आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण एका विशिष्ट अशा चिंतेत वा काळजीत असतो. कुणाला स्वतःचे घर व्हावं, असं स्वप्न असतं, तर कुणाला मुलं चांगली शिकली पाहिजेत याबाबत चिंता असते, कुणाला नोकरी चांगली मिळावी याची काळजी असते, कुणाला उत्तम – निर्व्यसनी – पैसेवाला आणि स्मार्ट जोडीदार हवा असतो. कुणाला त्याचा व्यवसाय उत्तम चालावा असे वाटत असते तर कुणाला, मान – सन्मान – प्रतिष्ठा मनाप्रमाणे हवी असते…
अशा अनेक बाबीपैकी प्रत्येक जण (अपवाद वगळता) कुठल्या ना कुठल्या प्रश्नाने व्यथित झालेला असतो. मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तो विविध मार्ग हाताळायचा प्रयत्न करतो. काही सरळ मार्ग असतात तर काही वाममार्ग असतात. काही धार्मिक उपचार विधी मार्ग असतात तर काही धार्मिकतेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या मार्गातून चाचपडताना दिसतात. कुणी ज्योतिष मार्गदर्शन स्वीकारतात… हुश्श !!!
असं बरंच काही, बर्याच जणांनी उचित, उपचारक आणि उपकारक मार्ग शोधून वापरून झालेले असतात. परंतु… हा “परंतु” शब्द पानाच्या टपरीच्या व्यवसायासारखा भासतो याठिकाणी. पानाच्या ठेलेवाल्याचा व्यवसाय हा अनेक भल्याभल्या व्यावसायिकांना मागे टाकणारा व्यवसाय असतो. किती फायदा होतो हे कधीच कोणालाही म्हणजे अगदी “इन्कमटॅक्सवाल्यांना”ही कळलेलं नाहीये.
असा हा “परंतु”….. या तमाम मार्ग शोधणाऱ्या चिंताग्रस्तांना आणि पिडाधारकांना किती खर्चात टाकतो हे त्यांचे त्यांनाच माहिती होतं तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. कुठलाच मार्ग सापडत नाही…. यक्षप्रश्न उभा ठाकतो.
आता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”.. !! “रंगोपचार”… म्हणजे काय? तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो… रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!!
यावरच आपण हळूहळू परंतु सूक्ष्म रीतीने या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत…
तूर्तास शुभं भवतु !!
— गजानन सिताराम शेपाळ
रंगचिकित्सक
Leave a Reply