वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी खेडेगावातील मंदिरात रात्री कीर्तनं होत असत. अशाच एका खेडेगावात एका महाराजांचं कीर्तन ठरलं. गावातील प्रतिष्ठित माणसाच्या घरी ते संध्याकाळी पोहोचले. चहापाणी झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कीर्तन सुरु केलं. मंदिर गावकऱ्यांनी भरुन गेलं होतं. दोन तास कीर्तन व नंतर हरिजागर रंगलं. ते संपल्यावर गावकरी आपापल्या घरी गेले.
रात्री मुक्काम करुन सकाळी महाराज आपल्या गावी निघाले. तेवढ्यात एका म्हातारीने त्यांना वाटेत अडवलं. ती महाराजांना म्हणाली, ‘महाराज, रात्री कीर्तन छान झालं. माझ्या घरी येता का? तुम्हाला दक्षणा द्यायची आहे.’ म्हातारी पुढे, ते मागे असे चालत तिच्या झोपडीत गेले. म्हातारीने बसायला पोतं टाकलं, त्यावर महाराज बसले. म्हातारीने चुलीवर चहा करायला ठेवला व गाडग्या मडक्यात ती पैसे शोधू लागली. शेवटी एका गाडग्यात तिला पाच रुपयाचं नाणं सापडलं. ते नाणं तिने महाराजांच्या हातावर ठेऊन त्यांना नमस्कार केला. बिन दांड्याच्या कपातून महाराजांनी चहा प्यायला व म्हातारीचे आभार मानून ते बाहेर पडले.
ते महाराज म्हणजेच मूळचे सोलापूरचे व आता पुणेकर झालेले चित्रकार, कीर्तनकार, कलाशिक्षक, कवी, लेखक, पत्रकार, नाट्य कलावंत, संगीतकार असे अष्टपैलू उल्हासजी वेदपाठक! त्या म्हातारीने दिलेल्या मौल्यवान पाच रुपयांच्या नाण्याची ‘दक्षणा’ वेदपाठक सरांनी अजूनही जपून ठेवलेली आहे. आजोबांची वारकरी संप्रदायिक परंपरा त्यांनी आषाढीची वारी व कीर्तनाच्या माध्यमातून आजवर चालू ठेवलेली आहे.
सरांचा जन्म १९५६ सालचा. घरात आजी, आजोबा, आई, वडील, चुलते असं मोठं कुटुंब. उल्हास मोठे, त्यांच्यानंतर दोन भावंडं. वडील पेशाने रंगात रंगून जाणारे कुशल चित्रकार. पंचक्रोशीतील माणसांची आॅर्डरप्रमाणे ते पोर्ट्रेट करुन द्यायचे. शिवाय दुकानावरील बोर्ड, इमारतींचे रंगकाम करायचे. जुन्या पद्धतीच्या कॅमेऱ्यावर फोटोही काढायचे. निगेटिव्ह वरुन प्रिंट काढण्यासाठी त्यांनी एन्लार्जरदेखील तयार केला होता. अपेक्षेपेक्षा मिळकत तशी कमीच व्हायची. परिणामी तुटपुंज्या आमदनीत त्यांना घर चालवावे लागायचे.
प्राथमिक शिक्षण होईपर्यंत वडिलांना रंगकामात मदत करणारा उल्हास सातवीपासून स्वतंत्र कामे करु लागला. दिवाळी जवळ आली होती. एक गोदामाला चुना मारण्याचं काम मिळालं. उल्हासने भावाला बरोबर घेऊन काम करायचं ठरवलं. मजुरी मागितली पन्नास रुपये, पण घासाघीस करुन तोंडावर दिवाळी आल्याने गरज म्हणून शेवटी ठरली तीस रुपये! त्या गोदामवाल्याला आदल्या दिवशी चुना भिजवून ठेवायला सांगितले होते. तो विसरुन गेला. दुसरे दिवशी कामाच्या आधी तासभर त्याने चुनखडी मोठ्या बादलीतील पाण्यात घातली. उल्हास भावाबरोबर स्वतःच वाकापासून तयार केलेला कुंचा घेऊन आला. चुन्याची निवळी शांत झालेली दिसत होती. उल्हासने चुना ढवळून घेण्यासाठी बादलीत हात घातला, तो काय.. चुन्याच्या उष्णतेने हात भाजलाच नाही तर तो पोळून निघाला. हाती आलेलं काम तर गेलंच, शिवाय दिवाळीही साजरी करता आली नाही.
दहावी झाल्यानंतर उल्हास बार्शीला गेला. तिथे सकाळी काम व रात्री नाईट स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेतले. एटीडी करायचं होतं पण परिस्थितीमुळे ते करता आलं नाही. आर्ट काॅलेजला जाऊन बीए, एमए केलं. या काळात केलेल्या अनेक कवितांची वही पूर्ण भरलेली आहे. दरम्यान नोकरीचा शोध चालूच होता.
चित्रकलेबरोबर लिहिण्याची आवड तर पहिल्यापासूनच होती, म्हणूनच उल्हासने ‘साप्ताहिक सिनाटाईम्स’ साठी लेखन केलं. पत्रकारीता करताना पत्रकारांच्या मोर्चामध्ये प्रतिनिधित्व केलं. त्यामुळे अटक झाली. पाच दिवसांसाठी औरंगाबाद येथील जेलमध्ये रवानगी झाली. त्या पाच दिवसांत पत्रकारीतेतील ज्येष्ठ दिग्गजांचा सहवास लाभला.
‘संचार’ मध्ये स्फुट लेख लिहित असताना ‘जिव्हाळा’ या मतिमंद मुलांच्या शाळेचे संस्थापक, प्राचार्य श्री. ए. बी. राजमाने व त्यांचे मित्र थोर विचारवंत पैगंबरवासी प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सर यांच्यामुळे उल्हासला या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. उल्हासनं या संधीचं सोनं केलं. पहिल्या वर्षी त्यानं बिनपगारी काम केलं. दुसऱ्या वर्षापासून महिना ५० रुपये पगार मिळू लागला. ही शाळा होती मतिमंद मुलांची. त्या मुलांना चित्रकला, संगीत व गाणी शिकवणं सुरु केलं. या मुलांना त्यांचे पालक शाळेत घेऊन यायचे व शाळा सुटल्यावर घेऊन जायचे. अशा मुलांना त्यांच्या कलाने शिकविण्याचे अवघड काम पस्तीस वर्षे उल्हासने मन लावून केले.
शाळेकडून जाणाऱ्या शिक्षकांच्या यादीमध्ये उल्हासचे नाव समाज कल्याण खात्याकडे गेले. त्यांनी उल्हासला एटीडी करण्यास सांगितले. सकाळी एटीडीचे काॅलेज व दुपारी शाळा करुन त्याने शिक्षण पूर्ण केले. साहजिकच या पदवीमुळे उल्हासचा पगार वाढला.
१९८६ ला उल्हासच्या मित्रांमधील एका मित्राने त्याच्या बहीणीबरोबर लग्न करशील का? अशी विचारणा केली. उल्हासने तयारी दर्शवली पण काही अटी घातल्या. हुंडा घेणार नाही, फालतू खर्च करणार नाही अगदी पत्नीला मंगळसूत्रही घालणार नाही. घरी न सांगता आॅन ड्युटी उल्हासने रजिस्टर लग्न केले. मित्राचे कपडे घालून लग्नाला तो उभा राहिला व एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर सरळ शाळेत पोहोचला.
नवरा शाळेत, नवरी तिच्या घरी. दोन महिन्यांनंतर दोघांचा एकत्र संसार सुरु झाला. संस्थेने प्रेशर कुकर त्यांना भेट दिला. नंतर घरी सर्वांना कळले. संसार फुलला. तीन मुली व एक मुलगा असं कुटुंब सुखानं नांदू लागलं. जीवनात अनेक वेळा आर्थिक अडचणी आल्या. प्रसंगी भेळीचं दुकान चालवून घर चालविले.
मुलींची शिक्षणं, लग्नं झाली. मुलाने इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला. आज तो मोठमोठ्या इव्हेंटची कामे करतो आहे. निवृत्त झाल्यानंतर सोलापूरहून पुण्यात येऊन तीन वर्षे झालेली आहेत. इथं आल्यावर वेदपाठक सरांनी भरपूर पेंटींग्ज केली आहेत. सरांचा पिंड हा पैशाकरता कला नसून ‘कलेकरता कला’ असा आहे. त्यांच्याशी बोलताना कीर्तनाच्या अनुषंगाने केलेले अफाट वाचन लक्षात येते. अध्यात्माविषयी त्यांचा अभ्यास दांडगा आहे.
सोलापूरामध्ये वेदपाठक सरांनी चार वेळा ‘काव्य-चित्र’ प्रदर्शन भरविले. १९९३ साली सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी ‘काव्य-चित्र’ प्रदर्शन मांडले होते.
पुण्यात आल्यावर बालगंधर्व कलादालनात पेंटींग्जचे भव्य प्रदर्शन भरवलं. त्याच प्रदर्शनात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार सर यांनी वेदपाठक सरांचा आमच्याशी परिचय करून दिला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी पु. ना. गाडगीळ यांच्या कोथरूड येथील कलादालनात पेंटींग्जचे प्रदर्शन भरवलेले होते. बहुतांशी पेंटींग्ज ही ज्ञानेश्वर, तुकाराम, विठ्ठल, वारी अशी अध्यात्मावरची होती. पुण्यातील अनेक रसिकांनी व चित्रकारांनी या प्रदर्शनास भेट दिली. त्यांना चित्रकार म्हणून मान्यता जशी सोलापूरमध्ये मिळाली, तशीच पुण्यात आल्यावरही मिळू लागली. आजपर्यंत पुण्यातील अनेक मान्यवर चित्रकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट दिलेली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये वेदपाठक सरांच्या चित्रांची संख्या दुपटीने वाढली आहे. आता या वर्षी मोठ्ठे प्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची ही इच्छा लवकरच फलद्रुप होवो, ही सरांना माझ्यातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!!!
– सुरेश नावडकर ९-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply