काळेभोर डोळे, काळा लांबसडक केशसंभार ही एकेकाळी सौंदर्याची प्रतीकं मानली जात होती. आज लांबसडक केशसंभार सांभाळायला, त्याची निगा राखायला वेळच उरलेला नाही. असो,
आपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये म्हणून आणि काजळ डोळ्यांची निगा राखायला.
पुढे शाळेत जायला लागल्यावर सोबत असणारी काळीकुट्ट सिंगल किंवा डबल पाटी. त्या पाटीवर सर्वप्रथम श्री हे अक्षर काढायचं. स्पंजपेटी दप्तरात बाळगायची.
त्यामधल्या ओल्या स्पंजने पाटी स्वच्छ पुसायची. वर्गात भला थोरला काळा फळा असायचा. शाळा भरल्यावर तो स्वच्छ पुसून त्याच्या एका कोपऱ्यात पांढऱ्या खडूने तारीख वार लिहून ठेवण्याची जबाबदारी वर्गाच्या मॉनिटरची असायची.
पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट च्या जमान्यात पांढऱ्या पडद्यावर काळी चलत् चित्र उमटायची. नायक नायिकेने कोणत्याही रंगाचे घातलेले कपडे, निसर्ग सौंदर्य सगळं दिसायचं काळया पांढऱ्या रंगात. त्या काळातल्या अभिनेत्रींचं सौंदर्य त्या b&w रंगातूनही खुलून समोर यायचं. छायाचित्रणाची चांगली जाण असलेला माझा एक मामेभाऊ सांगायचा, b&w फोटोग्राफी करताना छायाचित्रकाराचा खरा कस लागतो. तुम्ही छायाचित्रकार म्हणून किती पाण्यात आहात हे b&w फोटोत नेमकं कळतं. रंगीत छायाचित्रात अनेक दोष झाकले जातात. तुमचं कमेऱ्याचं ज्ञान आणि कमेऱ्याचं सेटिंग अचूक असेल, तर समोरची वस्तू त्यातल्या बारीकसारीक तपशिलासह b&w छायाचित्रात उमटते. त्या जागी एखादी व्यक्ती असेल तर तिच्या डोक्यावरचा केसनकेस अगदी स्वच्छ उमटतो. B&W काळात अनेक सिनेमाटोग्राफरनी मधुबालाच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून जगासमोर आणलं. सौंदर्य हे गोरा रंग, गुलाबी ओठ, घारे डोळे यातच असतं असं नाही, तर ते नितळ काळाभोर वर्ण, काळेभोर डोळे, कमानदार भुवया, अशा काळया सौंदर्यातूनही (black beauty) तितकच, किंवा काकणभर अधिक उभरून येतं.
आपल्याकडे पूर्वी लहान मुलींना ,
“उन्हात खेळू नकोस फार, काळी होशील, मग सुंदर गोरापान नवरा कसा मिळणार ?”
अशा विचारातून गोऱ्या रंगाचं महत्व त्यांच्यावर बिंबवलं जायचं. कुणालाही त्वचेच्या रंगावरून पारखण्यापेक्षा , त्याच्या मनातील वैचारिक सौंदर्य पहाता यायला हवं. आपल्या काळ्याभोर नेत्रांचं दान या जगातून जातांना जो कुणा अंधासाठी करून जातो तो खरा गोऱ्या मनाचा माणूस.
तुम्ही कधी एखाद्या गडद रात्री, काळ्याशार मोकळ्या रस्त्यावरून चालण्याचा आनंद घेतलाय ? लांबच लांब पसरलेला अथांग काळाशार रस्ता आणि साथीला वरती पसरलेलं अथांग काळं आकाश. आकाशाच्या काळया सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून लुकलुकणाऱ्या चांदण्यांची तीटं.
असाच एकदा कोकणात गावाला गेलो असताना, रात्रीची जेवणं आटोपून घरापुढच्या खळ्यातच खाटेवर पहुडलो. सारीकडे निवांत शांत वातावरण, झोपी गेलेलं संपूर्ण गाव,. सारीकडे पसरलेला घनघोर मिट्ट काळोख. माझी नजर
आकाशाकडे गेली. रात्रीच्या प्रहरी दिसणारं काळभोर अथांग आकाश मी नजरेत साठवून घेऊ लागलो. पहाता पहाता मनात शब्द उमटले,
“आंथरलेला होता काळा –
मैलोगणती गालिचा,
चमचमणारी नक्षी त्यावरी –
वापर केला ताऱ्यांचा.”
आणि पुढे मनात आलं,
“रेलायला गालीच्यावरी –
मऊशार ढगांची असेल उशी –
काळया नभाइमध्ये न्हाऊनी –
होई एकरूप मी तीमिराशी.”
हे काळंशार निसर्ग सौंदर्य पहात असतानाच, त्या शांत वेळी कानावर पडणारी समुद्राची गाज ऐकत, झोप डोळ्यात कधी उमलली कळलंच नाही.
