ना गवयाचे पोर सुरातच रडते. तद्वतच उभ्या महाराष्ट्राला मराठी गझलचे ज्यांनी वेड लावले, कित्येक होतकरू तरूणांना ज्यांनी गझलची बाराखडी शिकवून तयार केले त्यांच्या मुलाच्या रक्तात गझल नसती तरच नवल! आठवीत असताना चित्तरंजनने लिहिलेली पहिली गझल अनघाच्या दिवाळी अंकात झळकलेली आहे. त्यांचे अनुभव गझलेबद्दलचेच आहेत. नितीन निगडे हा तरूण चित्रकार, आपल्या अंगभूत गुणांनी त्यांच्या व्यवसायात मानाचे स्थान पटकावून वावरतो आहे. तर रवींद्र मांडे हे शासकीय अधिकारी आपल्या रसिंक मनोवृत्तीने चवीचे आयुष्य जगत आलेले आहेत. आपली रसिकता उत्कृष्ठ पुस्तकांचे वाचन व निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणे यांनी त्यांचे जीवन समृद्ध केलेले आहे. सतीश भावसार या मुखपृष्ठ चित्रकाराने तर मराठी वाङ्मयातील रसिकांना वेडच लावले आहे. मराठी पुस्तकं प्रसिद्ध झाल्यावर मराठी वाचक पुस्तकाचे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी काढले आहे म्हटल्यावर खरेदी करतात ही त्यांच्या कलेची दाद मराठी वाचकांनी दिलेली आहे. त्यांचे बालपणाचे अनुभव सामान्यांहून वेगळेच आहेत. शिरीष जोशी हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असून बालपणी त्यांनी काय काय भोगले याची कहाणी मोठी उद्बोधक वाटते. किरण वालावलकर यांनी कष्टाची परिसीमा गाठून व्यवसायात अढळ स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या अनुभवाने रसिकांचे नक्कीच रंजन होईल. मुरलीधर नाले शासकीय अधिकारी होते परंतु खानदेशातील छोट्या गावात त्यांचे बालपण कसे गेले व प्राप्त परिस्थितीत त्यांनी अनुभवलेले ते मंतरलेले क्षण कसे मोरपिसासारखे त्यांनी मनाच्या खोल गाभाऱ्यात जपून ठेवले हे खुमासदारपणे त्यांनी चितारलेले आहे. यजुवेंद्र महाजन या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने प्राध्यापिकी न करता समाजातील उपेक्षित वर्गासाठी जे काम चालू केले आहे ते अमूल्य आहे. सुरेश पाटील यांनी आईवडिलांच्या संस्कारांमुळे त्यांच्यावर गुदरलेला भयंकर प्रसंग कसा झेलला व त्यातून ते कसे बाहेर आले याची कहाणी सांगितली आहे.

अशा या विविध क्षेत्रातील व्यक्तींचं बालपणीच्या एकत्रित कथा येथे आपल्याला देताना मला आनंद होत आहे. या सर्व लेखकांचे, अंकाची जुळवणी करणारे आमचे जुने भावेसर, अंकाची मांडणी व मुखपृष्ठ करणारे रघुनाथ गुराम तसेच प्रिंटर व बाईंडर यांचे आभार. तसेच आमचे जाहिरातदार व रसिकांचे आभार मानून आपल्या सर्वांची दिवाळी आनंदाची जावो, अशी इच्छा प्रकट करते.

– सौ. विद्या नाले, (संपादिका)

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..