१९८१ साली सुधीर खरे व आम्ही दोघे असं तिघांनी मिळून स्क्रिन प्रिंटींग करायला सुरुवात केली. सुधीरने स्क्रिन प्रिंटींगचा आठवड्याचा कोर्स नुकताच पूर्ण केला होता. एका पुस्तकातील माहितीनुसार आम्ही प्रिंटींगचं साहित्य खरेदी केलं. घरातीलच स्टुलावर स्क्रिनची फ्रेम ‘जी’ क्लॅम्पने लावून काम सुरु केलं.
पहिल्यांदा आम्ही दिवाळी ग्रिटींग्ज कार्ड केली. बल्लारपूरच्या कलर पेपरवर अनेक डिझाईनची केलेली ती ग्रिटींग्ज विकण्यासाठी आम्ही तिघे डेक्कनवर स्टुलावर बोर्ड ठेवून मांडून बसलो होतो. आमचा पहिलाच प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही.
घरामध्ये बाहेरच्या खोलीत हे काम करताना थीनरच्या व इंकच्या वासाने घरातले त्रासून, तक्रार करु लागले. स्क्रिन धुताना त्या ब्लिचिंग पावडरचा वास सहन होईनासा झाला. परिणामी काही दिवसांतच ते सर्व मटेरियल एका होतकरू नवोदिताला आम्ही देऊन टाकलं.
आता कुणाचीही आलेली कामं बाहेरच्या स्क्रिन प्रिंटरकडून आम्ही करुन घेऊ लागलो. व्हिजिटींग कार्डाची कामं त्यावेळी सारखी येत असत. त्याचं डिझाईन केलं की, निगेटिव्ह पाॅझिटिव्ह तात्यांकडे, ग्राफिनात करुन प्रिंटींगला देत असू. यामध्ये सुरुवातीला भावे हायस्कूल समोरील यंदे स्क्रिन प्रिंटरकडे, काम देऊ लागलो. यंदेची ओळख वेलणकरांमुळे झाली होती. यंदेच्या वडिलांचं मोटार गॅरेज होतं. त्या जागेच्या एका कोपऱ्यात यंदे व सावंत दोघेही स्क्रिन प्रिंटींगचं काम करायचे. तिथं पटवर्धन नावाचा मित्र भेटत असे. त्याला आम्ही ‘नुक्कड’ मधील ‘खोपडी’ हे नाव ठेवले होते. तो हाॅटेलची मेनू कार्ड यंदेकडून प्रिंटींग करुन घेत असे.
त्यानंतर नंदू पटवर्धनकडे जाॅब प्रिंटींगला द्यायला लागलो. तो त्याच्या सवडीनुसार काम करीत असे. त्यानंतर सॅमी साठे, बॅंकेत नोकरीला असणाऱ्या एका धिप्पाड माणसाकडे देऊ लागलो. त्याचा डायलाॅग ठरलेला असायचा, ‘गठ्यातलं कोणतंही कार्ड काढून बघा, सगळं प्रिंटींग कसं ‘शार्प’ आहे.’ त्याच्या हिंदीतील खलनायक गोगा कपूर सारख्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून आम्ही ते मुकाटपणे मान्य करायचो.
एक फडके नावाचा पोरगेला तरुण शुक्रवार पेठेत स्क्रिन प्रिंटींग करायचा. त्यानेही आमची बरीच कामं करुन दिली. ही सर्व स्क्रिन प्रिंटींग करणारी मंडळी, ग्राफिनात नेहमीच भेटायची.
चित्रपटाची कामे सुरु झाल्यावर प्रिमियर शोची निमंत्रण कार्डे करण्यासाठी आम्हाला क्वालिटीचं काम करणारा प्रिंटर शोधावा लागे. नवी पेठेत एक शिंदे नावाचा तरुण उत्तम काम करीत असे. त्याला गाठून ‘माझं घर माझा संसार’चं निमंत्रण कार्ड करुन घेतलं. तो सडाफटिंग एकटाच रहात असे. त्याच्या खोलीला कुलूप दिसलं की, आमची पाचावर धारण बसत असे. त्याकाळी मोबाईल नव्हते, त्यामुळे संपर्क होतच नसे… फक्त वाट पहाण्याची ‘शिक्षा’ मिळे.
देशमुख वाडीत एक करपे नावाचा स्क्रिन प्रिंटींग करणारा होता. त्याच्याकडूनही अनेकदा कामं करुन घेतली. तो थर्मोकोल कटींग करण्यामध्ये ‘मास्टर’ होता. गणपतीच्या डेकोरेशनमध्ये त्यानं केलेली भव्य कारागिरी पहाण्यासारखी असे.
‘स्त्रीधन’ चित्रपटाचे दिवाळी ग्रिटींग्जचं स्क्रिन प्रिंटींग करताना नरेंद्र लिमनची ओळख झाली. तो लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या पार्टनरबरोबर प्रभात रोडवरील एका आऊट हाऊस मध्ये काम करीत होता. नंतर आमच्या ऑफिस जवळच राहणाऱ्या येनपुरेसोबत काम करु लागला. जवळच असल्याने आम्ही प्रत्यक्ष काम करताना, जाऊन पाहू शकत होतो. तो बरीच वर्षे काम करत होता. त्याला सिने-नाट्य क्षेत्राची आवड असल्याने तो रोज आमच्या आॅफिसवर गप्पा मारत बसायचा.
लिमन नंतर सुनील गोकर्णचा मित्र, दिन्या जाथवकडे, अप्पा बळवंत चौकात स्क्रिन प्रिंटींग करुन घेऊ लागलो. त्याच्याकडील युनिट मोठ्ठं होतं. एकाचवेळी चार टेबलांवर काम चालू असायचं. तिथंच रमेशच्या भालचंद्र जोशी या वर्गमित्राचा धाकटा भाऊ, सुनील जोशी भेटला. तो आणि त्याचा मित्र काळे दोघेही तिथे काम करायचे.
सुनील जोशी व काळे या दोघांनी स्वतःचं युनिट टिळक रोडवरील ‘पारिजात’च्या मागे घोडके नावाच्या माणसाच्या जागेत सुरु केलं. तिथं आम्ही कामं करुन घेऊ लागलो. त्याच्या हाताखाली अनेक मुलं मुली होती. त्यामध्ये एक चष्मेबद्दूर होता, त्याला सर्वजण मिथुन म्हणत. तो मिथुन चक्रवर्तीचा चाहता होता. एक करंबळेकर नावाचा मुलगा होता. सुनीलचं लग्न झाल्यावर त्याची पत्नीही त्याला कामात मदत करायला येत असे. सुनीलला मुलगी झाली. तिच्या वाढदिवसाला आम्ही त्याच्या घरी, सिंहगड रोडला गेलो होतो.
काही वर्षांनंतर सुनीलने रात्रंदिवस स्क्रिन प्रिंटींग केल्यामुळे थीनरच्या प्रादुर्भावाने त्याच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाला. बरेच दिवस उपचार करुनही, शेवटी यश आले नाही. सुनील स्वभावाने फारच चांगला, मनमिळाऊ होता. लाखात एखादीच अशी घटना घडू शकते, मात्र त्यासाठी देवाने सुनीलची निवड करायला नको होती.
सुनील गेल्यावर, काळेने स्वतःचं युनिट सदाशिव पेठेत सुरु केलं. आम्ही कामं करवून घेत होतो. मात्र आता कामांचं प्रमाण कमी झालं होतं.
रमेशचा काॅलेजमधील वर्गमित्र, काशिनाथ फाटे याचं बाजीराव रोडला, संगम साडी सेंटर जवळ युनिट होतं. तो आणि त्याचा मित्र गुळुमकर, दोघे काम करीत असत. फाटेने निगेटिव्ह पाॅझिटिव्ह करण्यासाठी डार्करुम करुन एन्लार्जर बसवला होता. आम्ही त्याच्याकडेही जाॅब द्यायचो. काही वर्षांनी फाटे पती-पत्नी दोघेच काम करु लागले.
२००० नंतर स्क्रिन प्रिंटींगने फक्त पाकीटाचीच कामं होऊ लागली. डिजिटल प्रिंटआऊटमुळे पत्रिका फोर कलरमध्ये मिळू लागल्या. मग पाकीटं छापण्यासाठी कन्या शाळेजवळ, तळघरात काम देऊ लागलो. कधी हत्ती गणपती जवळील राणेकडे देऊ लागलो.
माझा काॅलेजमधील मित्राचा मोठा भाऊ मिलिंद जोशी याचं युनिट न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड समोर तळघरात होतं. त्याच्याकडून खूप वेळा कामं करुन घेतली.
कालांतराने हळूहळू स्क्रिन प्रिंटींगची कामं कमी होत गेली. आता क्वचितच कुणी स्क्रिन प्रिंटींग बद्दल विचारलंच तर मला सुनील जोशीचा हसरा चेहरा आठवतो…
आता सुनील या जगात नाहीये, तसा थीनरचा त्रास आपल्यामुळे दुसऱ्या कुणालाही होऊ नये म्हणून शक्यतो मी स्क्रिन प्रिंटींगची कामं नाकारतो….
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१०-६-२१.
Leave a Reply