नवीन लेखन...

रसास्वाद : ‘आर्यमा’ काव्यसंग्रहाचा

वरील संदर्भाच्या निमित्तानें, थोडेसें चिंतन रामाबद्दल व रामायणाबद्दल :

एकीकडे कवयित्री, ‘रामाच्या पवित्र भूमीत’, ‘मर्यादापुरुषोत्तम रामाचा आदर्श ठेवून’ असे लिहून
रामाला वंदनीय ठरवते ; तर दुसरीकडे, ‘तुझ्या घराण्याला दोन दोन वारस देणार्‍या । त्या अर्धांगिनीला तू त्यागले नाहीं रामा । तर केलाय तिचा खून’ , किंवा , ‘स्त्रियांचे स्त्रीपण जपण्यासाठी ।
रामा ……. टाकायचंय तुला अग्निकंडात’ असे रामाला पुट्-डाउन करणारे (नीचा दिखानेवाले) किंवा शिक्षा (सज़ा) देण्यायोग्य, असे शब्दही लिहून जाते. पण मला यांत काहींही विरोधाभास वाटत नाहीं.

रामायण ही आदर्शांचीच कहाणी आहे. ‘रघुकुलरीति सदा चली आई । प्रान जाई पर वचन न जाई।’ असे म्हणणारा आदर्श पुत्र राम ; ‘निरोप कसला माझा घेता । जेथे राघव तेथें सीता।’ असे म्हणून वनात जाणारी आदर्श पत्नी सीता ; रामाबरोबर वनवास व दीर्घकालीन ब्रह्मचर्य स्वेच्छेने स्वीकारणारा आदर्श भाऊ लक्ष्मण, पतीविना चौदा वर्षें त्याची आठवण जपणारी आदर्श विरहिणी उर्मिला; मिळालेले राज्य निरपेक्षपणे रामाला परत देणारा, व रामानें वनवास संपायच्या आधी परत यायला नकार दिल्यावर, एक नव्हे दोन नव्हे तर चौदा वर्षे लालसेविणा रामाच्या नावानें , स्वत: नगराबाहेर झोपडीत राहून, राज्य चालवणारा आदर्श भाऊ व आदर्श माणूस भरत; हनुमान हा आदर्श भक्त; परस्त्री सीतेला तिच्या अनुमतीविणा हात न लावणारा रावण हा आदर्श शत्रू ; असे एक ना दोन, अनेक आदर्श !! खरें तर,
‘हे खग मृग हे तरुबरश्रेनी। तुम देखी सीता मृगनैनी?’ असा आक्रोश करणारा रामही, एक व्यक्ती म्हणून, आदर्श पतीच आहे. राम हा अर्थातच, एक आदर्श राजा आहे, कारण आपण अजूनही रामराज्याचें गुणगान करतो, उदाहरण देतो. पण, पण, ….

माणूस जीवनात विविध भूमिका (roles) प्ले करत असतो, व तो प्रत्येक वेळी प्रत्येक भूमिकेत आदर्श ठरेलच असे नाहीं. माणसाचे काहीं रोल्स् त्याच्या काहीं इतर भूमिकांशी क्लॅश होऊ शकतात, व निर्णय घेतांना एका ‘रोल’चा विचार केला तर, कदाचित दुसर्‍या ‘रोल’वर अन्यायही होऊ शकतो. अशा वेळी माणसाला त्याच्या प्रायॉरिटीज् ठरवाव्या लागतात, अग्रक्रम ठरवावा लागतो.

राम हा आदर्श शत्रू होता काय ? तर, नाहीं ; कारण व्यक्तिगत वैर नसतांनाही, त्यानें झाडाआडून बालीचा वध केला. पण तो आदर्श राजकारणी मात्र होता, कारण बालीवधामुळे त्याला सुग्रीवाचे व वानरसेनेचे साह्य मिळालें. बिभीषणाचा स्वीकार केल्यामुळे रामाला लंका जिंकणें सोपें झालें . ‘घर का भेदी लंका ढाए’ ही म्हण बरेच काहीं सांगून जाते. (त्या दृष्टीनें, बिभीषण हा आदर्श ‘फितूर’ ठरतो.)

रामानें लंकेत सीतेची अग्निपरीक्षा कां घेतली ? तर, जनतेची संभाव्य टीका टाळण्यासाठी. म्हणजेच, त्यानें आपल्या, ‘पती’ या भूमिकेपेक्षा, आपल्या ‘राजा’ या भूमिकेला अग्रक्रम दिला. नंतर,
राजा झाल्यानंतरच्या काळातील, रामाने केलेला सीतेचा त्याग ही कथा वाल्मीकि-रामायणात नाहीं, तर ती ‘उत्तररामचरित’ मधे आहे . परंतु, तें कांहीही असो ; त्या घटनेचा विचार करायचा झाला तर ,
रामानें सीतेचा त्याग करून तिला वनवासात कां धाडलें ? तर, लोकांच्या टीकेमुळे; ‘राजा’ या पोझिशनला, पदाला, (म्हणजे, स्वत:च्या राजेपणाला नव्हे, तर per se ‘राजा’ या स्थानाला, पदाला) कमीपणा येईल, म्हणून. वेदोपनिषदांप्रमाणे, राजा हा प्रजेच्या पित्याप्रमाणे असतो ; अर्थातच, राजाची पत्नी, म्हणजे राज्ञी, ही प्रजेच्या मातेप्रमाणे असते. लंकेहून परत अयोध्येला परतल्यानंतर राम आपले राज्य स्वीकारणार होताच. तेव्हां सीता राज्ञी झाली असती, प्रजेच्या मातेसमान झाली असती. अशा स्थानावरील व्यक्तीवर डाग नको, म्हणून रामानें सीतेला अग्निदिव्य करायला लावलें. आणि नंतर, कालांतरानें, एका रजकाचे बोल कळताच, ‘नृप म्हणजे प्रजेचा पिता’ या स्थानाची महती कमी होऊ नये, म्हणून सीतेला वनवासाला घाडलें. म्हणजेच, राम हा आदर्श पती असूनही, जेव्हा त्याच्या ‘राजा’ व ‘पती’ या भूमिकांमधे क्लॅश झाला, तेव्हां रामानें आपल्या ‘आदर्श राजा’ या भूमिकेला प्राधान्य दिले.

पण, हें करत असतांना, सीतेवर मात्र अन्याय झालाच, हें मान्य करणें प्राप्त आहे. कवयित्रीसारखी एक समाजभान असलेली मॉडर्न-जमान्यातील स्त्री, एकीकडे रामाला ‘आदर्श लोकाभिमुख राजा’ म्हणून पाहते, (looks up to him), तें त्याच्या ‘राजा’ या भूमिकेच्या संदर्भात. अन्, दुसरीकडे, राम जेव्हां स्वत:चा, ‘पती’ हा रोल , ‘राजा ’ या रोलपुढे सबऑर्डिनेट करून, दुय्यम ठरवून, सीतेवर अन्याय करतो, तेव्हां तीच कवयित्री रामावर रागावते, चीत्कार करते, खडे बोल सुनावते. हेंही योग्यच आहे. आधी म्हटल्याप्रमाणें, हा विरोधाभास नाहीं.

रामायणाचाच विषय आहे, आणि रोल्सचा, माणसाच्या भूमिकांचा, विचार करीत आहोत म्हणून, हेंही ध्यानात घेऊ या की, लक्ष्मण जरी आदर्श भाऊ असला तरी, त्यानें ‘आदर्श भाऊ’ या आपल्या भूमिकेपुढे स्वत:च्या ‘पती’ या भूमिकेला दुय्यम स्थान दिलें, कारण त्यानें आपली पत्नी उर्मिलेला १४ वर्षें स्वत:पासून दूरच, अयोध्येलाच, ठेवलें, स्वत:बरोबर नेलें नाहीं. विरहिणी उर्मिलेची व्यथा कितींनी मांडली आहे ? किंवा, गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा हिच्या व्यथेचा किती जणांनी विचार केला आहे ? (दोहोंसाठी, मैथिलीशरण गुप्त हें एकमात्र उदाहरण. ‘सखि वे मुझसे कहकर जाते’ ही त्यांनी काव्यातून दर्शवलेली व्यथा हृदयाला आकुल करते). तेव्हां, उद्या एखाद्या आजच्या नारीनें उर्मिलेचें उदाहरण देऊन लक्ष्मणाला खडे बोल सुनावले, किंवा यशोधरेचे उदाहरण देऊन बुद्धाला; तर तें समजून घ्यायला हवें.

संग्रहावरील काहीं अन्य प्रतिक्रिया , थोडक्यात :

• दाद देतो खालील काही ओळींना :
*चंद्रानें खोडी केली । . . . . रिक्त रिक्त मेघही झाले .. .
*शेवटचा श्वास घेणार्‍या । कळ्यांना जगवावे म्हणून। रिमझिमणारी सर होऊन । तूं ये .
*बारा मासातला एक मास अधिक । एक तिथी, एक श्वास अधिक.
* अन् पुतळे घडवण्याऐवजी। चांगली माणसं घडवा.
*जाणीवपूर्वक मी त्या पानाला। केलं नाहीं बाजूला ।
कालांतरानें संपणारच आहे त्याचं अस्तित्व । मग घाई कशाला ?
*जीवनाच्या या लढाईत । तू हरलास तरी चालेल । पण रणांगणाला पाठ दाखवून । पळणार्‍या पळपुट्याची माता होणं । मुळीच खपणार नाहीं मला । अशावेळी तुझा अभिमन्यू झाला तरी । चालेल मला …
*राक्षस असलेल्या रावणाने । तुझ्या बायकोला हातही लावला नाहीं । तरी सुद्धा । एका नतद्रष्टाच्या चिथावणीनें । तू जानकीला त्यागलेस । …… ती परगोत्री होती म्हणून …
(राक्षस म्हणवल्या जाणार्‍या रावणाच्या किती opposite, विरुद्ध, आचरण मर्यादापुरुषोत्तम म्हणवल्या जाणार्‍या रामाचें होतें, हें, इथें सहज ध्वनित होतें ; त्या comparison वर, त्या तुलनेवर, जोर दिलेला नाहीं, तरीही.)
*आधी कडक उन्हाच्या झळा । मग आशेचा पावसाळा .
*.. तू झेप घ्यावीस म्हणून । मी माझे गरुडपंख छाटले.
*मेलेल्या मढ्याला । अद्यापही सरणात । धुमसावसं वाटतंय .
अशी आणखीही उदाहरणें आहेत, सहज आठवली ती वर लिहिली आहेत.

• काहीं निसर्गचित्रें वाचून ‘हायकू’ आठवले (हायकू ३ ओळींचा असतो, हाच एक फरक). उदा.-
*त्या इंद्रधनुच्या पाती । सप्तरंगात न्हाऊन गेल्या ।
*उंच उंच गगनाला । भिडे खजूराची झाडे ।
*…. मधे वेणूचा आवाज । वाळूबेटातून येई ।
*वाहे ओढा खळाळत । … नाहीं पाणी तें आटत ।
… जाईजुईचें अंगण। … प्रात:काळी घंटानाद।

• ‘उन्हं तापली तापली’ हें शब्द वाचून बहिणाबाई आठवल्या. तितकेच प्रत्ययकारी शब्द.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..