शाळा कॉलेजमध्ये असताना क्रिकेटचं वेड प्रचंड होतं. तो जमाना पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा होता. अगदी मनापासून सांगायचं तर तेव्हा मला वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि त्यांचा धडाकेबाज खेळ फार आवडायचा. व्हिव्हियन रिचर्डसला पाहिल्यावर अप्रतिम काळं शिल्प पहातोय असं वाटायचं. गोलंदाजी करताना चीत्त्यासारखा लयबद्ध धावत येणारा आणि अचूक टप्प्यावर बॉल टाकणारा मायकेल होलडिंग , वेस्ली हॉल, रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, गॅरी सोबर्स, उंचापुरा यशस्वी कर्णधार क्लाइव्ह लॉईड. काळ्याकुट्ट रंगात न्हाऊन निघालेले हे बलदंड शरीरयष्टीचे, गडद काळया रंगाचे खेळाडू , आपल्या धडाकेबाज खेळाने क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद देऊन जायचे.
आणि शेतकऱ्याची काळी आई , तिला विसरून कसं चालेल ? या काळया मातीतूनच तर पिकांचा जन्म होतो, आणि तरारून वाढलेल्या पिकांना , आपल्या उरावर घेत ती काळी आई मनमुराद आनंदते ती पिकांच्या डोलण्यातून.
बाहेरच्या सौंदर्याला भुलण्यापेक्षा त्याच्या अंतरंगात
डोकवायला हवं. आगदी आजही आपण काळा गोरा भेद करत असतो. गोऱ्या त्वचेला झुकतं माप देत असतो. आजही कुणाच्या घरात नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला पाहायला गेल्यावर, त्याचं रंग रूप पहातो. घरी बोलणं कसं असतं ,
“काल अमुक कुणाच्या बाळाला पाहायला गेले होते ग, प्रकृतीने जरा अशक्त वाटलं, ते काय म्हणा, पुढे घेईल बाळसं. मात्र, वर्ण अगदी उजळ, गोरंपान आहे दिसायला.”
आता याउलट,
“तमुक कुणाच्या बाळाला पाहायला गेले होते काल……”
पुढे बोलायचं असतं पण बोलणं थांबतं. मग कुणी विचारतं,
“मग कसं आहे बाळ”? त्यावर,
“अंगाने बरं आहे गुटगुटीत, पण रंग मात्र काळासावळा घेतलाय.”.
किंवा लग्न जुळवताना सुद्धा ,
“नाही म्हणजे, नाकी डोळी छानच आहे, दिसायलाही देखणी आहे, बोलणं वागणं सुद्धा अगदी आपलेपणाचं वाटतं….. फक्त रंग जरा………
माझ्या लेकीचा काळा रंग फार आवडीचा. तसंही आजच्या पिढीला काळा रंग फार आवडतो म्हणा. फॅशनच्या जगात तर काळया रंगाला विशिष्ट स्थान आहे. मानसशास्त्राच्या संशोधनानुसार, ज्यांना काळे कपडे घालायला आवडतात ते, महत्त्वाकांक्षी, संवेदनशील असतात. त्यांची प्रत्येक कृती अर्थपूर्ण असते. अहो ब्लॅकबेल्ट मार्शलआर्ट मधली तज्ञ पातळी “मेन इन ब्लॅक”. थोडक्यात काय ? काळा रंग सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम साधू शकतो. आपण काय घ्यायचं हे आपल्यालाच ठरवायचं असतं.
“कृष्णा हे काले कृष्णा” म्हटलेल्या कृष्ण या शब्दाचा अर्थ , काळया मुखवर्णाचा, सगळ्यांना आकर्षित करणारा, असा होतो.
आणि, कर कटीवर ठेवून, पंढरपुरी विटेवर उभं असलेलं अवघ्या महाराष्ट्राचं दैवत विठुमाउली, जिच्या दर्शनाने वारकऱ्यांचे अष्टसात्विक भाव जागे होतात, ज्याच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी न चुकता, पंढरीची वारी ते नेमाने करतात, त्या पांडुरंगाचा वर्णही काळाच की. त्या साजिऱ्या रुपाची मोहिनी आपल्या संताना आणि अवघ्या महाराष्ट्राला पडलीय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
मन मुरडोनि डोळा लेइले| काळेपण मिरवले रूप त्याचे
बरवे रूप काळे अमोलिक | म्हणोनिया सांगतसे शुध्द भावे
रखुमादेविवरू अगाध काळे |म्हणोनि सर्वत्र अर्पियले.
अखेर, आपल्या आयुष्याच्या शेवटी येणारा, आपल्या करणीने जन्म मृत्यूचं संतुलन कायम राखणारा, “कालोस्मी” म्हणणारा काळ, त्याचं अस्तीत्वही काळच की. आपल्यावर आजन्म असलेली गोऱ्या वर्णाची मोहिनी तेव्हाही न उतरवता, त्यालाही म्हणणार का ?,
“काळा ! मला न्यायला आलायस हे ठीक आहे, फक्त तुझा वर्ण जरा लख्ख असता,तर तुझ्यासोबत येण्यास आनंद वाटला असता.”
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply