१९८८ साल होतं.. आम्हाला सातारा रोडवरील पुण्याईनगरमध्ये येऊन वर्षच झालं होतं.. आमच्या शेजारचा ब्लाॅक रिकामा झाला आणि तिथं एक चित्रकार रहायला आला. पंचविशीतील थोडासा कमल हसन सारखा दिसणारा, देवीदास पेशवे आपल्या आई-बाबांसह तिथं राहू लागला. त्याच्या पाचही बहिणींची लग्न झालेली होती. त्या दर रविवारी आपल्या आई-बाबांना भेटायला येत असत…
हळूहळू आम्हाला त्याच्याबद्दल कळलं.. त्याने नुकताच अभिनव कला महाविद्यालयातून पेंटिंग्जचा डिप्लोमा पूर्ण केला होता.. मग त्याच्या आई-बाबांशी ओळख झाली. आम्हा बंधूंच्याही त्याच्याशी गप्पा होऊ लागल्या..
सदानंद प्रकाशनचे आम्ही काम करीत होतो तेव्हा त्यानेही आमच्या बरोबर ‘अपराध’ पाक्षिकाच्या कथाचित्रांचे काम केले.. देवीदास डावखुरा होता, डाव्या हाताने तो लीलया चित्रं रंगवायचा.. दिवाळी अंकांची कामं करायचा..
देवीदासचं लग्न ठरलं. डेक्कनवरील एका मंगल कार्यालयात ते संपन्नही झालं. त्यावेळी फोटो काढण्याचं काम मी केलं होतं.
त्याने ‘बाजीराव मस्तानी’चं एक मोठं पेंटिंग करायला घेतलं. आमच्या समोरच ते काही दिवसांतच पूर्ण झालं. नंतर ते चित्र कोरेगाव पार्क येथील एका मोठ्या हाॅटेलमध्ये विराजमान झालं.
काही वर्षांतच त्याला ती जागा अपुरी पडू लागल्याने तो कोथरूडला रहायला गेला. आमच्या भेटीगाठी कमी होऊ लागल्या. सदाशिव पेठेत त्याने चिमण्या गणपती जवळ आॅफिस थाटलं.. आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा भरपूर गप्पा झाल्या..
नंतर मात्र तो पुस्तक प्रदर्शनातील पुस्तकांच्या मुखपृष्ठांतूनच आम्हाला भेटत राहिला.. कोणा प्रकाशकाकडं, लेखकाकडं गेल्यावर त्याचा उल्लेख झाला की, मी अभिमानानं सांगत असे.. देवीदास माझ्या शेजारीच रहात होता..
दिवाळीच्या दिवसात ‘मेनका’ दिवाळी अंकात त्याने चितारलेली रंगीत चित्रमालिका असे.. त्यालाही मराठी साहित्याची मनापासून आवड. वाचन अफाट. त्याने अनेक पुस्तकं रेखाचित्रांनी सजवली. मेहता पब्लिशिंग हाऊसची त्यानं अनेक मुखपृष्ठं साकारली..
दरम्यान अनेक वर्षे निघून गेली. त्याने प्रकाशन सुरु केल्याचे कानावर आले.. म्हणजे आता तो त्याच्या इच्छेप्रमाणे पुस्तकं सजवणार होता..
फेसबुकवर सर्च करताना एकदा तो अचानक समोर आला.. त्याच्या वाॅलवरुन त्याची ‘कलाभरारी’ कळून आली..
दिवसामागून दिवस, महिने, वर्षे गेली.. अलीकडे एखादा मित्र फेसबुकवर आठवड्या पंधरवड्यात दिसला नाही तर लागलीच जाणवतं.. मनामध्ये शंकाकुशंकांचं मोहोळ उठतं..
तसंच आज झालं.. इतके दिवस संपर्कात नसलेला देवीदास गेल्याचं वाचल्यावर, काळजाचा ठोकाच चुकला.. आज गौराई सोबत घरच्या गजाननाचं विसर्जन झालं.. आणि वयाच्या अवघ्या तिसऱ्याच वर्षी गणपतीचं सुंदर चित्र काढणारा, देवीदासही गजाननासोबत निघून गेला…
पेशव्यांनी जसा अटकेपार झेंडा फडकावला तसाच देवीदासने आपल्या रंगसाधनेनं, पुस्तक विश्वात स्वतःचा झेंडा उंच रोवला..
पेशव्यांची जशी पानिपतच्या लढाईत हार झाली तशीच असाध्य आजाराशी लढता लढता या रंगरेषाकाराचं ‘पानिपत’ झालं…
रंगपेटीतल्या गोलाकार वड्यांतील काही रंगांच्या वड्या जशा लवकर संपून जातात, तसे एकेक करुन अशा बहारदार रंगांच्या वड्या हळूहळू कमी होऊ लागलेल्या आहेत आणि रंगपेटी आता ओकीबोकी दिसू लागलेली आहे…
मनमिळाऊ मित्र, देवीदासला भावपूर्ण श्रद्धांजली!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-९-२१.
Leave a Reply