नवीन लेखन...

रम्य ते बालपण : सुरेश पाटील

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये सुरेश पाटील यांनी लिहिलेला हा लेख


माझी शाळकरी कन्या समृद्धी आज म्हणते, की मला परत लहान व्हायचंय! वाक्य साधं असलं तरी ‘बालपण’ नावाचं अवघे विश्व त्यामध्ये सामावलं आहे. आपण जसजसे मोठे होत जातो, तसे आपल्याला आपण काही तरी हरवत चाललो आहोत, आपल्या हातून काहीतरी सुटत चाललं आहे याची जाणीव होते व ती अशा शब्दातून बाहेर पडण्याची शक्यताच जास्त. आजची महाकाय स्पर्धा, दैनंदिन चढ-उताराचे ओझे अन् या बिकट समयी आपण मोठं होत असल्याची व आपल्या जवळच्यांचं हातात घेतलेलं बोट सुटू पाहत असल्याची जाणीव होणं, भीती वाटणं साहजिकच आहे. मात्र, बालपण हे गरगरा फिरणाऱ्या भिंगरीसारखं असतं. आपण फक्त त्यावर लक्ष ठेवून गती सांभाळली म्हणजे त्यातला प्रशिक्षण रम्यपणा आयुष्यभर टिकतो. मी ‘दाह’ सारखी दाहक कादंबरी लिहिली. नक्षलवादासारखा विषय ‘नक्षलवारी’ सारख्या सदाहरीत (हे वाचकांचं मत) कादंबरीत हाताळला. या बलदंड कादंबऱ्या लिहिण्यापाठीमागे प्रेरणा कुणाची होती, हा प्रश्न मला सातत्याने विचारला जातो. त्यापाठीमागे होतं माझं बालपण व ते सजवणारी हौसाई नावाची समाजमनाची सातत्याने दखल घेणारी आई व महिपती नावाचा खऱ्या अर्थाने महानायक असलेला बाप.

रूढार्थाने मला ‘रम्य ते बालपण’ असं म्हणावं की नको, हा प्रश्न पडतो. कारण, आमचं बालपण गेलं ते दैनंदिन कामाशी, निसर्गाशी झट्या देत. आम्ही बालपणापासूनच घरातील कामाबरोबरच शेतीत रमलो. चिमुकली पावलं टाकत घरातल्या एखाद्या बुजुर्गाचं बोट पकडून किंवा त्यांच्या भोवती बागडत शेतात काम करीत असलेल्यांचं जेवण (याला ग्रामीण भागात भाकरी घेऊन जाणं असंही म्हणतात) घेऊन जाणं, अनेकदा औतही हाकणं, जनावरांपाठीमागचं शेण काढणं, त्यांच्या दावणीत वैरण टाकणं, थोरा-मोठ्यांबरोबर गवताच्या (चाऱ्याच्या) पेंढ्या आणणं, जनावरं शेळ्या चारायला घेऊन जाणं, जवळपास एखादा उसाचा फड असेल तर दाबून ऊसही खाणं, शेंगा, रताळी, गाजरं, बिब्या, आंबे, जांभळं, करवंद आदी बाबीही आल्याच. त्याकाळात आमच्याकडे एक-दीड किलोमीटरवरून नदीचं पाणी आणावं लागायचं… त्या छोट्या कळशा घेऊनही आम्ही पाणंदीत वाटचाल करायचो. एकंदरीत काय तर… आमच्या बालपणाबरोबरच आम्ही प्रौढही होतो. फक्त त्याची त्यावेळी जाणीव नव्हती. अर्थात, घरातल्या कामाला टांग मारून इतर मुलांबरोबर त्यांनाही कामं असायचीच, पण, बालपण… विटी-दांडू, पत्ते, हुडकी-तुडकी, कबड्डी आदी खेळी खेळत असू. मात्र, असं काही सुरू असलं की आम्ही उनाड ठरायचो. बरे, इतकं करूनही थांबायचं नाही… शाळा नावाचं लोढणं गळ्यात होतंच अन् ते करावंच लागायचं. नाहीतर, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी माझे वडील शाळेत यायचे व शिक्षकाला विचारायचे, ‘सुरेश, शाळेत का येत नाही?’ दांडी मी मारायचो, अन् ताप त्या शिक्षकाला व्हायचा. साप, विंचू चावण्यापासून जंगली, गावठी प्राण्यांच्या हल्ल्यापर्यंत अनेक संकटांचा मी स्वतः सामना केला तरी त्यावेळी आपल्या पाठीवर असलेल्या हाताची जाणीवही तितकीच प्रखर असायची.

निसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे. माझे वडील महिपती पाटील हे गावचे पाटील. त्यांच्याबरोबर जाताना छाती हातभर पुढे यायची. पहाडासारखा माणूस. तितकाच मनमिळावू. त्यांचा आवाज मोठा. मी जनावरं चारायला घेऊन चाललो असलो व दुरून कुठून तरी येणारा वडिलांचा आवाज जनावरांच्या कानावर पडला तर जनावरंही त्यांना भेटण्यासाठी सैरभैर व्हायची. हे प्रेम… एका संताबरोबरच माझी वाटचाल सुरू होती. त्यांच्याबरोबर जंगलात जायचो, तेव्हा ते अनेक वनस्पतींची माहिती द्यायचे, त्यांचे औषधी गुणधर्म सांगायचे. आज काही वनस्पतींचे औषधी गुण मला माहीत आहेत व ते मी इतरांबरोबर शेअरही करीत असतो. आवाजावरून कोणता प्राणी असेल हे कसं ओळखायचं, जंगली प्राण्यांच्या सवयी, त्यांचं वागणं आदी बाबींची ओळख मला वडिलांकडूनच मिळाली. सध्या साहित्य क्षेत्रात बोलबाला असलेल्या ‘नक्षलबारी’ या कादंबरीतल्या जंगलानं वाचक मोहरून जातात. कादंबरी दोनदा वाचली, तिसऱ्यांदा घेतोय असे सांगण्यासाठी मला फोन येतात, तेव्हा वाचक आवर्जून जंगलाचा उल्लेख करतात. पण, हे जंगल वाचण्याचं, समजून घेण्याचं बाळकडू मी माझ्या वडिलांकडूनच घेतलं, ही श्रीमंती त्यांचंच देणं आहे. मी ‘नक्ष्ज्ञलबारी’, ‘दाह’सारखी कादंबरी लिहिताना अनेक स्त्री पात्रं रंगवली आहेत. मात्र, ती रंगवताना मला माझ्या आईनं वेळोवेळी घेतलेल्या मतांचा, दृष्टीकोनांचा फारच मोठा हातभार लागला. बालपणात वेगवेगळ्या प्रसंगात तिचा वाचलेला चेहरा हा जगातल्या सर्वच स्त्री वर्गाचा चेहरा असल्याचं आजही मी ठामपणे सांगू शकतो. माझ्या साहित्यातील स्त्री पात्रं खूपच कणखर असल्याचंही अनेक जण सांगतात. कदाचित, आईनं माझ्यावर केलेल्या संस्काराची खोली खूपच मोठी असावी. एकंदरीत काय तर, त्या काळातील आजूबाजूची परिस्थिती, माणसं ही आपल्या मनावर इतकी बिंबतात, की ते पुढील आयुष्यासाठी आपले दिशादर्शक ठरतात, असतात.

बालपण म्हणून मी तरी वेगळं असं काही जगलोच नाही. जे घडत होतं… ते छान होतं, मनाला भावत होतं. घरातली कामं करण्याबरोबरच बागडायलाही मिळत होतं अन् ते अनुभव कमालीचे समृद्ध होते. माझे ज्येष्ठ बंधू विश्वास पाटील हे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण, त्यांनी माझ्यावर मी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याचा जाहीर आरोप विविध चॅनेल्सच्या कॅमेऱ्यासमोर केला (त्याबाबत दोन दिवसांत ते पुरावे देणार होते, पण आजतागायत त्यांना ते जमलेलं नाही. स्वत:ला शहाणं ठरवत बालपणात काय घ्यावं, हे कळलं नाही की असं तोंड फोडून घेण्याची वेळ येते, हेही मान्य करायलाच हवं), तसेच मी त्यांचा प्रमोद महाजन करणार होतो, म्हणजे खून करणार होतो… असंही त्यांनी एका वर्तमानपत्रात छापवून आणलं. त्यावेळची समाजमनाचा रेटा पाहिला तर त्याठिकाणी ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, अशी व्यक्ती कोलमडून, उन्मळून गेली असती. पण, माझ्याबाबतीत असं झालं नाही. कारण, आई-वडिलांनी केलेले बालपणातले संस्कार. कोणत्याही संकटात पाय रोवून उभा राहण्याचं दिलेलं बळ इथं माझ्या कामी आलं. मात्र, या निमित्ताने मी इतकंच सांगू शकतो, की माझं बालपण संपलेलं नाही. ते आजही सोबत घेऊनच मी वाटचाल करीत असल्याने ते शक्य झालं. लहान असताना प्रौढत्व सोबत होतं, आज प्रौढत्वात बालपणही वाटचाल करीत असल्यानेच हे खळाळतेपण कायम आहे. उगाच रम्य ते… म्हणत ऊसासे टाकण्यापेक्षा मी ते अंतीम क्षणापर्यंत सोबत ठेवू इच्छितो व ते सोबत राहणारच आहे. अन्यथा सगळंच निरस होऊन जाईल.

–सुरेश पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..