रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात,
एकत्र येऊन फिरतात,
पंचमी साजरी करतात,–!!
निळेशार राखाडी पांढरे,
मेघांची लगीनघाई,
इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,–!!!
प्रभात काळी एकेक रंग,
उषा क्षितिजावर उधळते,
पिवळे निळे काळे तांबडे,
त्यात सोनसळी भर असे,–!!!
कुठून येई,लख्ख प्रकाश ,
खजिनाच वर वर येई,
ढगांआडून प्रकाशदाता,
सगळ्यांना आपुले दर्शन देई,–!!!
सकाळ होता राज्य त्याचे,
सम्राटाची सारी जादू ,
रंग पिवळसर सोनेरी,
लागतो पसारा मांडू,–!!!
श्यामल संध्या गगनी येतां,
पुन्हा रंगांचीच लीला,
तांबडे निळे राखाडी सोनेरी,
क्षितिजावर पखरण होतां,–!!!
वसुंधरेवर तम टाकते,
आपले पहिले पाऊल,
जसा सूर्या घरी निघतो,
होता तांबूस संधिकाल,–!!!
काळा रंग आता पसरे,
महत्त्व त्याचे येता रजनी,
नभी दुधी चांदणे,उगवता,
काळ्या ढगांस कडा रुपेरी,–!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply