राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजू, असं विधान बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत केलं. पण झालं उलटचं.
राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीत दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला असता तरं ती “नॅशनल न्यूज’ ठरली असती. अजित पवार यांनी बारामतीचा गड राखला, अशी नेहमीचीच बातमी त्यामुळं “फ्लॅश’ झाली.
नगरपालिकांचा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर आणि गेल्या अडीच वर्षांची स्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्यात एकचं चांगली बातमी येऊ शकते. ती बातमी हीच की *”बारामतीचा गड अजित पवारांनी राखला.”* बारामतीच्या पुढे आणि मागे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आता हतबल होऊ लागली आहे. बारामती शेजारच्या सासवड, जेजुरी, इंदापूर, दौंड या ठिकाणी पक्षाला यश मिळालेले नाही. ज्या पुणे जिल्ह्यातून विधानसभेच्या 21 जागा निवडून दिल्या जातात. त्या बालेकिल्ल्यातच पक्षाची अशी स्थिती असेल तर इतरत्र बोलायलाच नको.
अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अशा हाताच्या बोटांवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापले बालेकिल्ले राखले. इतरत्र भाजपने किंवा शिवसेनेने बाजी मारली. काँग्रेसला जोमाने प्रयत्न न करता चांगल्या जागा मिळाल्या.
राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची अडचण झालेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे दुसऱ्या फळीत “स्ट्रटेजिस्ट’ नाहीत. आर. आर. पाटील असताना त्यांनी जेम्स लेनच्या मुद्यावरून 2004 मध्ये रान पेटवले होते. (आता हा मुद्दा चांगला की वाईट, यावर वाद होऊ शकतात. पण पक्षाची स्ट्रटेजी म्हणून जेम्स लेनचा मुद्दा राज्यात गाजला.) त्याचे चांगले यश मिळून हा पक्ष विधानसभेत राज्यात नंबर एकवर गेला. आता मराठा मोर्चाच्या निमित्ताने भाजपविरोधात रान उठविण्यासाठी या पक्षाकडे फिल्डवरचा नेताच राहिला नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकीत उतरुन आक्रमक पद्धतीने प्रचार करणे अपेक्षित नाही. आर. आर. पाटील असते तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर फिरून त्यावर भाजपला अडचणीत आणले असते. तसा गर्दी खेचणारा नेता सध्या राष्ट्रवादीकडे नाही.
राष्ट्रवादीकडे सध्या असलेले नेते हे इलेक्शन मॅनेजमेंट मधील तज्ज्ञ आहेत. कोणत्या गल्लीत कोणत्या समाजाची किती मते आहेत आणि कोणाच्या भावकीचा जोर कुठे आहे, याची माहिती त्यांना तोंडपाठ असेलही. मात्र या सूक्ष्म नियोजनासोबतच व्यापक अर्थाने पक्षाच्या मुद्यांची मांडणी करणारा, कार्यकर्त्यांना चेतविणारा नेता दुसऱ्या फळीतील नेता नाही. या नेत्यांकडे ही क्षमता नाही की जाणीवपूर्वक ते स्वतःला “एक्स्पोझ’ करत नाहीत, हा देखील मुद्दा आहे. कारण भाजप सरकारच्या विरोधात ओरडले की आपला ” काटा” केला जाईल, अशी धास्ती या नेत्यांच्या मनात असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधण्याची ही देखील गरज असावी. नोटांच्या मुद्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक होतात. पण राष्ट्रवादीचे नेते सावधपणे बोलतात.
सध्याचे सत्ताधारीही राज्यात काहीही घडले तरी त्याचे सारे खापर अजून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात. काँग्रेस थोडेफार तरी प्रत्युत्तर देते. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचे झेंगाट मागे लागल्याने राष्ट्रवादीला असे प्रत्युत्तर देणेही अवघड होऊन बसते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे दुसऱ्या फळीतील नेते आहेत, त्यातील अनेक नेते भाजपशी आतून संधान साधून आहेत. म्हणजे पक्षाचे जहाज बुडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मंडळी भाजपमध्ये केव्हाही उडी मारू शकतात. लोकसभेत पक्षाच्या सहा खासदारांपैकी चार खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. उदयनराजे हे पक्षाला जुमानतच नव्हते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका झाल्याचे सत्तेच्या वर्तुळात चर्चा आहे.
कोल्हापुरचे खासदार महाडिक हे केव्हाही पक्षातून उडी मारू शकतात. कारण त्यांचे बंधू भाजपचे आमदार आहेत. अंदमान-निकोबारच्या खासदाराने केव्हाच भाजपशी जवळीक वाढवली आहे. जयंत पाटलांना भाजपची खुली ऑफर असल्याचे सांगण्यात येते. ही सारी मंडळी योग्य संधीची वाट पाहत असल्याचे बोलले जाते. आधीच पक्षाचा पाया पश्चिम महाराष्ट्रावर आधारीत. त्यात ही अशी स्थिती. विदर्भात पक्षाला फार काही स्थान नाही. मराठवाड्यात परिस्थिती अनुकूल आहे; पण तिचा लाभ घेता येत नाही. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्त्व नाही. कोकणातील नेत्यांत वाद संपत नाहीत. साठहून आमदार देणाऱ्या मुंबई-ठाणे पट्ट्यातील मतदार राष्ट्रवादीला साथ देत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात बारामतीपुरतीच मर्यादित राहणार का, अशी शंका जी येते त्याला ही सारी कारणे आहेत. राष्ट्रवादीला पाणी पाजण्यात भाजपा ब-यापैकी यशस्वी झाली आहे, ही मात्र खरे.✍?
Leave a Reply